कार्याध्यक्ष नको, कार्यकर्ते हवेत!

ठाणे महापालिका निवडणूक तांत्रिकदृष्ट्या सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहर काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवनाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात वारा आहे म्हणून तारू किनार्‍याला लागेलच असे नाही. त्यासाठी ते वल्हवणारा आणि दिशा देणारा नावाडी उत्तम असायला हवा. अशा सर्वगुण संपन्न आणि बोट बुडणार नाही, याची काळजी घेणारा नावाडी शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. चार कार्याध्यक्ष नेमून संघटनात्मक कामाचे विकेंद्रीकरण करावे आणि त्यातून एकाला नेतृत्त्व सोपवावे, असा प्रस्ताव समोर आला आहे. हा प्रस्ताव कागदावर जितका निर्दोष वाटतो. कारण तो लोकशाही तत्वांवर बेतलेला आहे, असे मानले तरी प्रत्यक्षात अशा प्रस्तावातच पक्षाच्या गेल्या किमान 12 वर्षांच्या अधोगतीचे मूळ आहे. काँग्रेस पक्षाला लागलेले अंतर्गत कलहाचे ग्रहण सुटता सुटत नसून त्याचे मुख्य कारण हे पक्षाचे अध्यक्षपद आणि त्याच्या अध्यक्षांनी नेमलेले पदाधिकारी हे आहे. अशा परिस्थितीत चार कार्याध्यक्ष नेमणे म्हणजे चार नवीन गटांच्या निर्मितीस कारण ठरण्यासारखे होईल. त्यापेक्षा पदाचे कुंपण न घालता प्रत्येक संभाव्य अध्यक्षपदाच्या दावेदारास पुढील चार महिने शहरातील समस्यांवर आणि नागरी प्रकल्पांवर आपापल्या परीने काम करायला लावणे. पक्ष म्हणून काम करायचे ठरवले तर पद असो वा नसो, दुय्यम ठरते. प्रत्यक्ष कामापेक्षा पदाला आलेले फाजिल महत्व काँग्रेसला मारक ठरत आहे. आंदोलने होतात पण त्याला ना खोली असते की अंतिम परिणाम साधण्याची धार. अशी बोथट आंदोलने करून व्यक्तीचे स्तोम वाढते आणि त्यास प्रसिद्धी मिळवून श्रेष्ठींच्या डोळ्यात धूळफेक केली जाते.
पदरहित काँग्रेसमधील संभाव्य नेत्यांना ठाण्यात काम करायला दिवस कमी पडेल अशी स्थिती आहे. विरोधी पक्षाची स्पेस युती तुटल्यामुळे भाजपाने काबीज केली आहे. काँग्रेसला सत्तेत (महाआघाडी) राहून ती कधीच काबिज करता येणार नाही. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आणखी पुसट होत जाणार. 2012 साली 18 नगरसेवक असणार्‍या काँग्रेसची अवस्था 2017 मध्ये तीन झाली होती. राष्ट्रवादीने मात्र 34 जागा जिंकून पडझड होऊ दिली नाही. याची कारणमीमांसा काँग्रेस कधी करणार आहे की नाही? पक्षाला लागलेली गळती, नारायण पवार, सिताराम राणे आणि रवी फाटक यांचे भाजपा-सेनेत पदार्पण करणे, हे कशाचे द्योतक होते? अध्यक्षपदी असणार्‍या नेत्यांना ही पडझड त्या-त्या वेळी का थांबवता आली नाही? याचे कारण त्यांची शक्ती पक्षांतर्गत भांडणे आणि अध्यक्षपदास दिली जाणारी आव्हाने परतवण्यातच गेली.
प्रत्येक ज्येष्ठ कार्यकर्त्याला आपणच अध्यक्षपदासाठी अधिक योग्य आहोत असे वाटणे यात एक फायदा असाही आहे की, या सर्व मंडळींचा काँग्रेसवर भक्कम विश्‍वास आहे. पण मग या आत्मविश्‍वासाचे रूपांतर पक्ष वाढवण्यात का झाले नाही? पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यास कारणीभूत होता का? लेटरहेड-व्हिजिटिंग कार्ड छापून मिरवणार्‍या पदाधिकार्‍यांनी काँग्रेसच्या पुण्याईतून स्वार्थ साधला. पक्ष इंचभरही पुढे गेला नाही, हे कोणी लक्षातच नाही घेतले. काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे एक प्रदेश पदाधिकारी ‘ठाणेवैभव’ कार्यालयात सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते पक्षाला मारक कामगिरी बजावत आहेत, अशी खंत व्यक्त केली होती. यामागेच तर नगरसेवक पदाच्या १८वरून तीनपर्यंत रोडावलेली संख्येचे मूळ नसेल?
काँग्रेसला पुन्हा ठाण्यात बस्तान बसवायचे असेल तर कार्याध्यक्षांपेक्षा कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. असे कार्यकर्ते की जे आक्रमकपणे जनतेचे प्रश्‍न मांडतील आणि पक्ष लोकाभिमुख असल्याचे सिद्ध करतील. पदांच्या लालसेचा विषय मागे राहिला तरच हे शक्य आहे. स्वातंत्र्य संग्रामात पुढाकार घेणार्‍या पक्षात शेकडो अनामिक कार्यकर्त्यांनी गुप्तपणे ब्रिटिश सरकारविरूद्ध प्रचार केला, बॉम्ब बनवले, लाठ्या खाल्ल्या, आंदोलने छेडली, कारावास भोगले. हे सारे पदासाठी नक्कीच नव्हते. हा निःस्वार्थीपणा आजच्या जमान्यात आदर्शवत वाटेल. पण पदांची बेडी तोडेपर्यंत पक्ष गुलामगिरीतून मुक्त तरी कसा व्हायचा?