काही काही व्यक्तीचा करिष्मा इतका मोठा असतो की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्या कर्तृत्वाला साजेसे काम करणे कठीण होऊन बसते. नाही म्हणायला ही पिढी प्रयत्न जरूर करीत असते, परंतु त्यांची तुलना नेहमी त्यांच्या आधीच्या पिढीशी होत राहते. कर्तृत्ववान बापाच्या पोरांना त्यांचा त्रास होत असतो. अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे समकालीन उदाहरण डोळ्यासमोर येते. शो मॅन म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या राज कपूरच्या मुलांना हाच त्रास झाला. बाप-बेटा एकाच क्षेत्रात असणारी असंख्य उदाहरणे आपल्या समोर येतील. त्यात मोठे उद्योजक असतील, टाटा, बिर्ला आणि अगदी अंबानी. सामाजिक कार्यकर्ते असतील, आमटे परिवार किंवा राजकारणी. शेवटच्या वर्गातले मोठे उदाहरण नेहरू-इंदिरा-राजीव आणि आता राहुल-प्रियांका यांचे देता येईल. तूर्तास हा विषय महाराष्ट्रापुरता सीमित ठेवला तरी बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे-आदित्य यांची नावे डोळ्यांसमोर येतात. त्याचे कारण स्वतः श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली काही विधाने आहेत. शिवसेना श्रेष्ठींना अनपेक्षित घडामोडी घडल्यामुळे नेते आणि प्रवक्ते यांचाही गोंधळ उडाला आहे. अशा धक्क्याची सेनेला सवय नाही, असे म्हणता येणार नाही. एखादा नेता पक्ष सोडून जाणे आणि एकगठ्ठा 45-50 आमदारांनी सोडचिठ्ठी देणे यात मोठे अंतर आहे. भूकंपाची तीव्रता रिष्टरवर मोजली जाते. सध्या सेनेला बसलेला भूकंपाचा धक्का किमान दहापेक्षा अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर सेनेतून व्यक्त होणार्या प्रतिक्रिया भावनिक असण्यापेक्षा उद्वेग व्यक्त करणाऱ्या आहेत. श्री. उद्धव ठाकरे यांचा सात्विक संताप लपून राहिलेला नाही आणि अशा परिस्थितीत ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी केले आहे.
श्री. उद्धव ठाकरे म्हणतात त्यात तथ्य आहे. एकदा का हा सध्या सुरू असलेला गदारोळ संपला की सेनेप्रमाणेच फुटीर गटाला जमीनदोस्त झालेल्या घराची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या जनतेला आपणच ओरिजिनल किंवा आपणच सेनेचा अजेंडा (अस्मिता-हिंदुत्व वगैरे) पुढे घेऊन जाऊ असे सांगून वळवण्याचे काम करावे लागणार आहे. अशावेळी ठाकरे नावामागे असलेल्या पुण्याईचे मोठे आव्हान फुटीर गटासमोर असणार आहे. या नावाभोवतीचे वलय आणि वजन त्याच्याबद्दल आदर व्यक्त करून उपयोगात आणता येईल काय? धीरूभाई अंबानींची दोन मुले, मुकेश आणि अनिल. दोघांनाही अंबानी या नावाचे वलय पण मुकेश यांच्या तुलनेत अनिल यशस्वी ठरले नाहीत. केवळ आडनावामुळे मुकेशने बाजी मारली नाही. त्याला साजेसे कर्तृत्व त्याने दाखवले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल क्रमांक सातत्याने पटकावणे त्यांना शक्य झाले. कर्तृत्वाला पूरक अनेक गुणांचा संचय आणि त्यांचे प्रकटीकरण यामुळेच ते शक्य झाले. सांघिक शक्तीची निर्मिती, अचूक निर्णय घेण्याची सचोटी, आर्थिक शिस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास या चतु:सूत्रीमुळे मुकेश अंबानी यांच्या यशात कमालीचे सातत्य दिसते.
राजकारणात मुळात नेत्यांची पिढी पुढे आली की तिच्यावर घराणेशाहीचा आरोप करून खच्चीकरण करायला सुरुवात होते. उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला हा त्रास सुरुवातीपासूनच आला. बाळासाहेबांच्या निधनानंतर 63 आमदार निवडून आणल्याचे सांगून ते अप्रत्यक्षपणे कर्तृत्वाचा हवाला देत आहेत, परंतु तरी त्यांना टीकाकाराची तोंडे पूर्णतः बंद करता आली नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव यांची शिवसेना असे दोन वर्ग करण्यात येऊ लागले तेव्हाच उद्धव यांनी ठाकरे ब्रँड अधिक सशक्त करण्याची पावले उचलायला हवी होती. दुर्देवाने ठाकरे ब्रँडची किंमत त्यांच्या जवळच्या मंडळींना समजली नाही आणि त्यांनी या ब्रँडला घराणेशाहीच्या रांगेत आणून बसवले. टाटांच्या बाबतीत असे झाले काय? जे.आर.डी. टाटानंतर रतन टाटा यांनी या अतिशय विश्वासार्ह औद्योगिक समूहाची कमान उत्तम सांभाळली. याचे कारण अनेक टाटा कुटुंबाबाहेरील मंडळींना सामावून घेतले गेले. (दिनशॉ, शापूरजी पालनजी सायरस मिस्त्री अशी काही नावे घेता येतील.) आपण जर राजकीय पक्षांमध्ये कॉर्पोरेट कल्चर आले आहे असे म्हणत असू तर त्यांचे गुण राजकारणाने अंगीकारायला काय हरकत आहे? घराणेशाही वाईट नसते हे अंबानी, बिर्ला, गोदरेज, टाटा, महेंद्रा वगैरे उदाहरणांवरून स्पष्ट होते. आपल्या पूर्वजांनी कमवलेल्या गुडविल आणि कर्तृत्वात भर टाकत जाणे हे उत्तराधिकाऱ्यांचे काम असते. उद्धव यांचे दुर्दैव असे की त्यांना म्हणावे असे चांगले शिलेदार मिळाले नाहीत. जर एका ठाकरेला असा त्रास झाला असेल तर फुटीर गटाला शिवसेनेसारखे एक रोप पुन्हा लावून त्याचा डेरेदार वृक्ष करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल! ठाकरे ब्रँडला साजेसा अजेंडा आणि व्यूहरचना आखणे सोपे नाही. सत्तांतर वगैरे तसे पाहता एक छोटेसे नाटक आहे. शिवसेना नावाच्या महानाट्याचे काय होणार हा खरा प्रश्न आहे. जनता चोखंदळ आणि चाणाक्ष असते. ती आजच्या राजकीय नाट्यातील सर्व कलाकारांच्या कामाचे बारीक निरिक्षण करणार आहे. धोका तुलनेचा उभयतांसमोर असणार आहे. त्यावर मात जो करील, तोच तुल्यबळ ठरेल!