युक्रेन-रशिया युद्धाचे ढग जमू लागले असून त्याची झळ अवघ्या जगाला बसणार आहे. या देशांशी भले आपले रक्ताचे नाते नसले तरी जीवनाचा अविभाज्य आणि अपरिहार्य भाग झालेल्या तेलाशी नक्कीच आहेत! असो, ज्यांचे शेअर मार्केटमध्ये सध्या नुकसान सुरू आहे ते या जागतिक घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहेत. आम्हाला हे दोन देश आठवायचे कारण सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेले युद्ध. आता त्यांच्यापैकी कोण पुतिन, कोण अमेरिका वगैरे विचारू नका. परंतु या एकेकाळच्या (तेही 25 वर्षे जुन्या म्हणा किंवा तितकेच वर्षे सडलेल्या!) मित्रांचे सकाळ-संध्याकाळ एकमेकांवर धावून जाणे राज्यातील वातावरण गढूळ करीत आहे हे नक्की. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्याचे पडसाद मतपेटीद्वारे दिसले तर आश्चर्य वाटू नये. काही वेळा तर असे वाटते की भ्रष्टाचाराची जुनी लक्तरे आताच सार्वजनिक नळावर धुण्यास आण्यामागे सु (की,कु?) नियोजित डाव तर नसावा अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून लोक एकमेकांकडे संशयाने पहात होतीच. कोरोना काळात नकारात्मक वर्तनास आपण आरोग्याची सबब जोडून टाकली. कोरोना गेला तरी संशय जात नाही आणि त्यात आपले तथाकथित ‘विश्वासू’ आणि ‘प्रामाणिक’ नेते एकमेकांच्या कुलंगड्या-भानगडी काढून संशयाला समाजमनात कायमस्वरूपी जागा देत आहेत. मुलगा बापाकडे, आई-मुलीकडे, भाऊ-भावाकडे, काका-मामाकडे, आत्या-मावशीकडे संशयानेच पहात असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले तर त्यास कोरोना इतकेच नेत्यांना जबाबदार धरावे लागेल असो.?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवण्याचा भाजपाचा हेतू लपून राहिलेला नाही. त्या दृष्टीकोनातून सध्याच्या वादळी घडामोडींकडे पहावे लागेल. राज्याच्या निवडणुकांना अजून दोन वर्षांचा अवकाश आहे, तोवर ही चिखलफेक म्हणा की शिमगा सुरूच राहणार. संशयाचे रंग मग केरोसिननेही निघणार नाहीत! पण काही राजकीय रंग दोन वर्षांपर्यत तसेच राहिले तर 2024 च्या निवडणुकीत उपयोग होऊ शकेल. या रंगांचा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत वापर होणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने 83 जागा जिंकून शिवसेनेशी (97) बरोबरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा आत्मविश्वास त्यांच्या सध्याच्या आक्रमक आविष्काराच्या स्त्रोतांपैकी एक आहे. परंतु ठाणे महापालिकेत तशी परिस्थिती नाही. शिवसेनेने त्यांच्या बालेकिल्ल्याच्या लौकिकास तडा जाणार नाही याची काळजी घेतली होती. भाजपाची नगरसेवक संख्या पहाता त्यांना शिवसेनेला शह द्यायचा असेल (राजकीय परिभाषेत बोलायचे झाले तर कमळ फुलवायचे असेल) तर त्यांना भाजपाच्या राज्यपातळीवरील आक्रमकतेवर पूर्णपणे अवलंबून रहाता येणार नाही. वरचे नेते आक्रमक झाले म्हणून त्यांचे अनुकरण करण्यापूर्वी भाजपाला वस्तुस्थितीचे अवलोकन करावे लागेल. शिवसेनेला उटसूट ‘टार्गेट’ केल्याने त्यांची प्रतिमा खरोखीच ‘रोबस्ट’ होणार आहे काय? मुळात भाजपाला हे अवसानही आणता येणार नाही. कारण त्यांचा तो मूळ पिंड नाही. भाजपाची सध्याची व्युहरचना राजकीय निरीक्षक जो शब्द नेहमी वापरतात ती ‘मेजर शिफ्ट’ अशा स्वरूपाची आहे.
ठाणे महापालिका जिंकायची असेल तर या आक्रमकपणाला रचनात्मक कार्याच्या नियोजनाची जोड द्यावी लागेल. मुळात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये जनतेला स्वारस्य नसते. त्यांच्या ज्ञानात एकच भर पडत असते आणि ती म्हणजे कमी भ्रष्ट, तो श्रेष्ठ असा तर्क काढण्याची! त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येतात हे झूठ आहे. भाजपाने ही नीती अवलंबिली तर त्यांच्याकडे सक्षम विरोधी पक्ष म्हणुन पाहिले जाऊ शकते. परंतु तेच ‘टार्गेट’ ठेवणे म्हणजे समझौता करण्यासारखे ठरेल. महापौर पदाचे स्वप्न पाहिले तर विरोधी पक्ष पदात पडू शकते. पण विरोधी पक्षाचे स्वप्न पाहिले तर स्थायी समितीपासून सर्वच समित्यांमध्ये जेमतेम उभे राहिला जागा मिळू शकेल. भाजपाला खुर्चीवर बसायचे असेल तर मोठ्या खुर्चीचेच स्वप्न पहावे लागणार. दोन वर्षांनी होणार्या ठाणे आणि अर्ध्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील त्यांचे अस्तित्व त्यावरच अवलंबून असणार आहे.
राजकारण आरोप-प्रत्यारोप, गरमा-गरमी होतच असते. ती आग वेळीच विझवली नाही तर कार्यकर्त्यांच्या मनामनात धुमसत रहाते. तसे होऊ नये म्हणुन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे ठरवले आहे. भाजपाने या घटनेतून योग्य बोध घेऊन आगामी काळात आपला पवित्रा मतदारस्नेही कसा होईल हे ठरवावे. विरोधक म्हणून मळमळ जपायची की कमळ फुलवण्याचे स्वप्न पहायचे, हे ठरवण्याची हीच ती वेळ आहे! एक मात्र खरे की जनतेला राजकारणाची शिसारी आली आहे.