नको रे बाबा विषाची परीक्षा!

काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात विषारी साप शिरल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून थोडी गंमत वाटली आणि अनेक प्रश्न मनात फणा उगारून उभे राहिले. मुळात साप पाहून सर्वसामान्यत: पळता भुई थोडी होत असते. तिथे घाबरलेली माणसे पोलीसमित्र किंवा सर्पमित्रांकडे धाव घेत असतात तिथे चक्क एखाद्या सर्पाने पोलीस ठाण्याचा आसरा का घ्यावा? सरपटणाऱ्या प्राणी, मग ते विषारी असो किंवा नसोत, मुळातच भययुक्त संशयाने पाहण्याचा स्वभाव समाजाचा झाला असताना ते विषाची परीक्षा घेतीलच का? तर एकूणच कोरोना काळात साथीचे विष पसरवणाऱ्या विषाणूचा डंख अवघ्या जगाची झोप उडवत असताना सर्पदंश वगैरे प्रकार किरकोळ मानले जाऊ लागले होते आणि अशा परिस्थितीत एखाद्या सर्पाने पोलीस ठाण्याचा आसरा घतला म्हणून आमच्या संपादकांनी मला सविस्तर वृत्तांकनासाठी पाठवले. पोलीस ठाण्यात पोचलो तेव्हा निरीक्षक साहेब एखाद्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद केल्याच्या आनंदात आपल्या खुर्चीत कपाळावरचा घाम पुसत आणि सुटकेचा निःश्वास टाकत बसल्याचे मी पाहिले. ‘अहो झोप उडवली हो या सापाने,’ असे म्हणत त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या एका पोत्याकडे बोट दाखवले. पोते वरून घट्ट बांधले होते आणि त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी त्या पोत्यासोबत सेल्फी काढण्यात गर्क होते. ग्रुप फोटोसाठी दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकावर साहेब बसणार होते आणि दुसरी खुर्ची अर्थात पोत्यासकट सापासाठी होती. ‘स्माईल’ असे फर्मान न सोडताही छायाचित्रकाराला एक हसरा फोटो मिळणार होता, हे वेगळे सांगायला नको.
मी साहेबांना पत्रकार विचारतात तसे काही ठराविक प्रश्न विचारले, म्हणजे साप कधी आला, कोणी प्रथम पाहिला, किती लांब होता, सर्पमित्र कधी आले, त्यांनी त्याच्या मुसक्या (? ) कशा आवळल्या, परवानगीशिवाय प्रवेश केला म्हणून गुन्हा दाखल करणार काय, असे काही गंभीर आणि बरेचसे गमतीदार प्रश्न विचारून मी वार्ताहर म्हणून कर्तव्य बजावू पाहत होतो. यातील एकही प्रश्न विचारला नसता तर संपादकांचा दंश माझ्या मात्र जिव्हारी लागला असता.
एक शेवटचा प्रश्न, मी भीतभीतच विचारला कारण साहेबांना ग्रुप फोटो काढण्याची घाई झाली होती. तुम्ही या सापाचे काही इंटरोगेशन केले असेलच ना?
-केले की, फार गंभीर माहिती हाती आली आहे. परंतु ती गोपनीय असल्यामुळे आमच्या साहेबांची परवानगी घेऊनच सांगू. उद्या पत्रकार परिषदेच्या वेळी, ‘ असे ते म्हणाले.
मी पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना सर्पमित्र माझ्यापाशी आला आणि म्हणाला, ‘साप काय बोलला, हे मी तुम्हाला सांगू शकेन पण तुम्ही ते छापाल का?
पत्रकार परिषदेपूर्वी अशी एक्सकल्यूसिव्ह ज्याला मराठीत अलीकडे ब्रेकिंग न्यूज म्हणतात, अशी बातमी मिळत असेल तर कोण सोडेल? बरेच दिवसांनी साप सोडण्याऐवजी हातात खरीखुरी बातमी आली होती. कोण दवडेल ही नामी संधी? मी सर्पमित्राला घेऊन बाहेर गेलो. जवळच असलेल्या हॉटेलला चहा पिता-पिता सर्पमित्राला बोलते केले आणि जी माहिती आली ती थक्क करणारी होती.
सर्पमित्र सांगू लागला, हा साप विषारी आहे यात वाद नाही. त्याचा दंश जीवावर बेतू शकतो. वास्तविक त्याच्याकडे असे हुकमी अस्त्र असताना त्याने पोलीस ठाणे का गाठावे हा प्रश्न मलाही पडला. म्हणून मी त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोललो. फुत्कार टाकत त्याने सभोवताली गेल्या काही दिवसांपासूनच्या घटनांबद्दल राग व्यक्त केला. तो सांगू लागला-सारेच कसे विष ओकत आहेत, प्रसंगी आमच्यापेक्षा माणूसच विषारी झाला की काय असे आम्हाला वाटू लागले आहे. समाजमनात आदराचे स्थान असणाऱ्या आसामींना अपमानाचे डंख मारून समाजात दुहीचे विष पसरवण्याचे काम सुरू आहे. आमच्या विषावर उतारा तरी आहे, पण यांच्या विषाने एक नाही, दोन नाही तर शेकडो-हजारो बाधित होतील. संपूर्ण समाजावर सुरू असलेला हा विषप्रयोग पाहून सुरुवातीला आम्हाला न्यूनगंड आला आणि यथावकाश त्याचे रूपांतर भयगंडात झाले! मी ज्या नेत्याच्या बागेत रहात होतो त्याचे संभाषण दोन दिवसांपूर्वी कानावर पडले आणि अखेर मी स्वरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. अहो नकळत मी या नेत्याच्या कधी रस्त्यात आलो आणि त्यानेच माझा जावा घेतला असता तर…..रातोरात निर्णय घेतला आणि तडक इथे आलो. आता माझी रवानगी जंगलात होईल आणि विषारी माणसांपासून मी कायमचा सुरक्षित होईन.
पण का हो, सर्प तर निसर्गचक्रासाठी आवश्यक असतात ना? मी विचारले. त्यावर सर्पमित्र म्हणाला , हो ना! पण त्यासाठी स्वतःचा जीव सापांनी तरी धोक्यात का घालावा? म्हणजे मग विषारी साप शहरांमध्ये कधीच परतणार नाहीत का?-मी. परततील, पण एका अटीवर. सापांची एकच अपेक्षा आहे. माणसाने आता असमजुतदारपणाची कात टाकावी आणि प्रतिज्ञा करावी सरळमार्गी आयुष्य जगण्याची. समस्त सापमंडळी नागमोडी वळणे घेत चालतात ते माणसांपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि दोघेही सुरक्षित राहतात. उगाच डंख मारण्याची सवय आम्हाला नव्हती, नेत्यांमध्ये ती आली कुठून? सर्पमित्राने केलेले सापाचे आत्मकथन मला बरेच काही सांगून गेले होते.
जाता-जाताः विष पसरवणाऱ्या नेत्यांचा धसका घेणाऱ्या सापांनी यंदा नवीन वर्षी एकमेकांना ‘विष’ करणेही टाळले म्हणे!