झोपेचे सोंग आणि ‌’वेक-अप‌’!

शहराच्या विकास-प्रक्रियेत तसेच सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-क्रीडा आदी कार्यात जनसहभाग असेल तर जो परिणाम साध्य होतो तो अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी होऊ शकतो. शहराच्या परिपक्वतेचे ते ठळक लक्षण बनते. प्रत्येक शहराला एक वैभवशाली आणि समृद्ध असा वारसा असतो. ती परंपरा शहराच्या एक व्यक्तीमत्वाचा भाग बनत असते. शहराबद्दलचा अभिमान अशा सहभागातून वाढत असतो आणि आपण रहात असलेल्या मातीशी आपुलकी घट्ट होत असते.  जनसहभागाचे हे तत्व अनेकदा धकाधकीच्या जीवनात आणि प्रसंगी दैनंदिन समस्यांमुळे पाळले जात नाही. त्यामागे नागरिकांची उदासीनता हेही प्रमुख कारण असते. ठाण्यात नागरी संघटना, नागरी आघाडी, सिटीझन्स फोरम वगैरे प्रयोग झाले. परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्या संघटनांच्या व्यासपीठावर एकत्र आलेले जागरुक आणि समविचारी नागरिक हताश झाले, कारण त्यांना समाजाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने घेतले नाही. या पार्श्वभूमीवर ‌’वेक-अप‌’ ठाणेकर नामक एक अराजकीय व्यासपीठ सुरु झाले आहे. त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत आणि दोन दिवसांत सुमारे तीनशे ठाणेकर या उपक्रमाचे सदस्य झाले, याबद्दल त्यांना शुभेच्छाही देत आहोत.
या व्हॉटस्‌‍ॲप-ग्रुपवर व्यक्त होत असलेल्या प्रतिकिया, सूचना, प्रश्न, अपेक्षा वगैरे लक्षात घेता ठाण्यात ज्या काही सुधारणा सुरु आहेत, त्याबद्दल नागरिकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. तुर्तास त्यात टीकेचा सूर दिसत नसला तरी तक्रार करण्यासारखा कारभार आहे हे नक्की. या ग्रुपमुळे खाजगी व्यक्त होणारी मते सार्वजनिक होत आहेत. जे हतबल होते आणि व्यक्त होण्यात काही अर्थ नाही अशा निष्कर्षास पोहोचले होते ते बोलू लागले आहेत. अशा व्यासपीठासाठी हे सुचिन्ह आहे. परंतु या ग्रुपवर होणाऱ्या चर्चेचे फलित काय होणार हा प्रश्न आहे. या प्रश्नांना कोण उत्तर देणार हा खरा प्रश्न आहे! ही चर्चा किंवा कार्यवाहीची चक्रे फिरली तरच जनसहभागाच्या या प्रयत्नांना चालना मिळणार आहे. अन्यथा पूर्वानुभव लक्षात घेता ही कोरडी चर्चा आणि आदर्शवादाचे बुडबुडे इतकेच काय ते पदरी पडू शकते.
जनसहभागात एक आशा समाविष्ट (embedded) असते परंतु कधी, जेव्हा अपेक्षापूर्ती तेव्हा. आतापर्यंतचा इतिहास निराशाजनक आहे. जे प्रश्न नागरिक हिरीरीने मांडत आहेत, ते गेली 20-25 वर्षे ‌’ठाणेवैभव ने मांडले आहेत. नागरिकांचा एक दबाव गट असावा, असे आवाहन अशा प्रत्येक लेखांत आम्ही करीत आलो. आज जेव्हा नागरिकांच्या सूचना आम्ही वाचल्या तेव्हा या सर्व यापूर्वी अनेकदा केल्या गेल्या होत्या. त्यांची दखल घेतली गेली नाही असे आम्ही नाही म्हणणार. परंतु बहुतांशी वेळा आमच्या पदरीही निराशाच पडली. हा अनुभव जवळजवळ सर्वच माध्यमकर्मींचा आहे. अशावेळी सडकून टीका करण्याखेरीज पर्याय रहात नाही. तसा आसूडही आम्ही ओढला. या प्रक्रियेत नागरी संघटनेसारखी ताकद शहरात असणे आवश्यक असल्याचे जाणवले. त्यातून आम्ही ‌’सिटीझन फोरम‌’ची निर्मितीही केली. परंतु अशा प्रयत्नांना ताकद देणारे हात कमी पडले आणि सकारात्मक दबाव निर्माण होऊ शकला नाही. नकारात्मक दबाव प्रभावी ठरत नाही, कारण जे अकार्यक्षम असतात, चुकीच्या पक्षाचे असतात, ज्यांचे हीतसंबंध गैरकारभारात गुंतलेले असतात, त्यांना हा दबाव पूर्वनियोजित आणि विशिष्ट हेतूने प्रेरित केला गेल्याचे वाटत असते. या उलट सकारात्मक दबाव हा पक्षातीत (अराजकीय) असल्यामुळे त्याच्या हेतूबद्दल शंका घेतली जात नाही आणि चर्चेचे दरवाजे खुले राहतात. दुर्दैवाने या दबावासही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी भीक घालत नसतात. कारण त्यात उपद्रवमूल्य नसते. नागरी संघटना यशस्वी न होण्यामागचे हेच प्रमुख कारण असते. आताही ‌’वेक-अप ठाणेकर‌’चे सदस्य संसदीय भाषा बोलत आहेत. ते चिडले जरुर आहेत, परंतु कायदा हातात घ्यावा ही त्यांची मानसिकता नाही. दुर्दैवाने सकारात्मक म्हणजे निष्क्रिय मानले जात असल्याने अशा संघटना अल्पजीवी ठरतात. त्यांना निष्प्रभ करण्याचे अनेक मार्ग सध्याच्या ‌’सिस्टिम‌’मध्ये आहेत.
’ठाणेवैभव‌’ने जनसहभागाचा नेहमीच पुरस्कार केला. ‌’सिटीझन फोरम‌’ तर्फे अभिरुप महापालिकेसारखा उपक्रम राबवला. शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांच्या बैठका घेतल्या. सूचना आणि प्रश्न मांडणे ही जणु ‌’ठाणेवैभव‌’ची ५० वर्षांची परंपरा आहे. ‌’एएलएम‌’चा प्रस्ताव असो की ‘वन मिनिट फॉर ठाणे‌’ यांसारखे उपक्रम असोत, यासारख्या अभिनव संकल्पनांचा आम्ही आजही पाठपुरावा करीत आहोत. ‌’वेक-अप ठाणेकर‌’साठी आमचे दरवाजे उघडे असतील. प्रश्न आहे ‌’सिस्टिम‌’ कसा प्रतिसाद देते तो! वेक अप म्हणजेच जागे व्हा असे आवाहन ठाणेकरांना करताना, झोपेचे सोग घेतलेल्यांचे काय करायचे हा ठाण्याच्या सर्वांगिण, सर्वस्पशी विकासातील अडथळा आहे.