ठेकेदारावर गुन्हा दाखल
कल्याण : कल्याण पूर्वेत काटेमानिवली परिसरात दुर्गामाता मंदिर भागातील नाल्याची सफाई करताना कंत्राटदाराने नाले सफाईच्या कामासाठी बाल कामगाराचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणच्या साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी कस्तुरी राजेश महात्मे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कल्याण-डोंबिवली पालिकेचे नालेसफाई ठेकेदार वैभव मोरे यांच्याविरूध्द तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली दुर्गा माता मंदिर भागातील नाले सफाईचे काम करताना कल्याण डोंबिवली पालिकेचे ठेकेदार मे. सेक्युअर वन सिक्युरिटी सर्व्हिसेसचे (कार्यालय, सुर्यमुखी काॅम्पलेक्स, पत्रीपुलाजवळ, कल्याण पश्चिम) वैभव मोरे हे अल्पवयीन मुलाचा वापर करत असल्याचे समाज माध्यमातील दृश्यचित्रफितीमधून प्रसारित झाले होते.
ठेकेदार वैभव मोरे यांनी आपल्या आस्थापनेत बाल कामगाराची नियुक्ती करून त्याला स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता कमी मोबादला देऊन त्याला नालेसफाईचे धोकादायक असे जीविताला धोका निर्माण होईल असे क्रूर कृत्य केले. तसेच त्याचे मानसिक, शारीरिक शोषण केले म्हणून सरकारी कामगार अधिकारी कस्तुरी महात्मे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.