ठाणे: कोपरी येथील शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे रखडलेले लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. १८ रुग्णशय्या क्षमतेचे हे प्रसूतिगृह ठाणे पूर्वेतील नागरिकांना दिलासा देणारे ठरणार आहे. या कक्षात २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.
शेठ लखमीचंद फतिचंद प्रसुतीगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य, कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रसूतीगृह राहिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा इतरत्र हलवावे लागत होते. पण आता याच ठिकाणी 18 बेडसचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही.
या प्रसूतिगृहाचे यापूर्वीही उदघाटन झाले होते, पण मनुष्यबळाअभावी नवजात अतिदक्षता विभाग बंदच होते. या विभागात लवकरात लवकर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून त्यानंतरच उदघाटन करावे अशी मागणी करत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला होता.
आज झालेल्या उदघाटन सोहळ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, उपायुक्त मनिष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, डॉ. धायगुडे, डॉ. समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज अत्याधुनिक १८ खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.