थंडा रहा, माफ करा !

नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरु आहे. गणपती असो की दिवाळी, दहीहंडी असो की नवरात्री, कोरोनामुळे सर्वच सण झाकोळून गेले होते. विषाणूने सरत्या वर्षाच्या मध्यानंतर काढता पाय घेतला आणि भूतलावरील समस्त मनुष्यजातीने सुटकेचा एकच नि:श्‍वास सोडला. सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत आणि नैराश्येच्या गर्तेत हरवलेले उत्साह आणि आनंद हे दोघे भाऊ पत्ता शोधत आपल्या दाराशी येऊन उभे आहेत! २०२३ चे स्वागत करताना गेल्या तीन वर्षांचा काळाकुट्ट अंधार काही मंडळी द्रवसदृश्य पदार्थात बुडवतील आणि फसफसणाऱ्या उत्साहाने सरत्या वर्षाची शेवटची रात्र जागवतील. कडू आठवणींना मूठमाती देण्याची तयारी सुरु आहे. अशावेळी स्वागताची रुपरेषा आखण्यात काही मंडळी दंग आहेत तर काही जणांना नवीन वर्षाचा संकल्प खुणावू लागला आहे. देशातील समाजजीवन महापुरुषांच्या अपमानाने ढवळून निघत आहे तर राजकारणी मंडळी गिनीजबुकात नोंद होईल अशी नैतिकतेची खालची पातळी गाठण्यात मग्न आहेत. सर्वत्र असा कोलाहल माजला असताना एखादा संकल्प मन:शांती देत असेल तर तो का सोडू नये, असा प्रश्न आमच्या मनात आला आहे. कोराना काळात नव्याने आकलन झालेले शहाणपण आणि समजुतदारपणा यामुळे संकल्प सिध्दीस नेण्याचे मनोबल सर्वांना लाभले आहे. त्यामुळे तो मोडण्याचा प्रश्न नाही. एका वाक्याचा हा संकल्प आहे. पाहिजे तर त्याला नव्या वर्षास समोरे जाण्याचा मंत्र समजा. तो असा आहे-थंड रहा, माफ करा!
हा संकल्प, अन्य संकल्पांप्रमाणे म्हणजे दररोज सूर्य नमस्कार घालणे, धुम्रपानाला रामराम करणे अथवा मॉर्निंग वॉकचा निश्चय करणे, असा कमी टिकाऊ नाही. तो तुमच्या नकळत पाळला जाईल इतक्या संधी तुम्हाला सहज उपलब्ध होत राहतील. आपल्या जगण्यातल्या काही ‘सिच्युएशन्स’ वानगीदाखल देता येतील.
सकाळी दुधवाल्याने चहाची तल्लफ असताना वेळेत दुध टाकले नाही तर …थंड रहा आणि त्याला माफ करा. काही वेळाने आलेल्या पेपरवाल्याने फाटका अथवा चुरगळलेला पेपर टाकला किंवा त्यातही पहिले पान सातव्या पानावर सुरू झाले म्हणून चिडू नका, पण मनातल्या मनात ‘थंरमाक’ हा चार अक्षरी जप करा. घरातून बाहेर पडल्यावर तुमची नेहमीची बस वेळापत्रकानुसार आली नाही, रिक्षावाल्यांनी तुमच्याकडे पार दुर्लक्ष करीत मग्रुरीचा इरसाल नमुना पेश केला, गाडी चालवत असाल तर डावीकडून कोणीतरी ओव्हरटेक केले म्हणून संतापू नका, उजवीकडे गाडी थोडी वळली म्हणून मागून येणार्‍याने जळजळीत कटाक्ष टाकला तरी शिव्या मनाला लावून घेऊ नका, सिग्नल तोडणाऱ्या महाभागांना तर मोठ्या मनाने माफ करा, सिग्नल लाल असताना उताविळ झालेल्या वाहनचालकांबाबत उदात्त भाव ठेवा, तुम्ही सिग्नल पाळूनही रस्त्याच्या मधोमध अडकलात तर वाहतूक पोलिसांचे उपदेश निमुट ऐकून घ्या, सरकारी कार्यालयातील कामासाठी खेटे मारावे लागले तरी संकल्प न चिडता स्मरणात आणा, सरकारी कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या आणि त्यावर सुरु असलेले पंखे आणि दिवे पाहून चडफडू नका, ऑफिसमधील राजकारणात तुमच्या निष्पापपणाचा बळी गेला तरी दुःख मानू नका, रांगेत उभे असताना कोणीतरी धक्का मारुन पुढे गेला तर ‘थंरमाक’ची गोळी चघळा, रात्री चॅनलवरील बिनडोक वादविवाद कार्यक्रम बघणे टाळा आणि बघितले तर संकल्प लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यावर वरच्या मजल्यावरुन कोणी कावळ्यांसाठी टाकलेले फरसाण टाकले तरी थंरमाक, कबुतरांना दाणे देणाऱ्यांना, भटक्या कुत्र्यांना घरात राहिलेल्या शिळ्या पोळ्या खायला घालून पुण्य कमावणाऱ्या, रस्त्यात थुंकणाऱ्या, जोरजोरात भांडणाऱ्या, रस्ता अडवणाऱ्या, ध्वनिक्षेपकावर मोठ्याने संगीत वाजवणाऱ्या, असंबद्ध बोलणाऱ्या नेत्यांना, तारखांच्या दुष्टचक्रात अडकवणाऱ्या न्यायालयीन यंत्रणेला, तक्रार दाखल करुन तपास न करणाऱ्या पोलिसांना, अशा सर्व महाभागांमुळे तुमच्या संयमाला पदोपदी आव्हान दिले जाईल, अशावेळी तुम्ही संकल्पाची जादुई अक्षरे लक्षात ठेवा. लोकशाहीत मान मिळाला नाही तरी अपमानाची हमी असते, हे लक्षात ठेवून ‘थंरमाक’ ची जपमाळ ओढत रहा.
या संकल्प सिद्धीसाठी नवनवीन संधी शोधण्याची गरज नाही. ती तुमच्या दारात सदैव हात जोडून उभीच असेल. २०२४ चे जेव्हा तुम्ही स्वागत कराल तेव्हा तुम्हाला नवा जन्म मिळाल्याचा अद्भुत आनंद मिळालेला असेल. पाहिजे तर रोजच्या कटकटींवर मात करण्यासाठी थंड रहा, माफ करा हा अक्सीर इलाज आहे असा समजा. हा संकल्प ‘ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेंड’ आहे. सीमेवर आगळिक करणाऱ्या शेजारी राष्ट्रांवर आपल्या सरकारने ह्या संकल्पाचा वर्षानुवर्षे यशस्वी वापर केला आहे. खास भारतीय बनावटीचा हा संकल्प टिकाऊ आहे. तो चिनी अजिबात नाही. त्यामुळे तो अल्पजीवी तर नाहीच नाही!