रंग ‘यांचा’ वेगळा !

निवडणुका जवळ आल्यामुळे आमच्या प्रभागातील नगरसेवक अचानक खूप दानशूर वगैरे झाल्याचा प्रत्यय या मतदारांना येऊ लागला आहे. नगरसेवकांत झालेला हा बदल आम्हाला दिवाळीपासून जाणवू लागला. अहो दोन किलो साखर, एक लिटर तेल, मैदा, बेसन, रवा आणि त्याबरोबर काजू-किसमिस-बदाम-खारीक यांचे एक पाकीट असा फराळाचा जिन्नस घरोघरी त्याने धाडला. त्यामुळे गृहिणींसाठी फराळाची रेडीमेड सोय तर झालीच पण अनेक वर्षांपासून हरवलेला रेडीमेड भाऊही मिळाला. बजेट संपल्यामुळे असेल किंवा कल्पकतेला ओहोटी लागली म्हणून बहुदा जंगी भाऊबीजेचा कार्यक्रम त्यांनी ठेवला नाही. पण अभ्यंगस्नानासाठी लागणारे उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण, चार पणत्या आणि सोबत कंदील या वस्तूही त्यांनी पाठवल्या.  नगरसेवकाने मग जिंकण्याची कसर सोडली नव्हती. अर्थात प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा वास काढून आनंदाला मुकणे म्हणजे करंटेपणाचेच. मी तसा अजिबात विचार केला नाही. चार वर्षे फराळाचे साहित्य का पाठवले नाही किंवा याच वर्षी कंदील का पाठवला अशा कुचकट चिकित्सांना मी दाराबाहेर ठेवले आणि त्यामुळे घरात आनंदीआनंद अनुभवला. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे मतदारांची सलगी वाढवण्यासाठी आमचे नगरसेवक महाशय चक्क आमच्या सोसायटीत येऊन आमच्याशी रंगपंचमी खेळले ! सोबत लहान मुलांसाठी पिचकाऱ्या आणायला ते विसरले नाहीत. होळीसाठी लागणारे सर्व साहित्य उदाहरणार्थ लाकडे, हार, नारळ, मिठाई वगैरे त्यांनी पाठवले होते आणि काका लोकांसाठी दुसऱ्या दिवशी सणाची रंगत वाढवणार्‍या द्रव्यांचाही बंदोबस्त केला होता ! 

मी नगरसेवकाला त्याच्या या औदार्याबद्दल छेडले. ‘अहो तुम्हीच म्हणता ना, की आम्हाला नगरसेवक तोंड दाखवत नाही, आमच्याकडे फिरकत नाही की आम्हाला ओळख देत नाही, कोणाला अशी तक्रार करण्याची संधी मिळू नये यासाठी हा खटाटोप.’  

नगरसेवकाचा खुलासा पटण्यासारखा असला तरी हा सुविचार त्याने निवडून आल्यानंतरच्या चार दिवाळा आणि अन्य सणवार आला आला नव्हता याची खंत व्यक्त केली. 

‘अहो राजकारणात प्रत्येक गोष्टीला टाइमिंग असते. चार वर्षे मी लाडू-चकल्या-करंजी-चिवडा वाटत बसलो असतो तर निवडणुकीत त्यांची आठवण तरी राहिली असती का? पब्लिक मेमरी शॉर्ट असते असे तुम्हीच तर नाही का म्हणत. त्या दृष्टीने आम्ही विचार केला तर कुठे बिघडले? 

अशा वागण्यात चांगुलपणापेक्षा स्वार्थच डोकावतो, असा मुद्दा मी उपस्थित केला तेव्हा नगरसेवक म्हणाला, ‘अहो स्वार्थ आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणण्याचे दिवस तेव्हाच संपले, जेव्हा ही नाणी चलनातून झाली तेव्हा आता त्याचे नाणे खणखणीत समजले जाते तो मतदारांच्या सणवारात सहभागी होतो. मी तर शाळेच्या प्रवेशापासून धार्मिक सहलींच्या आयोजनापर्यंत औषधे उपलब्ध करून देण्यापासून लस देण्यापर्यंत मदत करीत असतो. मतदार सलामत तो पगडी पचास ! 

नगरसेवकाचे खुसपट विचार ऐकून मला त्या सर्व टीकाकारांचा मनोमन राग येऊ लागला होता. उगाच दांभिक, भ्रष्ट, स्वार्थी, मतलबी अशी शेळकी विशेषणे लावून नगरसेवकांना बदनाम केले जात असते. अहो त्यांची चकली खाऊन त्यांच्याशी दगाबाजी करणे हा खोटारडेपणा नाही का? 

नगरसेवकाचा एकूण दृष्टिकोनामुळे मी पुरता भारावून गेलो होतो. माझे सर्व गैरसमज गळून पडले होते. मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती. तो निवडून यावा या काळजीपोटी मी त्याला एकच सल्ला दिला, ‘बाबा रे तू छान काम करतोयस. तुझा चेहरा आम्ही मतदान यंत्रावर तुझ्या नावासमोरचे बटण दाबेपर्यंत लक्षात ठेवावा असे वाटत असेल तर एक कर, आज तुझ्या चेहऱ्यावर जे रंग आहेत ते काढू नकोस. अन्यथा तुझ्याऐवजी भलत्यालाच कौल मिळायचा.’ 

‘काका काळजी करू नका. आता सर्वांचे चेहरे अर्धेअधिक मास्कने झाकलेले असतात. त्यामुळे परिचित माणसेही ओळखेनाशी होतात. माझी ओळख मी चांगले काम करून दाखवली आहेच, तोच माझा चेहरा असेल. तेवढा काय तो लक्षात ठेवा. हॅपी होळी… असे बोलून तो निघून गेला. नगरसेवकांचा रंग वेगळाच असतो हे मला या निमित्ताने समजले होते !