फुकट जाणाऱ्या मतांचे काय?

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत काढलेल्या उद्गाराने राजकीय निरिक्षकांचे लक्ष वेधले असून त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ‘मला लोकांनी फुकट घालवले,’ असे ते म्हणाले. ज्यांना राज ठाकरे यांच्या कुवतीबद्दल तिळमात्र शंका नाही, ज्यांना त्यांच्यात एक ‘वेगळा’ राजकारणी दिसतो, ज्यांना राजकारणातील दांभिक नेत्यांबद्दल चिड आहे आणि ज्यांच्या मनात कधी ना कधी राज यांच्याप्रमाणेच भावना उत्पन्न होते, त्या सर्वांना राज यांचे म्हणणे समर्थनीय वाटू शकेल. जे राज यांचे टीकाकार आहे ते मात्र त्यांचा हा युक्तीवाद अपयश झाकण्याचा प्रकार समजून पलायनवादाचा आरोपही करतील. या विधानांचा राजकीय अन्वायर्थ कसाही निघू शकतो, परंतु ज्यांना महाराष्ट्राचे भले व्हावे हे प्रमाणिकपणे वाटते, त्यांना राज यांचा आक्षेप व्यवस्थेवर जरी असला तरी त्यांच्यावर ‘अन्याय’ करणाऱ्या जनतेवरही येतो. या जनतेचे आपणही अंश आहोत आणि मग आपणही राज यांना फुकट तर घालवले नाही, अशी शंका त्यांच्या मनात येऊ शकते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन आता दीड दशक लोटले आहे. ज्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापन झाली त्यामुळे राज यांच्याबद्दल जितके कुतुहूल होते तेवढे कौतुकही होते, सहानुभूती होती तसे समर्थनही होते. मतदारांचा कौल त्यांना मिळू लागला होता आणि ज्या मूळ संघटनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र चूल मांडली होती तिला हलके-हलके का होईना हादरे बसू लागले होते. अर्थात या हादऱ्यांचे रूपांतर राजकीय भूकंपात होईल ही अपेक्षा फोल ठरली आणि शिवसेनेने महाविकास आघाडी बनवून सत्ता काबिज केली. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्यांच्याकडे राज्याची सूत्रे हाती येण्यास तीन दशके वाट पहावी लागली होती. त्या काळात स्वर्गीय बाळासाहेबांच्या मनात राज यांच्या मुखातून निघालेल्या उद्गारांची ठिणगी निर्माण झाली नसेल? सत्तेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचे निम्मे अंतर राज यांनी आता कुठे कापले असून त्यांच्या मनात ही भावना का यावी, हे कळत नाही. झटपटच्या युगात बुलेट ट्रेन पुढे नेण्यासाठी मनसेचे इंजिन कमी तर पडत नसेल? त्या दृष्टीकोनातून राज यांना विचार करावा लागेल. इंजिन ड्रायव्हर, रूळाची क्षमता, भूपृष्ठाचे चढ-उतार, वाटेत लागणाऱ्या कोणत्या स्थानकांवर थांबायचे, कधी कोणते थांबे सोडून द्यायचे वगैरेंचा विचार करीत असतो. त्याला दिलेले वेळापत्रक त्याला पाळायचे असतात. त्यामुळे ट्रेन नेमक्या वेळी, नेमक्या फलाटावर कोणताही अपघात न होता वेळेत पोहोचत असते. प्रवासाची ही रूपरेषा राज यांना परिस्थितीनुरूप बदलावी लागणार आहे.
राज हे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भाषा बोलतात असा त्यांचा लौकिक झाला आहे. त्यामुळेही असेल या ‘इंजिन-ड्रायव्हर’ बद्दल अनेकांच्या मनात आजही इप्सित स्थळी पोहोचण्याची आशा आहे. त्यांना राज यांचे उद्गार व्यथित करू शकतील. त्यांनी राज यांच्यातील ‘फायटर’ ला सलाम केला होता. त्यांच्याकडून अपेक्षा बाळगल्या होत्या. पण केवळ सहानुभूतीने आणि सभांना होणाऱ्या गर्दीने निवडणुका जिंकता येत नाही हे जनतेला कळले नाही.निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना राज यांनी जनतेला आपल्याला पुन्हा फुकट जाऊ देऊ नका असा निर्वाणीचा इशारा तर दिला नसावा? जनता हा अर्थ अभिप्रेत धरून मनसेच्या पारड्यात मत टाकणार आहे काय? सहानुभूती, सभांची गर्दी आणि मतपेटीतून प्रत्यक्षात मिळणारे समर्थन यांभोवती नेत्यांना फुकट घालवणे वा सत्तेची चावी देणे याभोवती राजकारण फिरत असते. त्यासाठी राज यांना निवडणुकीपूर्वी एक नवी रूपरेषा (त्या ब्ल्यू-प्रिंट म्हणा की रेल्वेच्या परिभाषेतील टाईम-टेबल म्हणा) बनवावी लागणार आहे. काय सांगावे त्यांना आपल्या इंजिनला भाजपाचे योग्य प्रमाणात डबेही जोडावे लागतील, काय सांगावे उभयतांना इंजिन चालवत अंतर कापावे लागेल, कदाचित सत्तेचे स्थानकापर्यंत पोहोचण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होईल. अशा वेळी फुकट घालवल्याची भावना कुठल्या तरी अनोळखी स्टेशनप्रमाणे मागे पडली असेल! प्रत्येक राजकीय पक्षाने, सत्तेत असणाऱ्या वा नसणाऱ्या, एक लक्षात घ्यायला हवे की निवडणूक आल्यावर अपेक्षाभंग करणारे पक्ष मते फुकट घालवत असतात आणि आपल्याला पक्षांनी वाया घालवले ही भावना त्यांच्या मनात घट्ट होत असते. जनतेच्या मनातील हे शल्य राज यांच्यासारख्या नेत्याच्या मनात येत असेल तर त्यांची गाडी आजही लोकभावनांच्या रूळावर आहे, असेच म्हणावे लागेल !