जे अटळ आहे, त्याला सामोरे जावे लागणारच, असे उद्गार कोणी थोर विचारवंताने काढलेले नाहीत, तर ते सर्वसामान्य जनता काढत असते. सकाळ-संध्याकाळ आणि मध्यरात्रीही बायकांवर पाचकळ विनोद करणारे नवरे, बायकोच्या जेवणावर अथवा तिच्या माहेरच्या आगंतुक म्हणून टपकणार्या पाहुण्यांबद्दल असे उद्गार काढणारे या सुविचाराचे जनक असतील तर तेही साफ चुकीचे आहे. तात्पर्य, हे थोर विचार वाहतूक-कोंडीत अडकणारे हजारो ठाणेकर मनातल्या मनात तर कधी उच्चारवात आणि काहीच नाही तर शेजारच्याला संभाषणात सहभागी करुन घेण्यासाठी त्याला ऐकू येईल एवढ्याच आवाजात काढत असतात. दररोज सकाळ-संध्याकाळ बटाटवडे न कंटाळता खाणारे चुकुनही असे उद्गार काढणार नाहीत. परंतु कोंडी म्हणजे खमंग बटाटा-वडा किंवा तितकाच खमंग नसला तर उकडीच्या मोदकाचा चिनी अवतार अर्थात मोमोज नव्हे. त्याचा कंटाळा येण्यापेक्षा वीट आल्यामुळे हजारो त्रस्त नागरिकांनी वाहतूक कोंडीशी अखेर दोस्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अटळ आहे म्हणून फक्त त्यास सामोरे का न जावे किंवा सहिष्णुततेचा रबरबॅण्ड तुटेपर्यंत ताणण्यापेक्षा तो एन्जॉय करण्याची शक्कल ठाणेकरांनी लढवली आहे.
आमचे एक स्नेही वाहतुक कोंडीकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहू लागले आहेत. कोंडीत अडकल्यावर त्यांच्या तोंडून आता चक्क ‘अरे व्वा’ असे उद्गार निघतात. तुम्हाला वाटेल की या गृहस्थांना तातडीने मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याची गरज आहे. पण नाही. त्यांना कोंडीमुळे मन:शांती लाभू लागली आहे. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले, अहो कोंडीत अडकल्यावर किमान अर्धा-पाऊण तासाची निश्चिंती असते. त्या वेळेत मी माझी ध्यानधारणा, प्राणायाम, कपालभाती वगैरे योगाचे प्रकार बसल्या जागी करतो. ज्या दिवशी उभे रहाण्याची वेळ येते तेव्हा मी ताडासन करुन मोकळा होतो. कोंडी हा योगायोग नसून तो योगसाधनेची संधी आहे !’
‘कोंडीमुळे माझा मित्रपरिवार वाढला. आमचा चक्क एक ग्रुप बनला आहे. एकमेकांची दु:खे शेअर करतो तसे विनोदही. वेळ कसा जातो हे समजत नाही. काल वाहतूक कोंडी लवकर फुटल्यामुळे आम्ही बस-स्टॉपवर गप्पांचा फड जमवला. लवकर घरी गेलो असतो तर कोणाच्याच बायकोने नवर्याला ओळखले नसते!’ विनोदबुद्धीला किती बहर आला आहे, हे मला जाणवत होते.
आमच्या परिसरातील महिलांनी तर भिशी सुरु केली आहे. कोंडीमुळे त्या मैत्रिणी झाल्या आहेत. लवकरच नवरात्रानिमित्त भोंडला आणि गरबा यांचा कार्यक्रम त्या आयोजित करण्याचा विचार करीत आहेत. ही सर्व माहिती आपल्या बायकोने सांगितली. अलिकडे ती नवनवीन पदार्थ करु लागली आहे. कोंडीत अडकलेल्या मैत्रिणी रेसिपी शेअर करु लागल्या आहेत. त्यामुळे भोपळ्याचे भरीत ते मशरुम खिमा अशा रेंजचे पदार्थ आमच्या घरी होऊ लागले आहेत. सिटवरुन भांडणे इतिहासजमा झाली आहेत. उलट भाज्या निवडण्यात या सख्या एकमेकींना मदत करु लागल्या आहेत!
गेल्या महिन्यात तर काही महिलांनी बसमध्येच ड्रायव्हर-कंडक्टर यांना ओवाळून राखी पौर्णिमा साजरी केली. प्रवाशांच्या एका गटाने तर बसमध्ये सार्वजनिक गणपती बसवला. भजन-कीर्तन असे कार्यक्रम करण्याची योजना आखली जात आहे.
ज्यांना वाचायला आवडते, त्यांच्यासाठी एका खासगी बसवाल्याने सुसज्ज ग्रंथालय सुरु केले आहे. ‘वाचन-कट्टा’सारखा उपक्रम या वाहतूक कोंडीच्या पोटी जन्माला आला आहे!
काही तरुण प्रवाशांनी हॅशटॅग कोंडी, असा एक ग्रुप फॉर्म करुन सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह, युट्यूब, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सकारात्मक कामांना सुरुवात केली आहे. कालच त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर ठाणे रेल्वे स्थानक ते धर्माचा पाडा या मार्गावरील बसमध्ये एका चर्चा सत्राचे आयोजन केले होते. बरीच मते रशियाच्या विरुध्द होती. तद्वत चीनच्या अगोचर वागण्यावरही संतप्त भावना ट्विटरवरून सुरू झाल्या असून त्याचा उगमही कोंडीत अडकलेल्या विविध बसेसमध्ये असल्याची खबर उपग्रहाद्वारे चीन आणि रशिया या देशांच्या सरकारांना लागली आहे. यांचा एक फायदा असा झाला आहे की या दोन्ही देशांनी भारतातील विविध शहरांमधील कोंडी फोडण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. देश काँग्रेसमुक्त होण्याऐवजी कोंडीमुक्त करा, अशी सह्यांची मोहीम काल एका कोंडीत अडकलेल्या बसमधून सुरु झाली म्हणे.
ता.क. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर बसमध्ये अडकलेल्या एका पुणेकराने उभ्या-उभ्या पंतप्रधानांना ट्विट केले. आमचे कारखाने गुजरातमध्ये नेत असाल तर थोडी कोंडीही घेऊन जा की !