महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात सुरू असलेल्या वाक़युध्दामुळे वर्तमानपत्रांना दररोज बातमी जरी मिळत असली तरी त्यांच्या भांडणाचा महाविकास आघाडी टिकण्यात वा मोडण्यात काडीचाही उपयोग होणार नाही. एकमेकांची उणीदुणी काढून झाल्यावर दोघेही अंतिम निर्णय त्यांचे पक्षश्रेष्ठी घेतील असे न विसरता सांगतात. आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की स्वबळावर हे ठरवण्याचा अधिकार म्हस्के-परांजपे यांना नाही. उद्या कदाचित एकत्र निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर या दोघांची पूर्णपणे गोची झाली असेल! तुर्तास तशी शक्यता नाही कारण निवडणूक स्वतंत्रपणे लढणे यातच सर्वांचे हीत आहे हे नेत्यांना उत्तम ठाऊक आहे. सत्तेसाठी पुढे एकत्र येणे ही बाब अलाहिदा, परंतु तुर्तास या दोन तरुण आणि अभ्यासू नेत्यांनी आपली शक्ती निरर्थक भांडणात वाया न घालवणे हेच शहाणपणाचे ठरेल.
राज्यात एकत्र नांदत असताना स्थानिक पातळीवर घटस्फोटाच्या बाता कशाला हा प्रश्न जनतेच्या मनात येत असून त्यामागे राजकारणातील दांभिकपण हेच कारण असू शकते,असा अनुमान काढून जनता मोकळी होत आहे. भांडणाचे नाटक मग कशाला, हा प्रश्न राहतोच, हे वेगळे सांगायला नकोच. पण मग तरीही इतके साधे सोपे राजकारण म्हस्के-परांजपे यांना समजत नसेल, असेही म्हणता येणार नाही. म्हस्के हे मुरलेले राजकारणी आहेत तर परांजपे माजी खासदार! तरीही दोघे जण एकमेकांचा एक शब्दही पडू देत नाहीत. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्यावर पुढे राष्ट्रवादीत पक्षांतर केल्यामुळे परांजपे यांच्यावर शिवसेनेचा राग आहे. त्यातूनच तर म्हस्के तोंडसुख घेत नसावेत? ज्या पक्षाने अवहेलना केली म्हणुन पक्ष सोडण्याची पाळी आली हे शल्य परांजपे यांना शिवसेनेला शिंगावर घेण्यास प्रवृत्त करीत नसावे? तसे पाहिला गेले तर या भांडणांचा परिणाम फार दूरगामी असू शकणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी मोडकळीत निघण्याची वातावरणनिर्मिती तरी होईल काय, याबद्दल मात्र शंका आहे. असे असूनही ना पालकमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आपापल्या नेत्यांना शांत बसण्यास सांगत आहेत. याचा अर्थ भाजपाला गुंगारून ते राजकीय खेळी तर करीत नसावेत? भांडतायत तर भांडू दे, नाही तरी स्वबळाने मतदारांना सामोरे जायचे आहेच, ही त्यामागची विचारधारा असू शकते. शिंदे-आव्हाड एकमेकांसमोर उभे ठाकू शकत नाही. शेवटी ते मंत्रिमंडळात एकमेकांचे सहकारी आहेत.ती उणिव म्हस्के-परांजपे भरून काढत आहेत.
मुळात राष्ट्रवादी काँग्रेसलाच शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासमवेत निवडणूक लढवणे मानवणारे नाही. राष्ट्रवादीचे सर्वात मोठे बलस्थान त्यांचा आक्रमकपणा आहे. त्यामुळे त्यांनी बालेकिल्ल्यात बऱ्यापैकी मुसंडी मारली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संघर्ष केल्याशिवाय गत्यंतर नाही हे ना. आव्हाड यांनी पूर्वीच ओळखले होते. प्रमुख विरोधी पक्षाची स्पेस राष्ट्रवादीनी काँग्रेसला हातून कधी खेचून घेतली होती आणि महाविकास आघाडीचे लोढणे नसते तर त्यांनी सत्ता मिळवण्याचे प्रयत्नही केले असते. अशा वेळी संघर्ष करायचा तर कोणी तरी तोलामोलाचा नको का हा राष्ट्रवादी विचार परांजपेंना उद्युक्त करीत आहे. मग भाजपाशी टक्कर का नाही? उभयतात तर विस्तवही जात नाही. परंतु राष्ट्रवादीला ठाण्याचा बालेकिल्ला जिंकायचा होता आणि त्याच्या किल्ल्या सेनेकडेच आहेत ना? त्यात पुन्हा त्या दोघांची पूर्वी युती असल्याने, मोठ्या भावाशी पंगा घेणे राष्ट्रवादीने पसंत केले. हा आक्रमकपणाच त्यांची ओळख आहे आणि ती त्यांना ठाण्यात वाढण्यासाठी गमवायची नाही. त्यामुळे परांजपेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी तलवारीला धार चढवत आहे असे म्हणता येऊ शकेल. परांजपे यांच्याही मनात सेनेबद्दल रोश आहेच, त्यामुळे तलवारीला आयती मूठही आहे.
परांजपे यांनी सेनेशी प्रतारणा केल्याचा राग पालकमंत्री म्हणुन ना. शिंदे यांना आहेच. त्यामुळे म्हस्के अप्रत्यक्षपणे आपल्या नेत्याच्या गूड-बुक्समध्ये येत आहेत. तशी त्यांना गरज आहे. कारण ठाण्यातून ते आमदारकीचे उमेदवार असू शकतील. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील असे प्रत्येक भांडणानंतर म्हस्के-परांजपे आवर्जून सांगतात. असे आहे तर बाबांनो भांडता का? नेते बघून घेतील ना. त्यापेक्षा नागरी सुविधांबाबत नागरीकांच्या तक्रारींना तोंड फोडा की. काय सांगावे आगामी विधानसभा निवडणुकीत म्हस्के-परांजपे आमने-सामने उभे ठाकतील. तेव्हा काही नागरी प्रश्न सोडवल्याचे श्रेय त्यांच्या उपयोगही पडेल! पण त्यावर हे अवाक्षरही काढत नाहीत.पन्नाशीतल्या या दोन्ही नेत्यांकडून बरीच अपेक्षा आहे. पुढील दहा वर्षे प्रकाशझोतात रहायचे असेल तर त्यांनी भांडण्यात वेळ न घालवलेलाच बरा!