फांदी नाही, कुटुंब उन्मळून पडले!

उत्साहात, अतिशय छान पद्धतीने साजरा झालेल्या गणेशोत्सवास शेवटच्या दिवशी गालबोट लागावे हे वाईटच. कोलबाड येथील गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेच्या अंगावर फांदी काय पडावी आणि तिचा मृत्यू व्हावा याहून दुर्दैवी विरोधाभास नाही. ज्या श्रद्धेने ही महिला बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला गेली होती, तिथे तिला मृत्यूने गाठावे यास काय म्हणावे? ती स्वतः मृत्यूच्या दाढेत चालत गेली नव्हती. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाची ती बळी ठरली. यावर येणारे काही दिवसच स्वत:ला संवेदनशील वगैरे समजणारा समाज चर्चा करील आणि कालौघात या महिलेच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणीच हळहळ व्यक्त करणार नाही. इथे प्रसंग एक फांदी पडून एका महिलेचा मृत्यू होणे एवढा मर्यादित नसून एक अवघे कुटुंब उन्मळून पडले आहे. या कुटुंबाची अवस्था या महिलेवाचून कशी आहे याचा अनुभव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आणि त्यांच्या मनात यत्किंचितही सहृदयता असेल तर ते येणाऱ्या तक्रारींची तातडीने आणि गांभीर्याने दखल घेऊ लागतील.
दरवर्षी पावसाळ्यात वृक्षांची ही पडझड सुरुच असते. यावर काही उपाययोजना केली जात असेल तर ती पुरेशी नाही. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची मूळे वाढण्यास अडचणी येऊ लागल्या आणि वादळवाऱ्यासमोर टिकाव धरण्याची त्यांची क्षमता क्षिण झाली. झाडांची योग्य काळजी घेतली गेली असती तर हा धोका टळला असता. फांद्यांच्या बाबतीत तर आणखी विचित्र प्रकार. फांद्या छाटण्याची परवानगी देण्यात आधी चालढकल, अर्जाबरोबर फोटो जोडण्याची अट, हे सर्व सोपस्कार केल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईत दिरंगाई असा एकुण या खात्याचा कारभार. सर्वसामान्य नागरीकांना ही वागणुक देणारे हेच खाते वृक्षांची कत्तल होते तेव्हा निमुटपणे पहाते, अशी तक्रार असते. या कार्यपद्धतीमुळे टाळता येणाऱ्या दुर्घटना होतात. अशा वेळी कोणता खुलासा करून आपल्या अक्षम्य चुकीवर महापालिकेचे अधिकारी पांघरूण घालणार आहेत?
पावसाळ्यापूर्वी न चुकता नालेसफाई करणारी महापालिका झाडांच्या बाबतीत काय खबरदारी घेत असते?
तीन-साडेतीन हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या ठाण्याला स्मार्ट होण्याचे वेध लागले आहेत, परंतु जनतेच्या दैनंदिन प्रश्नांकडे मात्र पुरेसे लक्ष दिले जात नाही. तक्रारीचे तत्परतेने निवारण होते हा विश्वास जनतेला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट झाले असे म्हणता येऊ शकेल. बाकी सर्व बकवास आहे. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे ठरते.
मृत महिलेच्या घरी सांत्वनासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सद्सदविवेक बुद्धीला आवाहन करून कार्यपद्धतीत बदल करून भविष्यात कुटुंब नावाचे वृक्ष उन्मळून पडणार नाही याची काळजी घ्यावी. बाप्पा त्यांना तेवढी बुद्धी देईल असे वाटते.