कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हैदोस घालायला सुरूवात केल्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडणे स्वाभाविक आहे. परंतु शिवसेनेच्या, खास करून पन्नाशी पार केलेल्या नगरसेवकांची झोपही उडाली आहे. त्यास मात्र ओमायक्रॉन जबाबदार नसून त्यांच्या पक्षात येऊ घातलेल्या ‘आदित्य पॅटर्न’ कारणीभूत आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यातील ६७ नगरसेवकांपैकी जवळ-जवळ ४५ नगरसेवकांवर घरी बसण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचबरोबर शिवसेनेतील तरुणाईत नवचैतन्य सळसळू लागले असेल तर त्याचेही नवल नाही.
राजकारणात मक्तेदारी आणि घराणेशाही यामुळे साचलेपण येत असते. त्यामुळे राजकारण्यांचा फायदा होत असला तरी त्यांच्या स्थिर झालेल्या आत्मसंतुष्टपणामुळे जनतेच्या अपेक्षांची जाहीरनाम्याच्या गुळगुळीत संगमरवरी पानांत कबर होऊन जात असते! या अपेक्षाभंगामुळे विद्यमान सत्तारूढ पक्षाला ‘अॅन्टी-इन्कम्बन्सी’ चा फटका बसत असतो, तो वेगळाच. श्री. आदित्य ठाकरे यांच्या मनात तरुणांना संधी देण्यामागे हा विचार असेल काय हे सांगता येणार नाही, परंतु तो पक्षातील ज्येष्ठांच्या गळी उतरविण्याचे आव्हान मात्र त्यांच्यासमोर असणार आहे.
शिवसेनेच्या इतिहासाची नोंद ठेवणाऱ्या मंडळींना आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचे बिज २००३ मधील घटनांमध्ये दिसली तर ते बरोबर आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी श्री. उद्धव यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. या घेषणेचे स्वागतही झाले होते. पटला नसेल तरी जाहीरपणे त्याविरोधात बोलण्याची कोणाची टाप नसे. परंतु पडद्यामागून नाराजीचे धुसर सूरही उमटले होते. पक्षातील तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांना सेनाप्रमुखांचा हा निर्णय रूचला नव्हता. यथावकाश मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पसंतीचे, अर्थात तरुण रक्तास रिंगणात वाव दिला. या निर्णयानंतर राज ठाकरे नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतंत्र चूलही मांडली वगैरे घटनाक्रम सर्वज्ञात आहे. शिवसेनेत शिस्तीचा बोलबाला असतो, ‘आदेश’ अंतिम असतो, वगैरे बाबी आता हळूहळू इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. अनंत गीते, रामदास कदम वगैरे मंडळींची अलिकडची वक्तव्ये पूर्वी नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे आदींच्या मानसिकतेची आठवण करून देणारी आहेत. २००३ आणि २०२२ या १९ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडीच्या मंडपात स्वतःला बोहल्यावर चढवले. शिवसेनेतील शिस्तीला मागे टाकत करवली असणारी सत्तेची आकांक्षा नववधू झाली! एकेकाळी पक्षांतर्गत लोकशाही खपवून न घेणाऱ्या पक्षात आता लोकशाहीच्या नावाखाली अनिर्बंध स्वातंत्र्याचा उच्चार नेते करू लागले आहेत. रिमोट कालबाह्य झाले काय असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. सत्तेत संधी न मिळाल्याची खदखद त्यामागे असेलही. पण महापालिका निवडणुकीत स्वतःचे (बंडखोरीचे) रंग दाखवण्याची संधी ही मंडळी सोडणार नाहीत. उद्धव ठाकरे यांनाही त्रास झाला होता, पण त्यातून त्यांनी स्वतःला निभावून नेले होते. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचा कस आता लागणार आहे. सैनिकांमधील सत्तेची चटक त्यांच्यासाठी तापदायक ठरू शकणार आहे.
संघटनेपेक्षा सत्ताकेंद्र मोठे ही धारणा शिवेसेनेत रुजू लागली आहे. ते कोणाचा मुलाहिजा ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत. रामदास कदम यांचेच बघा,काय म्हणाले ते: जी मंडळी नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत ती कॅबिनेट मंत्री होतातच कशी, हा त्यांचा सवाल झलक आहे.आदित्य पॅटर्नला विरोध करणाऱ्याच्या हाती अशा असंख्य प्रश्नांचे कोलित असणार आहे.
शिवसेना असो की अन्य कोणताही राजकीय पक्ष, तेथील तरुणांच्या मनात जागा अडवून बसणाऱ्या आणि घराणेशाहीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांबद्दली अढी असते. हा आकस एकेकाळी आता ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांच्या मनातही होता. ‘आम्ही किती वर्षे सतरंज्या उचलायच्या किंवा भिंतीवर पोस्टर लावत फिरायचे’ असा त्यांचा सवाल असे. त्यापैकी अनेक जण सतरंज्या उचलत आधी सत्तेच्या आणि मग संघटनेच्या परिघाबाहेर अक्षरशः फेकले गेले. जे बचावले ते सत्तेच्या किनारी लागले. आता मात्र निसर्गनियमाप्रमाणे समुद्र जसे दर पावसाळ्यात नको असलेल्या वस्तू किनाऱ्यावर आणून फेकून देतो तशी त्यांची अवस्था आदित्य पॅटर्नमुळे होणार आहे. त्यामुळे ते व्यथित झाले आहेत. त्यात पुन्हा राज्यातील नव्या राजकीय समिकरणामुळे तिकिट मिळण्याची आशा एक तृतियांश होण्याची भीती आहेच. इतकी वर्षे प्रामाणिकपणे ज्या पक्षाची सेवा केली तिथे इतकी अनिश्चितता निर्माण होणे ‘आदित्य पॅटर्न’ समोर पेच निर्माण करू शकते.
एकुणातच नव्या रक्ताला संधी देताना ज्येष्ठांचा अनुभव आणि निष्ठा यांना युवा नेते आदित्य ठाकरे कसे तोलणार यावरच त्यांच्या पॅटर्नचे भवितव्य ठरणार आहे!