ठाण्याचे काय होणार ?

सत्तांतर नाट्यामुळे उडालेली धूळ आता बसू लागेल तेव्हा राजकीय गुंतागुंतीचे अनेक मुद्दे डोके वर काढतील. या महानाट्याचे महानायक ठाण्याचे श्री. एकनाथ शिंदे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात नवीन राजकीय समीकरणे कशी उलगडत जातील हे पहाणे कुतुहलाचे ठरेल. श्री. शिंदे यांना त्यांच्या होम पिचवर अपेक्षित असा विरोध झाला नाही, हे लक्षात घेतले तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाणे शहरात शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार आणि श्री. शिंदे यांना टक्कर कोण देणार हे मुद्दे आता चर्चाविश्‍वात फिरू लागले आहेत. शिवसेना, शिवसेना (फुटीर) आणि भाजपा यांच्यात सत्तेसाठी प्रयत्न होणार. त्यांचा मुकाबला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी प्रामुख्याने, आणि मनसे काय भूमिका घेते यावर अवलंबून असणार आहे. तूर्तास तरी शिवसेनेची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल याबाबत संदिग्धता आहे. भाजपाला आगामी काळात महापौर होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि त्यांची भिस्तही शिंदे यांच्या शिवसेनेशी युती होणार या शक्यतेवर अवलंबून दिसते. शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सत्तांतर झाल्याचा मोठा जल्लोष केला. भाजपाची ताकद पुढच्या महापालिका निवडणुकीत वाढलेली दिसेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राजकारण हे नेहमी प्रवाही असते. युती असताना जो आशावाद डावखरे आता जागवत आहे,तो शिवसेनेबरोबर शक्य नव्हता. शिंदे यांची शिवसेना त्यांना अधिक जवळची वाटू लागली आहे.असो. या गतीने भाजपा शिवसेनेने पूर्वी काढून घेतलेली खासदारकी मागितली तर आश्चर्य वाटू नये.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक संकल्प सोडला, आपण पुन्हा सेना-भवनात बसून पक्षाची विस्कटलेली घडी नीट करून नव्या दमाची संघटना निर्माण करू. कट्टर शिवसैनिकांनी श्री. ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. अनेक वर्षांपूर्वी ठाण्यापाठोपाठ मुंबईत भगवा फडकवणार्‍या शहरापासून श्री. ठाकरे यांच्या संकल्पपूर्तीची सुरुवात करायचे ठरले तर पहिला प्रश्‍न एकनाथ शिंदे यांच्या तोडीच्या नेत्याची नेमणूक करणे. शिवसेनेत बाळासाहेबांच्या नावाचा जो दबदबा आहे तोच ठाण्यात आनंद दिघे यांच्या नावाचा आजही आहे. गोम अशी आहे की या दोन्ही दिवंगत सेना नेत्यांबदल श्री. शिंदे यांनी अपार श्रद्धा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे स्मरण केल्यामुळे दिघे यांच्या नावाने जे भावनिक आवाहन करता आले असते, ते करण्यात शिवसेनेसमोर अडचण येऊ शकते. वास्तविक पाहता या दोन्ही नेत्यांबद्दल असलेला नितांत आदर त्यांना मक्तेदारीच्या बेड्यांमध्ये अडकवू शकत नाही. ते सर्वमान्य होते. अर्थात केवळ नावांचा वापर करून हेतू साध्य करणे इष्ट होत नसतो. या दोघांना अभिप्रेत कार्य त्यांच्या अनुयायांनी करावे ही अपेक्षा आहे. जो त्याबाबतीत अधिक प्रामाणिक असेल त्याला या नेत्यांच्या पुण्याईचा निश्‍चितच लाभ होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर कोणती शिवसेना सरस ठरणार हे पहाणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेला अशा खंबीर आणि सक्रिय नेतृत्वाची गरज आहे. श्री. शिंदे यांच्या प्रभावाला पुरून उरणारे नवे नेतृत्वच बालेकिल्ल्याचा लौकिक अबाधित ठेवेल. सध्या या पदासाठी एकच नाव दिसते आणि ते म्हणजे खासदार राजन विचारे यांचे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहा मतदार संघांमधील त्यांचे ‘नेटवर्किंग’ त्यांच्या उपयोगास येऊ शकते. कै. दिघे यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती, हेही लक्षात घ्यावे लागेल.
भाजपाची ताकद ठाणे जिल्ह्यात वाढत आहे. २०१४ साली त्यांचे सात आमदार होते, २०१९ मध्ये त्यात एकाने वाढ झाली आहे. या उलट सेनेची एक जागा कमी होऊन पाच झाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी झाल्या होत्या. मनसे आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. राज्याची टक्केवारी पाहिली तरी भाजपाचा आलेख चढता आहे आणि गेल्या काही दिवसांतील त्यांच्या आक्रमकपणा पाहता त्यांना महाविकास आघाडीतील अन्य दोन घटक पक्षांपेक्षा सेनेला लक्ष्य करण्यात अधिक रस दिसतो. अर्थात या कामात त्यांना एकनाथ शिंदे गटाची मदत होईल असा अंदाज दिसतो. अशा परिस्थितीत शिवसेनेसमोरचे आव्हान अधिक कठीण बनते.
अर्थात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती कागदावर जितकी सोपी दिसते तेवढी ती प्रत्यक्षात सोपी नाही. शिंदे यांना शिवसेनेला रोखायचे असेल आणि राज्यात एकत्र असल्यामुळे भाजपालाही सामावून घ्यायचे असेल. हे दुहेरी आव्हान शिवसेनेच्या नव्या जिल्हा संघटनेला स्वीकारावे लागणार आहे. या तारेवरच्या कसरतीकडे ओरिजिनल शिवसेना संधी म्हणुन पाहू शकते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस हे मविआमध्ये एकत्र सत्तेत होते. त्यामुळे भाजपा-शिंदे शिवसेना यांचे संयुक्त आव्हान त्यांना एकत्रितपणेच पेलावे लागणार आहे. राष्ट्रवादीकडे डॉ. जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, सुहास देसाई यांसारखे आक्रमक आणि आपापले मतदार संघ सुरक्षित ठेवणारे नेते आहेत. त्यांना शिवसेनेशी कसे जुळवून घेता येईल हे पहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही वर्षात चांगली फोफावली होती. परंतु पुढे आ. निरंजन डावखरे आपल्या काही नगरसेवकांसह घेऊन भाजपात दाखल झाले. ही पीछेहाट राष्ट्रवादी
समोरचा पेच आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर घडवण्यापूर्वी खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि डॉ. आव्हाड यांचे बिनसू लागले होते. ‘मिशन कळवा’ असेल किंवा पालकमंत्र्यांच्या मुलाला झुकते माप मिळत असल्याबद्दल डॉ. आव्हाड यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली होती. श्री. एकनाथ शिंदे ‘मविआ’पासून दुरावत गेलेल्या अनेक कारणांपैकी हे स्थानिक कारण होते. शिंदे यांना रोखण्याचा मनसुबा राष्ट्रवादी-शिवसेना यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार.त्यासाठी उभयतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे लागतील. एकमेकांना स्पेस देऊन एकमेकांचा उत्कर्ष कसा होईल यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
राज्यातील राजकारणाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील. ठाण्यात भाजपाचा जोर वाढावा यासाठी आ. संजय केळकर यांच्या मंत्रीपदाचा आग्रह धरला गेला तर आश्‍चर्य वाटू नये. अर्थात त्यानंतर भाजपाला शिंदे-शिवसेनेबरोबर रहावे लागणार आणि प्रसंगी महापालिका निवडणुकीत जागांबाबत आग्रहही मर्यादित ठेवावा लागणार. ठाण्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार्‍या घडामोडी पाहून कै. दिघे हेही चक्रावून गेले असते,एवढेच तुर्त म्हणता येईल. बघूया पुढे काय होते ते.