चर्चा तर होणारच !

महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी शिवाजी पार्क येथे के लेल्या तासाभराच्या भाषणामुळे बराच राजकीय धुरळा उडाला आहे. धुळीतील प्रत्येक कणाचा राजकीय विश्लेषक आपापल्या परीने अन्वयार्थ काढणार. तसेच मनसेचे विरोधक त्याच्या राजकीय तरंगांचा त्यांच्या भावी व्युहरचनेसाठी वापर करणार. मनसेने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना भाजपचे प्रत्यक्ष कौतुक के ले नसले तरी हिंदत्ु वाचा राग छेडून त्यांनी भाजपा नेतृत्वाला सुखावले आहे. ढोबळ मानाने निष्कर्ष काढला तर आगामी काळात उभय पक्षांची युती झाली तर आश्चर्य वाटू नये. अशा युतीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होतीच. परंतु मनसेची हिंदी भाषिकांबद्दलची भूमिका त्यांना एकत्र येण्यापासून परावृत्त करीत होती. श्री. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील भाजपाच्या विजयाचे कौतुक करताना हा द्वेष बोथट के ल्याचे दिसते. एक खूप सशक्त असा संदेश त्यामुळे गेला आहे. शिवसेनेची स्पेस मनसे घेऊ शकते काय याचा अभ्यास भाजपातील चाणक्य करीत होते. त्याबद्दल प्रादेशिक नेतृत्वाने अनुकू ल अहवाल हाय कमांडला दिलेला दिसतो. राज ठाकरे यांची दोन महिन्यांपूर्वी झालेली देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरची बैठक असो की अन्य नेत्यांनी घेतलेल्या गाठीभेटी असोत, त्यातून पाडव्याच्या भाषणाचा मसुदा तयार झाला
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाबरोबर युती करून शिवसेनेने २५ वर्ष सडवली, ही श्री. उद्धव ठाकरे यांनी वारंवार व्यक्त के लेली खंत, महाविकास आघाडीची स्थापना आणि मित्र पक्षाला गाफिल ठे ऊन मुख्यमंत्रीपद मिळवणे या सर्व गोष्टी भाजपाच्या वर्मी लागल्या आहेत. त्याचा वचपा कधी ना कधी काढायचा होताच. पण त्याकरिता तगडा जोडीदार हवा होता. मनसे ही पहिली आणि एकमेव पसंत होती. कोणत्याही एका स्थानिक पक्षाशी हातमिळवणी करणे हे भाजपचे धोरण राहिले आहे. कालांतराने स्थिती मजबूत होत गेली की भाजपा स्वतंत्र बाणा दाखवत आला आहे,ही बाब अलाहिदा. शिवसेनेला मोठ्या भावाचा मान देण्याचे टाळून भाजपाने हे सिद्ध के ले होते. मनसेला हाताशी धरण्यात आणखी एक फायदा असा आहे की ते मोठा भाऊ म्हणून स्थान लगेच मागणार नाहीत. त्यांना सत्तेत सामावून घेऊन भाजपा महाराष्ट्रातून आपल्या पायावर बळकट होत राहील. मनसे आणि भाजपात असा समझोता झाला तर आश्चर्य वाटू नये आणि तो म्हणजे महापालिका मनसेकडे आणि राज्याची सूत्रे भाजपाकडे. येत्या काही दिवसांत त्याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ लागेल. मनसेने हिंदत्ु वाबाबत पाडव्याच्या सभेत घेतलेली भूमिका
आक्रमक होती यात वाद नाही. त्यासाठी त्यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरसा यांचा प्रतिकात्मक वापर के ला. यामुळे मतांचे ध्रुवीकरण होऊ शकते. भाजपाला ही भूमिका थेटपणे मुंबईसारख्या कॉस्मॉपोलिटन वातावरणात रुजवता आली नसती. मनसे त्यासाठी मदतीला धावून गेली, असाही एक अर्थ निघू शकतो.
अरविंद के जरीवाल यांच्या ‘आप’ला मिळणाऱ्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई महापालिके त साध्य करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपा करण्याची शक्यता आहे. हा प्रयोग राजकीय धुरीणांना अतिशयोक्तीचा वाटेलही. परंतु श्री. राज ठाकरे यांचे भाषण बारकाईने ऐकले (अगदी ते म्हणतात त्याप्रमाणे दोन ओळीतील रिकाम्या जागांसह) तर त्यांनी आदर्श मतदार, नागरिकांच्या सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा, चुका लक्षात ठे ऊन शिक्षा करण्याचा अधिकार अशा ‘आप’ सम व्युहरचनेचा ऊहापोह के ला आहे. मुंबईमध्ये नागरी आघाडी वगैरे प्रयोग यशस्वी झाले नाहीत. परंतु तसा दबाव गट असावा असे वाटणारे खूप आहेत. श्री. राज ठाकरे हे या नागरिकांच्या मनातील भाषा बोलत होते. या सर्व बाबींचा विचार के ला तर महाराष्ट्रात काही वेगळे वारे वाहू लागले आहेत असे म्हणायला वाव राहतो. शिवाजी पार्कवरील राज यांचे भाषण नेहमीच्या ढाच्यापेक्षा जसे निराळे होते तसेच उपस्थित श्रोत्यांची प्रतिक्रियाही वेगळी दिसून आली. एरवी ‘प्लेइंग टू गॅलरी’ असेच ज्यांचे वर्णन होते ते राज ठाकरे खूप गंभीरपणे बोलत होते. एक सात्विक संताप त्यातून उमटत होता. राज यांच्या भाषणात नेहमीसारख्या टाळ्या शिट्ट्या नव्हत्या. इतकी शांतता आणि तीही राज यांच्या भाषणाच्या वेळी आम्ही प्रथमच अनुभवत होतो. ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची तर नसावी?