शाळा भरली, शाळा सुटली!

शाळा सुरु होणार म्हणुन बब्बडच्या पालकांची एकच तारांबळ उडाली होती. गेल्या वर्षी आणलेले नवे कोरे दप्तर आता जुने झाले म्हणुन बब्बडने हट्ट धरला आणि पुन्हा नव्या खरेदीचा प्रपंच पालकांना नाईलाजाने मांडावा लागला. गणवेशाचीही तीच गत होती. शाळा भले ऑनलाईन भरत असली तरी गणवेश घालून बसण्याची सक्ती होती. पण ऑनलाईन ऑफिसच्या मिटिंगसाठी खाली हाफ पॅन्ट आणि वरती शर्ट तोही टायसह घालणार्‍या बब्बडच्या बाबांनी पोराला फक्त वरचा शर्ट घालूनच बसवले होत. आभासी जग म्हणतात ते हे असे. वरुन कीर्तन आतून तमाशा! पण तरीही गणवेशही नवा घ्यावा लागणार होता कारण बब्बड वर्षभर घरात राहून आणि चिज- पिझ्झावर ताव मारीत गणवेशात मावेनासा झाला होता. चड्डी न वापरता वाया गेली म्हणुन बब्बडच्या आईला वाईट वाटले खरे. पण पोरगं किमान चार तास का होईना शाळेत जाणार आणि तेवढीच आपल्याला उसंत मिळणार या आनंदात ती होती. बब्बडला या लगबगीची कल्पना आली नव्हती. मुळात शाळा असते आणि तिथे दररोज जावे लागते हेच तो विसरुन गेला होता.नाही म्हणायला शेजारचा दादा परीक्षा न देता पास झाल्याचे पेढे त्याने खाल्ले होते.

अखेरीस शाळेचा पहिला दिवस उजाडला. बब्बडच्या घरातील सर्व सदस्य, अगदी आजी-आजोबांसह सगळे, दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी पहाटे उठतात तसे उठून बसले होते. आजीने बब्बडला शिरा आवडतो म्हणुन अगदी साजूक तुप घालून तयार केला. आईने आंघोळीची अशी तयारी केली की उटणं सुवासिक तेल, पाट, पाटाभोवती रांगोळी, ओवाळण्याची तयारी वगैरे. दुधवाला वेळेत येत नसल्याचे पाहून बब्बडच्या बाबांना त्यांच्या वडलांनी दुध आणायचे फर्मान सोडले. थोडक्यात घरातील सर्व सदस्य बब्बडच्या स्कूल रिओपनिंग कार्यक्रमात पूर्ण मग्न झालेली होती. सकाळी ७.३० ची शाळा असल्याने बब्बडला ६ वा. उठवण्यात आले. डोळे चोळत उठलेल्या बब्बडला घरातील एकुण वातावरण पहाता आपण बहुधा सहलीला जाणार आहोत असे वाटले.

शाळेत जायचे आहे म्हटल्यावर त्याने असे काही भोकाड पसरले की त्या गजरामुळे शेजारी जागे झाले. अखेरीस आजोबांनी नामी क्लृप्ती लढवली. त्यांच्यापाशी असलेल्या श्रीखंडाच्या गोळ्या त्यांनी बब्बडच्या भोकाडासाठी उघडलेल्या तोंडात कोंबल्या आणि त्याला तसेच बाथरुममध्ये नेऊन सर्व कार्यक्रम आटोपूनच बाहेर आणले.

गणवेश घालता-घालता बब्बडला शाळा काय असते, तिथे का जावे लागते, टिचर नामक व्यक्ती ही हाडामासाची माणूसच असते आणि इतके दिवस जिला संगणकाच्या छोट्या पडद्यावर पाहिले ती कोणी परी नव्हती तर शिक्षिका असते आणि ती प्रसंगी डोळेही वटारणार असते. इतके दिवस ऑनलाईन भरणारी शाळा म्हणजे नॉन स्टॉप कार्टून नेटवर्कमध्ये असलेला ब्रेक वाटावा असा गोड गैरसमज बब्बडचाही झाला होता. तो कसाबसा दूर करीत आणि दुपारी शाळेतून परतल्यावर आवडत पास्ता मिळेल हे आमिष दाखवून बब्बडची स्वारी शाळेस रवाना झाली.

शाळेच्या बाहेर जणू जत्रा भरली होती. रडकी मुले आणि हसरे पालक असे साधारणत: जून महिन्यात दिसणारे दृश्य तब्बल दीड वर्षांनी दिसत होते. पोरांच्या या गोंधळात आई-बाप इतर समसुखी पालकांसोबत मुले शाळेत गेल्यावर चार तास काय काय करणार याचे मनसुबे आखत होते. कोणी निवांत ताणून देण्याची योजना आखत होते तर कोणी पार्लरमध्ये जाऊन किट्टीचा रेंगाळलेला कार्यक्रम आखण्याचा, आपले कोरोनाने लुटलेले सौंदर्य परत आणण्याचा बेत आखत होते. पुरुष मंडळी जॉगिंग आणि मग मस्त नाश्ता असा प्रोग्रॅम ठरवत होते. एकुणातच मुलांचे खंडीत झालेले शैक्षणिक जीवन पुन्हा सुरु होण्यापेक्षा आपले स्थगित कार्यक्रम कसे मार्गी लागतील याचा आनंद पालकवर्गाच्या चेहर्‍यांवरुन ओसांडून वाहत होता.

शाळेचे गेट कधी एकदाचे उघडते आणि आपल्या पालकत्वाचे उत्तरदायित्व कधी एकदा सुफळ संपन्न होते ही विवंचना घड्याळाचा काटा जसा पुढे सरकत गेला तशी वाढू लागली. काही जणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण त्यांना तो आवाजही शाळेच्या घंटेचा असावा आता वाटले. आशावाद म्हणतात तो याला! एखाद्या नाटकाच्या दोन घंटा झाल्यावर तिसर्‍या घंटेसाठी कानात आणि डोळ्यांत प्राण आणलेल्या पालकांची नजर शाळेच्या गेटवर खिळली होती. इथे मुलांची रडारड टिपेला पोहोचली होती आणि इतक्यात शाळेच्या इमारतीतून मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक येताना दिसले. पालकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. खरे तर मुलांच्या कर्णकर्कश तुतार्‍यांमध्ये टाळ्यांचा कडकडाट हरवून गेला होता. मुख्याध्यापक गेटच्या पलिकडे एका खूर्चीवर उभे राहिले. त्यांच्या हातात सहशिक्षकाने एक कागद सरकावला. ते वाचू लागले. शासकीय आदेश जाक्र. आपत्कालीन परिस्थिती-महासाथ नियंत्रण कायदा १८०२ च्या कलम सात आणि ६४ आधारे रोगनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक कारणांसाठी आजची शाळा उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून महासाथ प्रतिबंधात्मक सुधारणा कायदा २०२१ आरोग्य संचालनालय अधिनियमाद्वारे असे निर्देशित करण्यात येत आहे की ज्याअर्थी रोगापासून संरक्षण मिळावे म्हणुन शाळा उघडण्याचा पुढचा दिनांक शासकीय अध्यादेशाद्वारे यथावकाश कळविण्यात येईल.

मुख्याध्यापकांचे बोलणे सुरुच होते. मुलांना किती समजले असेल कोणास ठाऊक पण रडणारे ते छोटे जीव अचानक हसू लागले होते आणि हसणारे मोठे जीव रडवेले झाले होते. आता याला कोरोनाचे साईड-इफेक्ट म्हणत असतील तर माहीत नाही!