ठाण्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असे वाटण्यामागे गेल्या आठवड्यात तीन घटना अशा घडल्या की ज्यांना मी केवळ साक्षीदार नव्हतो तर या सुखद घडामोडींमध्ये मला सहभागी होण्याची संधीही मिळाली होती. गेली अनेक वर्षे ज्याबद्दल ‘ठाणेवैभव’ सातत्याने आग्रही भूमिका मांडत आला त्याची फलश्रुती या तीन अनुभवांतून आली. पहिली घटना होती ती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबद्दलची. सध्या महापालिका अर्थसंकल्प बनवण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये लोकसहभाग घेण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस ते समाजातील विविध घटकांशी चर्चा करून मते अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. विविध व्यावसायिक गटांबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश अर्थसंकल्पात असावा हे त्यांनी जाणून घेतले. दुसरी घटना होती ती पोलिसांबद्दलची. नवनियुक्त आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांच्या प्राधान्यक्रमात अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा समावेश केला होता. त्यादृष्टीने शहरातील शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षण संस्थाचालक यांची बैठक बोलावून या गंभीर समस्येबाबत त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. तिसरी घटना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जे की जिल्ह्याचे निवडणूक अधिकारीही असतात. त्यांनी राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची. निवडणूक कर्मचाऱ्यांचे सत्कार हा त्याचा औपचारिक भाग असला तरी त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्यामुळे हे महत्वाचे खाते अधिक कार्यक्षमतेने काम करील असे वातावरण निर्माण झाले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तर अशी शाबासकी निवडणूक कर्मचाऱ्यांना देणे खूपच लक्षणीय ठरू शकेल. जिल्हाधिकारी जवळजवळ सर्व कर्मचाऱ्यांना नावानिशी ओळखत होते याचा अनुभव मी घेतला. प्रत्येकाबद्दल जिव्हाळा व्यक्त करीत होते. आपुलकीचा हा ओलावा या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षमतेचे क्षितीज वाढवण्यासाठी उपयुक्त ठरावा. मतदारयादीत नाव नोंदवण्याचे मुख्य काम निवडणूक विभाग करीत असतो. त्यात अनेकदा खूप अडचणी येत असतात. अशावेळी चिकाटी आणि संयम पाळावा लागतो. सचोटीचा कर्मचारीच हे काम करू शकतो. त्यामुळे रुग्णालयातून सुटका होताच विनाविलंब कामावर रुजू होणारे, वेळप्रसंगी उशिरापर्यंत थांबणारे, कौटुंबिक आनंद आणि जबाबदाऱ्यांना मुकणारे, निवृत्ती जवळ असतानाही त्याचा कर्तव्यपालनावर परिणाम होऊ न देणारे अशी अनेक उदाहरणे सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे आली आणि या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल जनमानसात रुजलेल्या प्रतिमेस छेद मिळाला. निवडणूक विभागांतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे जाणवले आणि पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना कशी संधी मिळते आणि त्याही त्याचे कसे सोने करतात याची प्रचिती आली.
पोलीस आयुक्त डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाकीतील संवेदनांना पुन्हा चालना मिळणार आहे असा विश्वास या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे मला मिळाला. अत्यंत संवेदनशील आणि समाजातील विशेषतः तरुणवर्गाला दिशाहीन करणाऱ्या अंमली पदार्थांचा उपद्रव मोठी समस्या होऊन बसला आहे. शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षकवर्ग यांना आवाहन करण्यात आले होते. सुमारे ३०० आसन क्षमता असणारे सभागृह पूर्णपणे भरून गेले होते. यावरूनच या विषयांची तात्कालिकता समजून येत होती. विशेष म्हणजे शिक्षकांनी अतिशय मनमोकळेपणाने त्यांच्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली. पुढची पिढी डोळ्यासमोर या नशिल्या पदार्थांना आहारी जात असल्याचे दुःख ते पचवू शकत नव्हते. ही उद्विग्नता आणि हतबलता एका पाठोपाठ एक शिक्षक व्यक्त करीत असल्याचे पाहून कोणीही जबाबदार नागरिक व्यथित होणे स्वाभाविक आहे. त्यावर पोलीस त्यांच्या पातळीवरून कारवाई करतीलही, परंतु मला ज्या गोष्टीचे अप्रूप वाटले ते हे होते की जनतेमधील दबलेला हा आवाज बाहेर पडण्यासाठी पोलिसांनी निर्माण करून दिलेल्या संधीचे. गेल्या काही वर्षात जनतेला व्यक्त होण्याची संधी मिळत नव्हती, जी नवीन आयुक्तांनी दिली आणि त्याला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तम साथ दिली. गुन्हेगारांबद्दल बोलताना सर्वसामान्य जनता घाबरत असते. अति. आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी काही शिक्षकांच्या या घुसमटलेपणाचा विचार करून तिथल्या तिथे तक्रारपेटीची व्यवस्था केली. या सर्व कृतीवरून पोलीस अंमली पदार्थांच्या समस्येबाबत गंभीर आहेत हे स्पष्ट झाले आणि त्यावर तोडगा शोधण्याचे त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, हे उपस्थितांना समजले. जनतेच्या मनात पोलिसांबाबत विश्वास वाटावा असा हा उपक्रम म्हणूनच स्वागतार्ह वाटला.
महापालिकेचा अर्थसंकल्प हा अगम्य अशा आकडेवारीचा दस्तावेज असतो आणि तो पालिकेच्या मूठभर अधिकाऱ्यांशिवाय कोणाला कळत असेल काय, त्याबद्दल माझ्या मनात नेहमीच शंका असते. मूळ अर्थसंकल्प, सुधारित अर्थसंकल्प, पुनर्विनियोजन, कुठे टक्क्यांची परिभाषा तर कुठे मूळ आकडे असा बेमालूम घोळ करून गोंधळ वाढवण्याचे कामच हे अर्थसंकल्प करीत असतात. किंबहुना जनतेला तो समजू नये म्हणजे ते आपोआपच स्वारस्य घेणार नाहीत अशी एकूण रचना वर्षानुवर्षे चालत आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मात्र त्याला चाट दिली आणि चक्क प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख नागरिक आणि संस्था यांना पाचारण करून त्यांची मते जाणून घेण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. या सर्व मंडळींचा त्या-त्या क्षेत्रातील अनुभव आणि त्यातून केलेल्या सूचना समजून घेणे आणि त्यानुसार तरतुदींची आकडेमोड करणे, हा श्री. बांगर यांचा हेतू दिसतो. यानिमित्ताने लोकांचा सहभाग मिळवण्याचा प्रयत्न स्वागतार्हच म्हणायला हवा. कोट्यवधी रुपयांची उलाढाल तेव्हा होते, जेव्हा छोटे-छोटे करदाते त्यांची देयके भरतात तेव्हा. साहजिकच ते ‘स्टेकहोल्डर्स’ असतात, परंतु अनेकदा त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. आपलाही महापालिकेच्या कारभारात सहभाग आहे ही जाणीव श्री. बांगर यांच्या प्रयत्नांमुळे फलदायी ठरणार आहे.
कर भरणे आणि मतदान करणे ही जबाबदार नागरिकांची व्यवच्छेदक लक्षणे असली तरी त्यांच्या मनातील काहूर तसेच आत राहणे हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण मानता येणार नाही. श्री. अभिजीत बांगर, श्री. आशुतोष डुंबरे आणि श्री. अशोक शिनगारे यांचे म्हणूनच कौतुक वाटते. प्रशासनातील हे तीन Aक्के ठाणेकरांमध्ये आपलेपणाची भावना उत्पन्न करतील ही आशा आहे.