खासदारकीचा चेहरा

चर्चा ठाणे महापालिका निवडणुकीची सुरू असली तरी अधूनमधून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचीही होत असते. उदाहरणार्थ भाजपा ठाण्यातून कोणाला उमेदवारी देणार याची. मग ही चर्चा संभाव्य उमेदवाराच्या चेहर्‍याभोवती फिरू लागते. प्रचलित राजकारणातील वारंवार दिसणार्‍या चेहर्‍यांची नावे पुढे येऊ लागतात. मग पुन्हा ती खोडलीही जातात. कारण त्यांचा चेहरा असतो. म्हणजे लोकसभेचे अवाढव्य कार्यक्षेत्र पहाता, हा चेहरा सर्व सहा विधानसभा मतदार संघांत स्वीकारला जाईल काय हा मुख्य रोख असतो. बरे इथे आणखी एक गोची अशी होते (अर्थात चर्चेतच बरे का!) की ज्यांना चर्चावीर तिकिट देऊन मोकळे होतात तेच त्यांच्या नावावर काटही मारत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर आ. संजय केळकर यांचे देता येईल. त्यांना बढती देऊन दिल्लीत पाठवता येईल असा निर्णय गप्पांमध्ये होत असताना काही मंडळी वेगळा सूर लावून मोकळे होतात. त्यांच्या मते केळकरांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेमुळे त्यांच्या वाट्याला मंत्रिपदाची बढती मिळत असताना ते जातीलच कसेही दिल्लीला. इथे केळकरांच्या चेहर्‍याबरोबरच त्यांच्या ज्येष्ठतेचा मुद्दा पुढे येतो.
यावरून चेहरा या शब्दाला राजकीय परिभाषेत बरेच कंगोरे फुटतात. स्वीकारार्ह चेहरा या संकल्पनेत तर अनेक राजकीय मुद्यांचा विचार होतो. विशेषतः उमेदवाराचे इलेक्टीव्ह मेरीट. या निकषाचा विचार करतार चेहरा-श्रीमंत असण्याला प्राधान्य मिळते. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार काही लाख सहजाचे खर्च करीत असतात. तिथे आमदार आणि खासदारकीसाठी खोर्‍याने मजल मारली तर आश्‍चर्य काय वाटावे? चेहर्‍याला आर्थिक आयाम प्राप्त होतो तो असा, लोकसंग्रह आणि वर्क्तृत्व. हे तसे पहायला गेले तर महत्त्वाचे निकष, पण पैशांपुढे ते गळून पडतात. पण उमेदवाराच्या चेहर्‍याची निवड करताना त्याच्या व्यक्तीमत्वात या दोन गुणांचा अंतर्भाव असेल तर तो परिपूर्ण होतो. सामाजिक प्रतिष्ठा हा चेहर्‍याचा आणखी एक भाग, परंतु अनेकदा उमेदवाराच्या उपद्रव मूल्यापूढे तो साकोळला जात असतो. चेहर्‍याची ही नकारात्मक बाजू असली तरी ती दुर्दैवाने अपरिहार्य मानली जाऊ लागली आहे.
एवढे सारे फिल्टर लावून मग हाती येणारा सर्वगुण संपन्न चेहर्‍यावर एकमत होत असते. भाजपाकडे एकेकाळी रामभाऊ म्हाळगी आणि पुढे रामभाऊ कापसे असे चेहरे लाभले होते. किंबहुना या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा अवघ्या मतदार संघाचा चेहरा बनला होता. ठाण्याचा खासदार कसा असावा तर म्हाळगी-कापसे यांच्यासारखा, असे समीकरण न कळत दृढ होत गेले. शिवसेनेने या मतदार संघावर हक्क सांगितला तेव्हा त्यांनी प्रकाश परांजपे यांची निवड केली ती या प्रभावामुळे संयत, अभ्यासू, वर्क्तृत्वावर पकड आणि स्वच्छ प्रतिमा ठाण्यात स्वीकारली जाते ही मतदारांची मानसिकता कोणत्या चेहर्‍यावर शिक्का मारते हे पहायला गेले असावे. बहुभाषिक ठाण्यात राजकीय-सामाजिक सांस्कृतिक भिन्नतेला मानवणारा उमेदवार पसंतीस उतरू शकतो.
आता या पार्श्‍वभूमीवर ठाणे लोकसभा मतदार संघात उमेदवार शोधण्याचे आव्हान भाजपा समोर असणार आहे. त्यात पुन्हा विद्यमान खासदार राजन विचारे हे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभे असल्यामुळे आव्हान अधिकच कठीण होणार आहे. भाजपाला संभाव्य उमेदवाराचा चेहरा खा. विचारे यांच्या चेहर्‍यावर ‘सुपर इम्पोज’ करून मतदारांच्या मानसिकतेला साजेशी निवड करावी लागणार. हे काम सोपे नाही. दोन वर्षांनी निवडणूक होणार म्हणून हा विषय मागेही टाकता येणार नाही. भाजपाला म्हाळगी कापसे परंपरा पुन्हा जिवंत करायची असेल तर या शोधमोहिमेस आताच प्रारंभ करावा लागणार! चेहर्‍यात राम नाही असे म्हणायचे दिवस केव्हाच संपले. ठाण्याचा भावी खासदार आकाशातून पडणार नाही. तो असेल इथेच कुठेतरी. पण तो शोधण्याची हीच वेळ आहे.