अवतरणग्रस्त देश

आपलेपण संपलेल्या देशात
आपले असेच होत राहणार
‘आपले’ नेते, ‘आपले’ मतदार
‘आपले’ बगल बच्चे सांभाळत राहणार
‘आपली’ प्यादी खेळवत ,
‘आपले’ वजीर निवडून आणित राहणार
‘आपली’ जात, ‘आपला’ धर्म
‘आपले’ पद, ‘आपले’ कळप
आणि या सर्वानंतर
वेळ असेल तर देशाचा विचार ते करणार
‘आपले’ अधिकारी, ‘आपले’च ठेकेदार
खिसे ते भरत राहणार
कोण पब्लिक? कसली सुरक्षा ?
खेळ सर्व अवतरणांचा
असाच सुरू राहणार…..
अवतरणात लपले असते
कधी जातीचे बंधन
कधी धर्माचे पवित्र कोंदण
कधी व्होट बँकेचे राजकारण
हैवानांच्या हाती
का नाही जाणार नंदनवन….
बंदुकीच्या जोरावर
विवस्त्र केले त्यांनी
आपण मूक संमती
तर दिली नव्हती त्याना नकळत?
बेगडी, भरजरी वस्त्रात
मिरवत राहिलो निर्लज्जपणे
तेच  ते बुरसटलेले ‘आपले’पण
 सुन्न देश फोडत आहे आता
 अखिल भारतीय टाहो
 कोणी मोर्च्यात मेणबत्तीच्या
 कोणी दंग निषेधात सामील
कोणी घेत आहे शोकसभा
 तीव्र नापसंतीच्या नाना तऱ्हा
 पेटल्या संतापाच्या ज्वाळा….
तीच ती भाषणे
तेच ते सांत्वन
खऱ्या प्रश्नाला आजही
का वळसे देत आहे मन….
या वेळचा आक्रोश मात्र
काही वेगळा आहे का
की अश्रू डोळ्यातले
काही वेगळे सांगत आहेत ?
कदाचित आपल्या भोवतीचे अवतरण
खूपू लागले आहे
प्रथमच डोळ्याना ?
प्रक्षोभ जनतेचा ठरू नये
पुन्हा क्षणभंगुर
अवतरणांचे भूत उतरावे मानगुटीवरून
दांभिकपणाची झापडे झुगारण्याची
वेळ आता आली आहे
जोशी आपले होते आणि
जगदाळे का होते परके ?
अतिरेक्यांनी मानला नव्हता भेद
आपणच प्रेमात अवतरणाच्या
देत असतो छेद….,,
जे गेले ते कोणाचे तरी बाप होते
कोणा सौभाग्यवतीच्या कुंकवाचे धनी
कोरड्या सांत्वनाने येतील का ते परत
विचार आर्त सतावी मना
शब्दही आता गेले आहेत थिजून
हिमशिखरेही राहतील गोठून
पाट नद्यांचे अजुन किती दिवस
वाहत राहतील रक्त
अवतरणांचे पाणी गेले आहे नाका तोंडात
गुदमरू लागलाय जीव
देश बुडण्याची भीती आहे
आवर्तने या दुष्टचक्राची
कुठपर्यंत फिरत राहणार?
सार्वभौमत्व आमचे कसे सुरक्षित राहणार?
अवतरणे आपल्या भोवतीची
कधी नाहीशी होणार?
सरणावर चढलेल्या एकात्मतेला
कोण अखेर सोडवणार?
आपण सारे एक आहोत
हे कधी ठणकावून नराधमांना सांगणार?