-अगं बऱ्याच वर्षांनी तुझ्या घरी गणपतीसाठी येत आहे. जरा पत्ता पुन्हा नीट समजावून सांग बरं.
आपल्या मैत्रिणीकडे निघालेल्या एका तरुणीचे मोबाईलवरील संभाषण मी ऐकत होता. याला चोरून ऐकणं म्हणत असाल तर ते साफ चुकीचं आहे. कारण सदर तरुणी इतक्या मोठ्याने बोलत होती की ऐकणाऱ्या सर्वांनाच गणपतीबाप्पाचे न पहाता दर्शन झाले होते. बरे फक्त मोठ्यांदा बोलून ही तरुणी थांबली नव्हती तर फोन स्पिकवर असल्यामुळे दोन्हीकडील संवाद ऐकण्याशिवाय बस स्टॉपवर उपस्थितांना पर्याय नव्हता! कशाला नाकारा पण उभ्या उभ्या उपस्थित सर्वांची करमणूक होत होती.
-तू कशी येतेस ते प्रथम सांग.
-बसने
-ओ.के. मग तू संतोषीमाता मंदीर थांब्यावर उतर. तिथे समोरच महाराष्ट्र धान्य भांडार आणि श्री गणेश स्वीटमार्ट ही दोन दुकाने दिसतील. त्यांच्या मधून जो रस्त जातो तो सध्या खणला आहे. तो न घेता त्याच्या बाजूला फुलांचं जे दुकान आहे त्याच्या डावीकडे एक बोळ जातो. पण तो तू घेऊ नकोस. कारण परिसरातील सर्वांनी विरोध केल्यावर अखेर कचर्याची पेटी आम्ही तिथे ठेवली आहे. हो तर कुठे होते मी?
-फुलवाल्यापाशी.
-बरं, त्या फुलवाल्यापासून १५ पावले चालत जा. आणि लक्षात घे पदपथ अजिबात वापरू नकोस. तिथल्या फर्श्या काढल्या आहेत. गेल्या आठवड्यात मी ठेचकळून पडले होते.
– अगं बाई.
– ते जाऊ दे. मी कोर्टात खेचले आहे त्या ठेकेदाराला.
-उत्तम केलंस. आपलं रक्त काय असं खड्ड्यात सांगण्यासाठी आहे.
-अगदी बरोब्बर. चांगल्या लाख रुपयांचा दावा ठोकला आहे. बरं कुठे होते मी?
-पदपथावरील फर्शीवर.
-ओके. तिथून मैजून १५ पावले चालल्यावर महानगर गॅसने खणलेला खड्डा दिसेल. तिथे जरा जपून चाल कारण खड्ड्यातील मातीचा खूप चिख्खल झाला आहे. एकदा का तू हा अडथळा पार केलास की शिल्पा ब्युटी पार्लरचा बोई दिसेल. तिथून दोन रस्ते फुटतात. त्यापैकी गजानन वडावाल्याच्या अंगावरून डावा रस्त घे. अरे हो पण त्याचा बोर्ड गेल्याच आठवड्यात वादळामुळे पडला होता. पण काळजी करू नकोस. वडापाव खाताना लोक दिसतीलच. तिथून एक सहा ते सात मिनिटे नाकासमोरबघून चालत रहा.
-ठीक आहे. म्हणजे तुझ्या सोसायटीचे गेट दिसेलच.
– नाही. जवळ आली आहेस.पण या रस्त्यावरही लहान-मोठे खूप खड्डे आहेत, ते सांभाळ गं बाई. हा रस्ता संपतो तिथे तर खूपच मोठा खड्डा आहे. गेल्या वर्षी इवलासा होता. वर्षांत बाप्या झाला.
-अगं तुझ्या मुलांबद्दल बोलतेस का? त्याला भेटीन ना घरी आल्यावर.
– अगं वेडे मी खड्ड्यांमध्ये बोलतेय. आता तुला आमच्या विघ्नहर्ता सोसायटीचा बोर्ड दिसेल. पण बोर्डाकडे बघत बसू नकोस. बाजूने वाहत गेले तर अंगावर चिख्खल उडू शकतो. त्यामुळे पटकन् रस्ता ओलांड.
-बरं. बस येत आहे. ठेव तू फोन.
– अगं थांब जरा.इकडे एक गडबड होऊ शकते. एकतर रस्ता ओलांडताना पाण्यात पाय पडू शकतो किंवा बाजूने जाणारा वाहतचालक एखादी शिवी हासडू शकतो. पण तो शेवटचा अडथळा पार केला की आमच्या विघ्नहर्त्याच्या दारी सुखरुप पोहोचलीच म्हणुन समज!
पलिकडून बोलणार्या मैत्रिणीचे संभाषण ऐकून बस स्टॉपवरील या तरुणीचा चेहरा बघणेबल झाला होता. बाप्पाच्या दर्शनाला जावे की घरी जाऊन व्हिडिओ कॉल करून ऑनलाईन दर्शन घ्यावे हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेला दिसत होता.
फोन बंद करून ती निर्णय घेण्याच्या विचारात असावीच की पुन्हा तिच्या त्या मैत्रिणीचा फोन आला.
-हे बघ. मी तुला लोकोशन मॅपच पाठवत आहे. तुझ्याकडे गुगल मॅप अॅप असेलच ना?
-आहे की.
-हो, पण त्याला जोडून गूगल खड्डे-मॅप इन्स्टॉल केला आहेस का?
-आता ही काय नवीन भानगड?
-अगं, गूगलवाल्यांनी यावर्षीपासून ठाणे-मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची अद्ययावत माहिती अगदी फोटोसह देण्याची व्यवस्था केली आहे.
-काय म्हणतेस काय?
-अगं, खूप सोयीचा अॅप आहे. आमच्या सर्व पाहुण्यांनी तो इन्स्टॉल केल्यामुळे एकाचाही पाय खड्ड्यात पडून मुरगळला नाही. की अंगावर चिख्खल उडाला. मीही केला आहे खड्ड्यांचा हा अॅप इन्स्टॉल. अॅक्च्युली तो खूप युजर-फ्रेंडली आहे. खड्ड्यांची खोली, लांबी आणि रुंदी समजते. त्यावरून काही खड्ड्यांचा इतिहासही समजतो. पुरातत्व खाते त्याचे जतनही करीत आहे. अगं या अॅपमुळे अनेकांची सोय झाली आहे. विरोधी पक्षांना नेमका कोणत्या खड्ड्यांत झाड लावायचं आणि कशात मासे पकडायचे हे ठरवता येऊ लागले आहे. एका इतिहासकाराने तर काही खड्ड्यांची खोली वाढवली तर प्राचीन संस्कृतीचा शोध लागेल असाही दावा केला आहे. बरं ते जाऊ दे, तू वेळेत ये. तुझ्यासाठी जेवायला थांबते. उशीर करू नकोस बाई. नाही तर भूकेने पोटात खड्डा पडायचा!
मैत्रिणीचे शेवटचे वाक्य ऐकून मला खरं तर हसण्याचा मोह झाला होता, पण मग संभाषण चोरून ऐकले या भीतीने माझ्या पोटातच खड्डा पडला!
कंडक्टरने आमच्या या सहप्रवासी महिलेच्या हाती खड्डागल्लीचे तिकीट कोंबले होते!
जाता-जाता: एअर इण्डिया विकत घेऊ पहाणार्या टाटांनी मेट्रोवर तातडीने गुंतवणूक केली तर, सामान्यांना रोजच्या यातनांना ‘टाटा’ करता येईल. कसे?