ती बातमी वाचून न पिणार्या बारमालकाची नशा खाडकन् उतरावी तसा प्रकार झाला. देशातील एका प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या सदस्यांकडून दारू न पिण्याची हमी घेण्याचे ठरवल्याची बातमी बारमालकाने वाचली होती. एकेकाळी गरिबी हटावाची गर्जना करणाऱ्या पक्षाने दारुहटावचा नारा का द्यावा हे बारमालकास समजत नव्हते. त्याने वर्तमानपत्र बाजूला ठेऊन आपल्या संघटनेच्या अध्यक्षांना फोन लावला.
-अण्णा, आपने आजका पेपर पडा क्या?
– पडा. बारका रातका टाईम बडाया है, वहीच ना?
– नही अण्णा वो खबर जुना हो गएला है. ये ताजा खबर पडेगा तो तुम्हारा भी होश उड जाएगा!
-ऐसा क्या बोलता तू सुदेश अण्णा? सुबू सुबू पिके बोल रहा क्या?
– मैं नहीं पिता अण्णा.थांबा, तुमको मैच वाचून दाखवतो.
ऑल इण्डिया लेव्हलकी ये पार्टीने वर्करलोक के वास्ते नवीन नियमावली बनवली आहे. त्यातली पहिल्या अटमुळे आपल्याला बारला टाळा मारून बोराबिस्तरा बांधून गावाला जायला लावणार आहे.
– सुदेशअण्णा. खबर पक्का है क्या? आजकल पेपरवाला कुछ भी छापता है, इसलिए डाऊट आया.
-पक्की खबर आहे. लिहिणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स गेला तर ग्रीन टी शिवाय काही पीत नाही, असे मला समजले आहे.
-तरी तू पक्षातील प्रमुख नेत्यांकडे कन्फर्म केलेले बरे.
– ते पण केले ज्याला फोन केला तो तर पुढचे दोन दिवस घरातला पूर्ण स्टॉक संपवण्यासाठी बसला होता.
– अरे काय बोलतो सुदेश अण्णा, ही बातमी खरंच डेंजर आहे.
– डेंजर नाही अण्णा. महाडेंजर आहे. अरे एका मोठ्या पक्षाने असा निर्णय घेतला तर बाकीचे पक्षही त्याची कॉपी मारतील. मग तर धंदा चोपट झालाच समज.
– अण्णा, तुम्ही तातडीची मिटिंग बोलवा. आपल्याला या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटून हा नियम रद्द करून घ्यावाच लागेल.
– ते करू रे. पण या पक्षाच्या नेत्यांना दारूचे फक्त तोटेच कसे दिसतात?
– अण्णा, वहीच मै बोलतोय. आपण फायदे समजावून सांगितले पाहिजे.
– तू बोलत जा. मी लिहून घेतो. आपण लेटर लिहू.
– फायदा नं.१. दारूमुळे माणूस खरा बोलतो. सतत खोटे बोलणार्या नेत्यांना खरं बोलण्याची सवयच राहणार नाही.
– याने की झूठ. झूठके सिवाय कुछ नही. पुढे बोल.
– दारू पिणे आणि पाजणे यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ती पिण्यास विरोध केला आणि तेही आपल्या राजकीय ग्राहकांना, तर आपलीच नाही तर देेशाची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल.
– सुदेशअण्णा. मस्त पॉईंट आहे. पुढे बोल.
– दारू पिऊन जनतेला आश्वासन दिलं आणि ते पाळलं नाही तर मनाला कमी ठेच लागते, हे आपल्या कोमलहृदयी नेत्यांना सांगावे लागेल. प्रचार सभेत भाषणापूर्वी किंवा जाहीरनामा बनवताना पेगभर दारु पोटात गेल्याने खोटं बोलण्याचं दुःख सहन होत असते.
– हं. आगे बोलो.
– दारू पिता-पिता बरेच खाद्यपदार्थ तोंडी लावायला लागतात. ती फार मोठी इण्डस्ट्री आहे. पण दारू पिण्यावरच बंदी आणली तर देशाच्या औद्योगिकीकरणावर भयंकर परिणाम होईल.
– सुदेश अण्णा. तू बहोत स्मार्ट है. इण्डस्ट्री बंद तो बेकारी बडेगा.
– हो ना. अण्णा. बार बंद झाले तर आपले नेते ठेकेदारांना कुठे भेटतील? देवाण-घेवाणीचे ठरले नाही तर विकासच थांबेल. हा तोटा लक्षात आणून द्यावा लागेल.
-बोले तो डेव्हलपमेंट के लिए दारू पिनीच चाहिए! आगे बोल सुदेश अण्णा.
-अण्णा सच बोलू, दारुकीवजह समाजमें खुशियाली होती है
– वो कैसे?
– लोग एक दुसरेके साथ दोस्ती करते है. उनमें प्रेम बढता है. एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. दारू नसेल तर डोकं चालत नाही, आणि डोकं चाललं नाही तर प्लॅनिंग होऊ शकत नाही.
-यह भी सच है. पण तरी आपले त्या पक्षाच्या नेत्याने ऐकलेच नाही तर…
– अण्णा त्यासाठी माझ्याकडे आयडिया आहे. बारमध्ये शिरताना सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण चेहरा झाकून आत आणायचे आणि बाहेर पडताना त्यांना भुयारी मार्गाने बारपासून दूर नेऊन सोडायचे.
-पण समजा एखादा कार्यकर्ता रस्त्यावर टाईट होऊन पडलेला आढळला तर…
-त्याची चिंता आपण कशाला करायची अण्ण्णा? आपले बिल भरून गेल्यावर आपला त्याच्याशी काय संबंध, शेवटी तो, त्याचे नशिब आणि त्याचा पक्ष बघून घेतील. काय?
जाता-जाता: संबंधित दारूबंदी पक्षाच्या कार्यालयाबाहेर दारू म्हणजे काय रे भाऊ ?असे ऐकू आले तर आश्चर्य वाटू नये.