खऱ्या तलवारी, खोट्या ढाली!

शिवसेनेचा दसरा मेेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. विचाराचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक वर्षानुवर्षे शिवाजीपार्क, अर्थात शिवतीर्थावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहात. संघटनेच्या नेतृत्वाला सद्यस्थितीबद्दल काय वाटते हे यानिमित्ताने शिवसैनिकांना आणि राज्यातील तमाम जनतेस समजण्याची ही संधी असे. पक्षाची आगामी काळातील भूमिका यानिमित्ताने कार्यकर्त्यांना समजत असे. बाळासाहेबांच्या अमोघ वाणीची जादू शिवसेनेची ताकद असे. पक्षाचे ब्रॅण्डींग त्यानिमित्ताने होत असे आणि त्यांचा जहालपणा शिवसेनाप्रमुखांच्या भाषणामुळे समाजावर खोलवर उमटत असे. आपल्या वडिलांपेक्षा कमी जहाल, आणि विरोधकांच्या मते तर मवाळ, अशा श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्याच्या या हेतूची पूर्तता होईल काय असे आम जनतेला वाटत आले आहे. त्यात पुन्हा ते मुख्यमंत्री, म्हणजे पदामुळे आलेले निर्बंध सांभाळणे ओघानेच आले. अशा वेळी बाळासाहेबांची आक्रमक ठाकरी भाषा ते बोलू शकणार नाही ही अटकळ. परंतु काल त्यांनी या समजावर बोळा फिरवला. केंद्रातील भाजपा सरकारवर तोफ डागताना त्यांनी शब्दांची काटकसर केली नाही आणि अत्यंत परखडपणे सरकारच्या चुका आणि त्यांची कथित कारस्थाने दाखवली.
राज्याच्या कारभारात लुडबुड करू नका असा इशारा देऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपाविरूद्ध षड्डू ठोकला आहे. अंगावर घेण्याचा हा प्रकार कोविडमुळे राज्य सरकारला म्हणावे तसे काम करून दाखवता आले नाही म्हणुन बचावासाठी वापरण्याची ही मुत्सद्दी चाल असू शकते. त्यामुळे एरवी विरोधी पक्ष म्हणून भाजपाने जे तोंडसुख घेतले असते ते त्यांना घेता आले नाही. उलट केंद्राने आर्थिक कोंडी केल्यामुळे जनतेवर अन्याय झाला असा सूर लावून श्री. ठाकरे यांनी आगामी काळात पक्ष असाच आक्रमक राहणार हे सूचित केले. भाजपाचा आक्रमकपणा हा राजकीय सुडातून प्रेरित आहे, असेही श्री. ठाकरे यांनी सूचित केले. ईडीच्या वा आयकर विभागाच्या कारवाया या त्याचेच द्योतक आहे, असे सांगून श्री. ठाकरे यांनी शिवसेनेला सहानुभूती कवच मिळवून दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाच्या हिंदुत्त्ववादावर शंका व्यक्त करून सेनेने प्रतिस्पर्ध्याच्या मुळावरच प्रहार केला. एका प्रादेशिक पक्षाने केलेला हा हल्ला भाजपाच्या जिव्हारी लागला असेलच, परंतु त्याहीपेक्षा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही ठाकरे यांच्या भाषणाने अचंबित केले असणार. जे काँग्रेसने बोलायचे ते शिवसेना बोलून गेली. अर्थात आगामी महापालिका निवडणुकीत या मुद्यांचा कितपत परिणाम होईल हे सांगणे कठीणच आहे. शिवसेनेकडून स्थानिक प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी , हे विसरता कामा नये.
केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारे मुस्कटदाबी करीत आहे. विरोधकांची लफडी वेशीवर टांगत आहेत, त्यांच्या नेत्यांच्या आणि नातेवाईकांच्या घरांवर छापे मारीत आहेत आणि एक प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात विरोधक अधिक आक्रमक झालेले दिसतात. ते सरकारच्या दबावाला भीक घलताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची भिती खरी आहे की कांगावा? की आपल्या तथा-कथित घोटाळ्यांवर पांघरूण टाकण्याचा हा प्रयत्न आहे,असे प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. सरकारच्या या ‘अत्याचाराविरूद्ध’ जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा तर विरोधकांचा प्रयत्न नसावा, असे जनतेला वाटत असेल तर स्वाभाविक आहे. सरकारी यंत्रणांचा सर्रास गैरवापर करण्याची पद्धत या जगाचीच जणू रीत बनली आहे,त्यामुळे आपल्या देशात काही वेगळे घडत नाही. श्री. उद्धव ठाकरे असोत की श्री. शरद पवार हे केंद्र सरकारला अंगावर घेत असून त्यांच्या या धाडसामुळे जनतेच्या मनात उलट-सुलट प्रश्‍नांचे काहुर उमटू लागले आहे. सरकारला नमावायचे नाही हा मंत्र महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याकडून अवगत केलेला दिसतो.
महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात दसरा मेळव्यातील भाषणामुळे कलगीतुरा रंगला आहे. कोरोना नियंत्रणात येत असताना आणि परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे सुचिन्ह दिसत असताना नेत्यांना राजकीय जुगलबंदी करण्याची संधी मिळालेली दिसते. विशेष म्हणजे आम जनतेलाही या करमणुकीचा आनंद लुटण्याची सवड मिळालेली दिसते. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणा की सत्तांतरासाठी लागणारी वातावरणनिर्मिती म्हणा, या भांडणांचा वापर होत आहे. प्रश्‍न असा आहे की, ज्या मुद्यांवर हे धुमशान सुरू आहे त्यामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? हिंदू आणि नवहिंदूचा मुद्दा असो की भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, यापेक्षा जनतेला तिची अस्तित्त्वाची लढाई कशी सुकर होईल याचीच अधिक चिंता आहे. त्या मुद्यांपासून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकमेकांविरूद्ध तलवारी परजून उभे आहेत. दांभिकपणाच्या या ढाली तकलुबी असतात आणि त्यामुळे उभय पक्षी इजा होऊ शकते. हे मात्र या मंडळींनी ध्यानात घेतलेले दिसत नाही!