चित्रपटांचा आणि त्यातही खास करून हिंदी अर्थात बॉलीवुड चित्रपटांचा भारतीय जनमानसावर खोल परिणाम होत असतो. चित्रपटातील नायक अथवा नायिका यांच्या पेहरावापासून केशरचने- पर्यंत आणि त्यांच्या देहबोलीपासून बारीक सारीक लकबकींपर्यंत त् कळत नकळत प्रभाव पडत असतो. आपल्या आवडता नटाचे अनुकरण करण्यात गैर काहीच नाही परंतु त्यामुळे निर्माण होणारे व्यक्तिमत्व एका आत्मविश्वासाने चांगले नागरिक म्हणून काम करण्यास प्रेरक ठरावे,ही अपेक्षा असते. आपले लाखो चाहते आपल्याला नुसते पहात नसतात तर आपली छबी मनात जपत असतात,हे या मंडळींनी लक्षात घ्यावे लागेल. अभिनेत्यांनी त्यांचे अनुकरण होत असते हे लक्षात घेऊन जबाबदारीने वागायला हवे.
अमिताभ बच्चन अर्थात अँग्री यंग मॅन, बिग बी आणि शहेनशाह अशा विशेषणांचा लौकिक लाभलेला हा महान अभिनेता ११ ऑक्टोबर रोजी ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली पाच दशके चंदेरी दुनियेत तळपणाऱ्या या ताऱ्याने भारतीय जनमानस अक्षरशः व्यापून टाकले आहे. अभिनयाच्या कसोटीवर त्यांना लाभलेले स्थान हे शब्दात वर्णन करण्यापलीकडचे आहे. परंतु त्याहीपेक्षा एक भला माणूस, ज्याने झगमगत्या व्यवसायात आपली सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपली म्हणूनही हृदयात अढळ असे स्थान मिळवले आहे .सत्तरच्या दशकात आणि खासकरून १९७५ च्या आणीबाणीनंतर भारतीय समाजात सामान्य जनतेच्या मनात प्रस्थापितांच्या विरुद्ध प्रक्षोभाचे बिज पडले. या बंडखोरीला बच्चन यांनी रुपेरी पडद्यावर मूर्त स्वरूप दिले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि आत्मविश्वास बच्चन यांनी साकारलेल्या असंख्य भूमिकांतून दिसला. अँग्री यंग मॅन बच्चन हे बिरूद त्यांना तेव्हापासून चिकटले ते आजही ८० व्या वर्षात पदार्पण करताना कायम आहे. हे सातत्य त्यांनी सचोटीने टिकवले.ग्लॅमरला परिश्रमाची जोड दिल्यामुळेच हे दैदिप्यमान यश त्यांना लाभले. आजही त्यांच्या नावावर निर्मातेमंडळी तिकीटबारीवर कसा पैसा गोळा करतात या परीकथांचे प्रयोग निरंतर सुरु आहेत याच कारण बच्चन यांचा अभिनय आणि कामाप्रती असलेली निष्ठा जपली. नाही म्हणायला एखादा ‘सिलसिला’ त्यांच्या आयुष्यात घडून गेला, परंतु एकूणातच कुटुंबवत्सल माणूस म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिले जाते. राजकारणातील अल्पकाळासाठी केलेला प्रवेश भले वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी वेळीच एक्झिट घेतल्यामुळे ते डागही फार चिकटले नाहीत. अमिताभ बच्चन हा हुकमी एक्का आहे आणि तो मिळवण्यासाठी आजही गर्दी होते हे त्यांच्या कर्तुत्वाचे प्रतीकच म्हणायला हवे. बच्चन यांच्यावर प्रेम करणारे मनाने श्रीमंत झाले, त्यासाठी त्यांना कोण बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज भासली नाही ! सुपरस्टार हे लेबल मिळवणार्यांना सार्वजनिक जीवनात विशेष दक्षता घ्यावी लागते. दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद राजेश खन्ना या मांदियाळीत अमिताभ बच्चन हे नाव कायम राहणार. त्यासाठी या मंडळींनी सार्वजनिक जीवनात बरीच पथ्ये पाळली हेही नाकरून चालणार नाही.
बच्चन यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते त्यांना भरभरून शुभेच्छा देतील आणि दिर्घायुष्य चिंततील. असे भाग्य दुर्लभ असते. हे आता विशेष प्रकर्षाने जाणवते. शाहरुख खान हे बॉलिवूडचे बादशाह मानले जातात,पण त्यांच्यावर चिरंजीवांनी आणलेली आफत पहाता नटांना झगमगणाऱ्या दुनियेत राहूनही आपले सत्व आणि चारित्र्य झाकोळले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. असे बालंट बच्चन यांनी येऊ दिले नाही. म्हणुनच ते शिखरावर आहेत. बॉलीवूडच्या नट- नट्यांसाठी त्यांच्याकडे दीपस्तंभ म्हणुन पहायला हवे.