सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यानंतर ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असली तरी फेरीवालेही संघटित होऊन व्यवसाय सुरु करण्याबाबत दबाव वाढू लागले आहेत. फेरीवाल्यांचा उपद्रव आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु ठाणे महापालिकेची भूमिका उदासीन असल्यामुळे हा विषय एकमेकांकडे बोटे दाखवण्यापलीकडे पुढे सरकत नाही. या संपूर्ण संतापजनक प्रकारावर सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनाचा कानोसा घेऊन व्यक्त केलेल्या भावना.
अमक्याचा हात
तमक्याचे लफडे
बोटे दाखवायला
सारे सज्ज….
ज्या बोटांना धरून होते
पाऊल जगी या पहिले टाकले
जी बोटे असतील नकळत
तोंडात चिमुकल्याने चोखली
ज्या बोटांनी होती
हातात खेळणी धरली
ज्या बोटांनी असेल निरागसपणे
स्वतःलाच ओरखाडले
ज्या बोटातून होती
वाळू किनारी निसटली
ज्या बोटांनी होता गिरवला
पेन्सिल धरून श्री गणेशा
ज्या बोटांनी होते
किल्ले दिवाळीत बांधले
ज्या बोटांनी होती
मूर्ती श्रींची कधी साकारली
ज्या बोटांनी असेल
प्रेमकविता हळवी लिहिली
ज्या बोटांनी असेल
चित्र सुरेख चितारले
ज्या बोटांनी असेल
शिल्प मनोहरी घडवले
ज्या बोटाने दाबली होती कळ
आणि मिरवली
शाई लोकशाहीची गर्वाने
आणि लावून गंध बोटाने
घातले असेल साकडे स्वरक्षणाचे
जी बोटे होती मग सरावली
उठसुठ मत देण्यासाठी
ज्या बोटांनी होत्या केल्या
सह्या निर्णायक,वादग्रस्त अगणिक
ती बोटे होती जमिनीवर भरचौकात
थारोळ्यात रक्ताच्या पडली
दोष होता जरुर कोणा हाताचा
बोटे गमावली मात्र कोणी कर्तव्यापोटी
एकमेकांकडे दाखवण्यासाठी
मेळावे बोटांचे भरतील
होईल कल्ला एकच
हल्ला करणारे दांभिकच
जातील बोटे जोडली शस्त्रक्रियेने
मात्र बोटे उर्वरित तोंडाला शिवली जातील
हाताची घडी घालून बसलेला समाज
गमावून बसला असेल बोटे सारी….
या बोटावरची थुंकी मग
त्या बोटावर जाईलच
कशी?
बोटे एकमेकांकडे दाखवण्याचा
थांबेल खेळ कदाचित…
अमक्याचा हात
तमक्याचे लफडे
बोटे दाखवायला
सारे सज्ज….
प्रश्न एकच
वादळला मनी
रक्ताचे थारोळे
असेच सुकू द्यायचे की
कायद्याला कोयत्यापुढे
नमू द्यायचे ?