बदमाषांचे अड्डे : पुरोगामीपणाची पहाट !

Politics is the last resort of scoundrels, असा एक विचार इंग्रजीत प्रचलित आहे. बदमाष लोकांचा राजकारण हा अड्डा आहे, असा अर्थ असणाऱ्या या विचारामुळे राजकीय क्षेत्रात वावरणारे अनेक जण व्यथित होऊ शकतात. कोणाला बदमाष म्हणवून घ्यायला आवडेल? त्यामुळे हा विचार सरसकट सर्व राजकारण्यांना लागू करणे अन्यायकारक ठरू शकते. प्रत्येक नियमास जसे अपवाद असतात तसे या विचारालाही असले पाहिजेत. काही मंडळी राजकारणाचा सद्उपयोगही करीत असतात आणि असे नेते दुर्मिळ असले तरी राजकीय क्षेत्र अगदीच तुच्छ मानण्याची गरज नाही. प्रश्न असा आहे की जरी आपण साधक-बाधक विचाराने हा विचार केला तर मग मस्साजोग (जिल्हा बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यात गुंतलेले राजकारणी हे वरील इंग्रजी वाक्य खरे करीत आहेत आणि एकूण समाजाचा दृष्टीकोन समस्त राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ करीत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे आर्थिक हीतसंबंध आहेत आणि त्यांचे मूळ स्थानिक राजकीय नेते आणि त्यांनी पोसलेल्या त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांपर्यंत (?) पोहोचत असल्याची चर्चा माध्यमातून सुरु आहे. त्यांचे खंडण होत असले तरी तो आवाज दुबळा आहे आणि राजकारण्यांबद्दल असलेल्या प्रतिकुल मतांमुळे तो कमजोरच रहाणार. त्यामुळे आरोप सिद्ध होईपर्यंत (किंवा न होईपर्यंतही!) संबंधित नेत्यांना जनतेच्या दरबारात आरोपीच्या पिंजऱ्यात बसण्याची नामुष्की आली आहे.
या घटनेमागे बीड जिल्ह्यातील पवनचक्की उद्योगाचा थेट संबंध आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार्‍या चार पवनचक्की कंपन्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने शेकडो एकर जमीन विकत घेत आहेत. या व्यवहारात होणारी उलाढाल कार्यकर्त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ‘इजी मनी’ची सवय असलेले हे नेते या व्यवहारात हिरीरीने भाग घेत असतात. त्यासाठी ना श्रम करावे लागतात की व्यावसायिक शिस्त पाळावे लागते. सरकारी अधिकार्‍यांना एक-दोन फोन करणे, त्यांनी ऐकले तर ठीक नाही तर दम भरणे एवढेच करावे लागते. कारवाई होण्याची भीती नसते कारण कोणी ‘आका’ पाठीशी असतोच! दम देऊन काम करुन घेण्यासाठी भांडवल लागते ते उपद्रवमूल्याचे. ते दहशतीने निर्माण करता येते. अशा प्रकारे खंडणीस पुरक अशी परिसंस्था गावपातळीपासून देशपातळीपर्यंत आपल्या राजकीय पक्षांनी उत्तम प्रकारे तयार केली आहे. त्याला दुर्दैवाने मान्यतेबरोबर प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे. बीडमध्ये आपल्याला जे दिसत आहे ते कमी-जास्त फरकाने देशातील सर्व जिल्ह्यांत दिसत आहे. महाराष्ट्र त्यात अग्रेसर होत चालला आहे याची मात्र खंत आहे.
ही परिसंस्था दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. कारण खालपासून वरपर्यंत फक्त एक सूत्र चालते आणि ते म्हणजे पैसा! राजकीय महत्वाकांक्षा असण्यात गैर नाही, परंतु राजकारणातून पैसा कमवणे हा मुख्य उद्देश असेल तर अनैतिक मार्गाने जाणे अपरिहार्य होते. शुद्ध राजकारण असूच शकत नाही. चारित्र्यसंपन्नतेची व्याख्या व्यभिचारापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिथे भ्रष्टाचार हे तितकेच लांच्छनास्पद ठरते. परंतु चारित्र्यहीन आणि भ्रष्टाचारी असणे हे जर आजचे राजकीय निकष झाले असतील तर निर्घृण हिंसाचाराबद्दल आश्‍चर्य वाटले तर ते भाबडेपणाचे ठरेल.
कार्यकर्ते नेत्यांकडे पहात मोठे होतात. ‘आमचे स्फुर्ती स्थान,’ ‘आमचे आदर्श’ या बिरुदावल्यांमागे सद्गुणांचे अनुकरण नसतेच मुळी. नेत्याचा सांपत्तिक उत्कर्ष, त्याचे राहणीमान, त्याची विचारसरणी, त्यांचा सवंग वा उथळपणा हे सर्व गुण कार्यकर्ते आत्मसात करीत असतात. जोवर राजकीय नेत्यांची वरची फळी शुद्ध, सात्विक आणि लोकाभिमुख राजकारणाची कास धरणार नाहीत तोवर गावोगावी संतोष देशमुख यांचे बळी जात रहाणार! बदमाषांचे अड्डे बंद झाले तरच महाराष्ट्रात पुरोगामीपणाची नवीन पहाट होईल.