कागदी वाघ म्हणून ओळखले जाऊ लागलेले नेते दररोज सकाळ- संध्याकाळ, नव्हे २४ बाय सात छोट्या पडद्यापासून सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठांवरून मुक्त संचार करीत असताना एका खऱ्या-खुऱ्या बिबळ्याने गेल्या आठवड्यात भलतेच फुटेज खाल्ले. कोणी म्हणाले येऊर, कोणी म्हणाले कोल्हापूरचा पन्हाळा आणि कोणी काय, असे या बिबळ्याच्या अनाहुत आणि तितक्याच गाजलेल्या ‘एन्ट्री’चे ठिकाण असल्याचे सांगू लागले आणि बघता- बघता हा बिबळ्या सोशल मीडियाचा हिरो झाला. प्रत्येक जण हा आमचाच आहे, असे म्हणू लागला आणि डरकाळ्या (की म्यॉव?) करणाऱ्या नेत्यांनाही क्षणभर त्याचा हेवा वाटला. सर्वसाधारणपणे नेते जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रियांचा महापूर येत असतो. त्यापैकी बहुतांश प्रतिक्रिया टीकात्मक असतात आणि नेत्याला चार खडे बोल सुनावल्याचा सात्विक आनंद प्रतिक्रिया नोंदवणाऱ्यांना मिळत असतो. काही प्रतिक्रिया सावध असतात कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे फालतू गोष्टी मानायचा विषय काही नेत्यांनी केव्हाच ऑप्शनला टाकला आहे. गंमत म्हणजे तरी संविधानाची काळजी यापैकी अनेकांना वाटत असते . असो. बिबळ्याच्या बातमीवर उमटलेल्या प्रतिक्रियांचा धांडोळा घेतला तर समाजाची मानसिकता लक्षात येते. त्यातून राजकारणी योग्य तो बोध घेतील अशी अपेक्षा आहे.
एक बिबळ्या त्याची हद्द ( हो त्याचीच हद्द) सोडून (?) फार्महाऊसच्या आवारात शिरल्याची बहुचर्चित चित्रफित देशभर व्हायरल झाली आहे. फार्महाऊसमध्ये कुत्र्यांच्या घरात बांधून ठेवलेल्या प्राण्यांना पाहून बिबळ्या सावज मिळाल्याच्या आनंदात घिरट्या घालतो. कुत्रे भुंकत राहतात आणि बिबळ्या बंद दरवाजातील सावज हाती लागणार नाही या निष्कर्षाला येऊन शांतपणे निघून जातो.
ही मिनिटभराची क्लिप लाखोंनी पाहिली आणि हजारोंनी अभिप्राय दिला. कोणी म्हणाले या जंगलांमध्ये गुन्हेगारांना सोडून द्या, कोणी सुचवले उपद्रवकर्त्यांना बिबळ्यासमोर हजर करा, काही जणांनी तर नेत्यांची बिबळ्याशी गाठ घालून द्या असा अर्कट उपायही सुचवला. महिलांना त्रास देणारे, लाल फितीत रंगून नागरिकांना नडणारे, भ्रष्टाचारी आणि बलात्कारी ज्यांच्याबद्दल समाजाच्या भावना तीव्र आहेत अशा सर्वांनाच जंगलात का सोडून दिले जात नाही, अशा सूचनांचा अक्षरशः खच पडला.
अशक्य कोटीतील आणि अव्यवहार्य वाटणाऱ्या अशा सूचनांचे उदंड पीक सतत येत असते. त्यांचा इतका नियमित रतिब असतो की, सामुहिक सहनशक्तीचा कडेलोट झालेला दिसतो. बोलघेवड्यांचा कोडगेपणा म्हणायचा की उद्दामपणा हे ज्याचे-त्याने ठरवायचे असते. परंतु एक निश्चित की, बिबळ्यांमुळे पुन्हा एकदा जनतेला व्यक्त होण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्रात काही महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी या प्रतिक्रियांची गंभीर दखल घ्यायला हवी. नेत्यांबद्दल जे उघडपणे बोलता येत नाही ते बिबळ्यामुळे बोलता आले असेल तर जनतेच्या भावनांचा विचार करणे त्यांच्या हिताचे ठरू शकेल.
बिबळे जंगलाची वेस सोडून मानवी वसाहतीत आले तर त्याला घुसखोरी म्हटले जाते. परंतु जेव्हा बिबळ्याच्या आवास-क्षेत्रात माणूस अतिक्रमण करू लागतो तेव्हा घुसखोरीचे पातक मनुष्य करीत असतो. हा वाद जुना आहे. घुसखोर कोण असा प्रश्न विचारून चर्चासत्रे आणि परिसंवादाचे पेव अधून-मधून फुटत असते. तसे ते आताही फुटेल. परंतु यावेळी बिबळ्याच्या या अभिनव करामतीमुळे या सर्व विषयाला राजकीय आयाम दिला तर अधिक वस्तुनिष्ठ चर्चा होऊ शकेल. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन व्यवस्था निर्माण केल्या. राजकारणी उभयतांमध्ये समन्वय घडवण्यासाठी असतात. दुर्दैवाने ही मंडळी बिबळ्या बनून मतदारांच्या खाजगी जीवनात शिरकाव करतात आणि गोंधळ माजवतात. त्यांनी खरे तर असे आक्रमण करता कामा नये आणि शहाण्या बिबळ्यासारखे आपल्या रस्त्याने निघून जायला हवे! तसे होत नाही कारण बिबळ्याला जसे कळून चुकले आहे की, मानव निष्प्रभ आणि हतबल आहे तसे त्याचे धारिष्ट्य वाढले आहे. मग तो कधी चक्क मॉलमध्येही फिरताना दिसू लागला आहे.
राजकारणी बिबळ्याकडून घ्यायचा तो बोध घेतीलही, परंतु पिंजऱ्यात बंदिस्त करून घेणाऱ्या मतदारांनी तो तोडून बाहेर पडायला हवे. आपण निष्प्रभ नाही हे दाखवून द्यायला हवे. एक बिबळ्या येतो काय आणि बरेच काही शिकवून जातो काय!