तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विचारांचे अधिष्ठान असावे हा नियम राजकारणातून जवळजवळ हद्दपार झाला आहे. अशावेळी एखाद्या नेत्याने केलेले भाषण तुमचे लक्ष वेधून घेत असेल आणि विचार करण्यास प्रवृत्त करीत असेल तर अद्भूतच! केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केलेले भाषण या सदरात मोडते. गडकरी म्हणाले, ‘विचारवंत, साहित्यकांनी राजाच्या विरुद्ध कितीही परखड विचार मांडले तरी राजाची ते सहन करण्याची तयारी तयारी असली पाहिजे. राजाने त्यावर चिंतन करणे हीच लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा आहे.’श्री. गडकरी यांचे विचार अत्यंत समर्पक असून आजच्या राजकारणात अत्यंत चपखल बसतात. अर्थात या मौलिक विचाराची सांप्रत काळातील नेते किती गांभीर्याने दखल घेतील हा प्रश्नच आहे. परंतु जर त्यांनी त्यातला काही अंश जरी स्वीकारला तरी त्यांचे, आणि समाजाचे थोडे भले होईल.
नेत्यांना, आजच्या युगातील त्यापैकी बहुसंख्य अनभिषिक्त राजेच असतात, टीका सहन होत नसते हे आपण वारंवार पहात असतो. सहिष्णुता आणि आत्मपरीक्षण हे प्रगल्भतेचे दोन प्रमुख गुण, परंतु ते अंगीकारणे म्हणजे टीकाकार आणि विरोधकांना शरण जाणे असा अत्यंत बालिश आणि चुकीचा अर्थ काढला जातो. सत्ता आली की तिच्याबरोबर अधिकार येणे स्वाभाविक आहे, परंतु त्यासोबत माज येतो आणि मग अंहकारी नेत्यांना त्यांचे टीकाकार क्षुद्र आणि कपटी वाटू लागतात. हे निरीक्षण सत्तेतून उच्चाटन झालेल्या विपक्ष नेत्यांतही आढळते. त्यांचा अहंकार मतदारांनी पराभव चाखून घायाळ केलेला असतो. त्यामुळे माज अधिक राग असे दुहेरी मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ताबा घेत असते. विपक्ष नेतेही टीका सहन करण्यापलिकडे असतात. त्यांना अधिक राग येतो, जेव्हा सत्तारुढ पक्ष त्यांना सातत्याने अनुल्लेखाने झोडपू लागतात तेव्हा. मग विरोधासाठी विरोध आणि त्यामागे विचार आणि विवेकशुन्यता यामुळे तर गडकरींच्या भाषणातील तो ‘राजा’ अधिक मस्तवाल बनत जातो.
राजकारण्यांची जडणघडण एका विशिष्ट विचार-प्रक्रियेतून झाली की त्यांचा अंहकार डोके वर काढत नाही. त्यांना विपक्षाबंद्दल आणि टीकाकरांबद्दल आदर वाटत असतो. त्यातूनच त्यांची सहनशक्ती वाढते आणि असे नेते टीकाकारांच्या लेखीही उत्तम ठरतात. काही नेते अजातशत्रू ठरले ते त्यांच्या या गुणामुळे. त्यांनी वैचारिक बैठक शाबूत ठेवली कारण ते सर्व बाजूंनी टीकेचे अवलोकन करू लागले. असे नेते दुर्मिळ होत चालले आहेत. ही बोच गडकरींच्या भाषणातून जाणवते.
राजकारण स्पर्धात्मक झाले आहे आणि इच्छुकांच्या रांगा दिवसेंदिवस मोठ्या होऊ लागल्या आहेत. मग कोणाला तरी रांग तोडण्याचा विचार मोहात पाडतोच. श्रेष्ठींची ओळख हा शॉर्टकट वापरताना आणि त्याची रीतसर किंमत मोजताना सत्तेच्या जवळ जाणारे नेते जेव्हा पुढे जाऊन ‘राजा’ होतात तेव्हा त्यांना टीका कोणी करील आणि ती त्यांना सहन करावी लागेल, हे विचारही ठाऊक नसतात. दुसरे कारण बहुधा मिळालेले पद टिकवण्याची धडपड त्यांना करावी लागत असते. असुरक्षिततेच्या भावनेने त्यांना ग्रासलेले असते. अशावेळी वैचारिक बैठक समृद्ध करण्याऐवजी ते पैसा आणि बळ यांच्या माध्यमातून शक्तीशाली होऊ पहातात. शक्तीशाली नेत्यांची बौध्दिक क्षमता कमी असेल तर त्यांना विरोधक दुर्बळच वाटू लागतात. त्यामुळे त्यांची ऐकून घेण्याची क्षमता कमीच असते.
आजच्या राजकारण्यांना गडकरींना अभिप्रेत क्षमता वाढवायच्या असतील तर त्यांनी स्वत:ची बौध्दिक क्षमता समृद्ध करण्याकडे लक्ष द्यायला हवे. नियमित ध्यान-धारणा, वाचन-व्यासंग, बिगर राजकीय विषयांत रस घेणे, सामाजिक-सांस्कृतिक कलांकडे लक्ष देणे, सुसंस्कृत माणसांशी संबंध ठेवणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे वगैरे बाबींवर नेते जर लक्ष देऊ लागले तर त्यांच्या मनातील असुरक्षितता कमी होऊन लोकानुनय वाढण्यास मदत होईल. बहुसंख्य नेत्यांची आजची प्रतिमा ही खडूस, संतापी, उद्धट वगैरे बनत चालली आहे. अशा स्वभावाला ऐकण्याची अॅलर्जी असते. टीका सहन करणे तर दूरच राहिले. गडकरी यांनी एक प्रकारे त्यांच्या अजातशत्रू असण्याचे रहस्य अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. आता कोणी त्यातून ‘गडकरी’ झालाच तर राजकारणाबद्दल वाटणारा उरला सुरला आदर वाढण्यास उपयोगच होईल!