गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल या खात्यांवर डोळा असणाऱ्या नेत्यांना क्वचित शिक्षण, परिवहन, सार्वजनिक आरोग्य अथवा पर्यटन या विभागांबद्दल ओढ वाटते. त्यांच्या मते खरी (?) ‘पॉवर’ पहिल्या चार खात्यांतच असते आणि ही खाती ज्यांना स्वतःकडे ठेवता येतात त्यांना आपल्याकडे निर्विवाद सत्ता असल्याचा भास होत राहतो. अर्थात तो भासच असतो कारण आम्ही ज्या पुढील चार तथाकथित दुय्यम खात्यांबद्दल बोलत आहोत ती खाती खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतात. गृहखाते हा भास असेल तर परिवहन विभाग हे लोककल्याणकारी सरकारची ओळख आणि वास्तव असते हे नाकारून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची सूत्रे गृह खात्याच्या माध्यमातून स्वतःकडे ठेवण्याकडे बहुमत असणाऱ्या पक्षाचा जोर असतो. कारण त्यांना संपूर्ण व्यवस्था आपल्या पूर्ण नियंत्रणात आहे असे वाटत असते. अशावेळी ताटकळणारा आणि त्रस्त प्रवासी, बिघडलेली शिक्षण व्यवस्था किंवा सातत्याने दुर्लक्षित राहिलेले पर्यटन वा आरोग्य खाते हे हलकेच वाटत राहते. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांपेक्षा ‘पॉवर’ आजमावण्याकडे कल असणे हे चुकलेल्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ते आपण खातेवाटपास झालेल्या दिरंगाईतून पाहिलाच !
तूर्तास आम्ही प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन विभागाची जबाबदारी आल्याबद्दल आनंदी आहोत. त्याची अनेक कारणे आहेत. गाव तिथे एसटी असे बिरूद मिरवणारी राज्य परिवहन सेवा त्यांच्या अधिपत्याखाली येते आणि एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असते. तेथील समाजजीवन आणि आर्थिक व्यवहारात एसटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिचा गेल्या काही वर्षात उडालेला बोजवारा, वाढत चाललेले नुकसान, वाहक-चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपेक्षा, वारंवार झालेले संप, त्यांचा सेवेवर झालेला विपरीत परिणाम या गोष्टींमध्ये श्री.सरनाईक यांना लक्ष घालावे लागणार आहे. मुळात परिवहन खाते दुय्यम महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ट्या बक्षीसाऐवजी
शिक्षेचे मानले नाही तर श्री.सरनाईक यांच्या हातून अनेक प्रलंबित प्रश्न सुटू शकतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सावळा गोंधळ दूर करणे आणि तेथील भ्रष्टाचाराला आळा घालणे ही आव्हाने त्याना स्वीकारावी लागतील.
खडतर रस्त्यावरून चालत ते आज मंत्रीपदाच्या मुक्कामी पोहोचले आहेत. ही संधी त्यांना त्यांचे राजकीय भवितव्य भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हातून अमुलाग्र बदल खरोखरीच घडले तर त्यांचे नाव घराघरात जाऊ शकेल. श्री. सरनाईक हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे कोणत्याही धंद्यातील नफा-तोट्याची गणिते त्यांना उत्तम अवगत आहेत. परिवहन उपक्रमाकडे तोटा करणारा पांढरा हत्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल यावर श्री. सरनाईक यांचे मंत्रीपदाचे यश अवलंबून असणार आहे. कमीत कमी खर्चात आणि कल्पकतेचा कमाल वापर करून ( याला K-4 फॉर्म्यूला म्हणूया! ) त्यांनी व्युहरचना आखली तर अनेक न सुटलेली कोडी सुटू शकतील. जी गत एसटी महामंडळाची आहे तीच गत शहरी भागातील डबघाईस आलेले सार्वजनिक वाहतूक उपक्रमांची. महापालिकांचे हे उपक्रम डोकेदुखी होऊन बसले आहेत. त्यांच्या मुळात जाऊन श्री. सरनाईक यांना मार्ग काढावा लागेल. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांइतकेच दैनंदिन दळणवळणाचे महत्त्व आहे. ही यातायात यातनामुक्त कशी होईल यासाठी शहरी सार्वजनिक वाहतुकीचा स्वतंत्र विभाग परिवहन मंत्रालयात असावा या आमच्या जुन्या मागणीचा आम्ही पुनरुच्चार करतो. तसे झाले तर प्रवासी-हीताचे ठरेल. जोडीला रिक्षा-टॅक्सी वाहतूक, खाजगी बससेवा वगैरेंचे प्रश्न सोडवण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागेल. मेट्रो सेवा पुढील काही महिन्यांत अनेक ठिकाणी पूर्णत्वाला जाईल, तेव्हा निर्माण होणारी स्थिती, बदलणारे संदर्भ आणि अपेक्षा या सर्वांचा विचार करून तोडगा काढण्याचे काम सरनाईक यांना करून दाखवावे लागणार आहे. ‘लास्ट माईल’ म्हणजेच प्रवाशाला घरापर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सरनाईक यांच्या हातून झाले तर आगामी काळात गृह, अर्थ, नगरविकास यांच्या इतकेच महत्त्व परिवहनला येऊ शकते. हे काम श्री. सरनाईक यांनी करून दाखवावे हीच अपेक्षा. प्रवाशाला केंद्रबिंदू मानले तरच ते शक्य आहे.