केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावल्याचा आनंद होणे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा आपण ज्या शहरात रहातो त्याचा क्रमांक अव्वल नसला तरी तो खाली घसरला नाही याचे समाधानही वाटत आहे. ठाण्याने गतवर्षीचा १४ वा क्रमांक कायम राखला आहे तर नवी मुंबईचा क्रमांक तीनवरून चार झाला असला तरी १० ते ४० लाख लोकसंख्या असणार्या शहरांपैकी ते पहिल्या क्रमांकावर आले आहे.
या क्रमवारीचा विचार करता अनेकांच्या मनात शंका आल्या असतील तर काही जणांच्या भुवया उंचावल्या असतील. त्याचे कारण जी शहरे स्वच्छतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आली, (उदाहरणार्थ सुरत, इंदौर वा विजयवाडा) तेथील वस्तुस्थिती आपल्याला कळण्यास मार्ग नाही. परंतु आपण ज्या शहरात रहातो तेथील प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर निवड समितीच्या निर्णयाबद्दल आणि त्यांनी ठरवलेल्या निकषांबद्दल शंका येऊ शकते. काही वर्षांपूर्वी ठाणे शहराला अनधिकृत बांधकांविरुध्द कारवाई केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला होता. प्रत्यक्षात आजही एका प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेरील पदपथ अतिक्रमणाने व्यापला आहे! सरकारी समित्यांच्या कार्यपध्दतीबद्दल म्हणुनच शंका घेण्यास वाव रहातो.
ठाण्याने
१४वा क्रमांक सोडला नाही यात समाधान मानले तर आपण अव्वल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत असा खेदही होतो. गेल्या काही दिवसांपासून आम्ही स्वत: ठाण्यातील विविध भागांत सकाळचा मॉर्निग वॉक घेण्यासाठी जात आहोत. जमेल तेव्हा आणि जमेल तितके आपल्या शहरातील विविध भागांत चालण्याने आपल्या शहराची अधिक जवळून ओळख होते. शहराचा ‘फिल’ येतो, समस्या समजतात, विसंगती लक्षात येतात, त्या-त्या परिसरातील नागरीकांच्या सवयींचा अंदाज येतो, त्यात ते वाहने कुठे आणि कशी पार्क करतात, कचरा कुंडीत कचरा कसा टाकतात, बहुमजली इमारती असोत की झोपडपट्टी विभाग तेथील किमान स्वच्छतेबाबत ते किती गंभीर आहेत वगैरेचे अवलोकन होते. वर्तकनगर-लोकमान्यनगरच्या म्हाडा कॉलनीपासून हिरानंदानी मेडोज, घोडबंदर रोडवरील वाघबीळ ते मानपाडा परिसर, बाळकूम-कोलशेत, पोखरण रोड नं.१ आणि २, श्रीरंग-वृंदावन-अनंतपार्क-फ्लॉव्हर व्हॅली, खोपट, वागळे इस्टेट, ब्रम्हांड अशा सर्वच भागांत गेल्या दिड-दोन महिन्यात आम्ही आनंदाने पालथा घातला. यापैकी काही प्रभाग (मेंटल हॉस्पीटल, समतानगर, भास्कर कॉलनी, वसंत-विहार आदी) खरोखरीच स्वच्छतेबाबत विलक्षण वाटले. परंतु वाघबीळ-मानपाडा जिथे बिल्डरमंडळी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत तेथील परिस्थिती ठाण्याला १४ वा क्रमांक तरी कसा मिळाला असा प्रश्न पडावा इतकी वाईट आहे. ठिकठिकाणी प्लॉस्टिकच्या पिशव्यांचे ढिग, रिकाम्या बाटल्यांचे खच, घरदुरुस्तीचा कचरा, अनेक महिन्यांपासून बंद पडलेली वाहने, निरुपयोगी झालेले फर्निचर असा सारा टाकाऊ वस्तूंचा भंगार ठिकठिकाणी दिसला. हे चित्र जे नागरीक दररोज सकाळ-संध्याकाळ पहात असतील, त्यांना या पुरस्कार क्रमवारीबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही.
संबंधित नगरसेवक या निरीक्षणांची दखल घेऊन महापालिकेच्या स्वच्छता विभागास योग्य त्या सूचना देतील ही अपेक्षा आहे. ठाण्याचे विपक्ष नगरसेवक आक्रमक झालेले दिसतात. त्यांनी ठाण्याचा नंबर वर का सरकला नाही यावर चर्चा घडवून आणावी. अर्थात त्यांच्या प्रभागात किमान स्वच्छतेसाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे. तरच त्यांना नैतिक अधिकार मिळेल.
स्वच्छता हा असा विषय आहे की त्यात तरी राजकीय मतभेद असता कामा नये. शहर तेव्हाच स्वच्छ बनते जेव्हा सर्व संबंधितांचा दृष्टीकोन स्वच्छ आहे. आंतरिक स्वच्छतेचे प्रतिबिंब शहराच्या स्वच्छतेत उमटत असते. हे लक्षात घ्यायला हवे. पुढच्या वर्षी पहिल्या क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न होतील ही अपेक्षा. त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!