लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर विधान परिषदेत त्या पराभवाची थोडी भरपाई काढून महायुती पुन्हा पूर्वपदावर येऊन आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यास सज्ज होताना त्यांना संशयाने घेरले आहे. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपेक्षित यक्षापेक्षा काँग्रेसच्या फुटलेल्या मतांची आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव याचीच अधिक चर्चा झाली. महाआघाडीतील घटक पक्षांच्या पदरी पडलेले अपयश महायुतीच्या मतांच्या अचुक व्यवस्थापनामुळे झाले याचा आनंद सत्तारूढ पक्षाला झाला आहे. उत्साहित करणाऱ्या वातावरणामुळे भाजपात आत्मविश्वास वाढला आहे. पक्षाच्या निवडणूकपूर्व बैठकीत त्याचे दर्शन झाले आणि त्यातूनच दिसला तो भाजपाचा आक्रमकपणा! पक्षाच्या या बैठकीत मित्रपक्षांविषयी (शिवसेना-शिंदे आणि राष्ट्रवादी-अजित पवार) उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षाच्या अनेक खासदारांच्या पराभवास मित्र पक्ष जबाबदार असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरु होतीच. तिची वाच्यता पक्षाच्या व्यासपीठावर झाली.
शिवसेना आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा उमदेवारांचे काम केले नाही अशा तक्रारी बैठकीत मांडल्या गेल्या. शिवसेनेत भाजपाबद्दल अशी नाराजी व्यक्त झाली नाही तरच नवल. एकमेकांच्या पराभवाची त्यामुळे खरी कारणमीमांसा होणार नाही. उलट एकमेकांकडे संशयाने पाहिले जाईल आणि त्याचा फटका पुन्हा बसू शकेल याची कल्पना महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांना नसेल असे नाही. उभयपक्षी असे आरोप-प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे. कौटुंबिक संबंधातून अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार या शरद पवारांचे वास्तव्य असणाऱ्या मोदी बागेत गेल्यामुळे तिथेही संशयाचे ढग जमा झाले. आता तर अजित पवार स्वगृही परतणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत. एकेकाळी त्या बातम्या खरेच वावड्या ठरायच्या, परंतु अलिकडे राजकारणाचा पोत इतका बदलला आहे की निष्ठेचे वस्त्र पूर्ण जिर्ण झाले आहे. पहाटेचे शपथविधी असोत किंवा नेत्याला पिता-समान वगैरे मानणारे पोरगं क्षणात कुंपणावरुन उडी मारुन प्रतिस्पर्धी नेत्याला गॉडफादर मानू लागतो! अशावेळी जनतेलाही या वावड्या खऱ्या वाटू लागतात.
लोकसभा मतदारसंघ हट्टाने मागून तिथे विजय मिळवणाऱ्या शिवसेनेने ठाण्याच्या जागेचा आग्रह धरला तर काय होईल, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. विद्यमान आमदार संजय केळकर हे दोनदा विजयी झाल्यामुळे भाजपा या जागेचा आग्रह धरणार यात वाद नाही. यामुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी उडू शकते. नरेश म्हस्के यांच्या विजयात ठाण्याने म्हणावा तेवढा हात दिला नाही अशी ओरड सुरु झाली आहे. मित्र-पक्ष सहकार्य करीत नाहीत या भाजपाच्या आरोपाला सेनेकडून असे उत्तर दिले जाऊ शकते. आरोपातील तथ्य आकडेवारीवरुन स्पष्ट होते. दूध का दुध, पानी का पानी. परंतु संशयाचे पाणी दुधात मिसळले गेल्यामुळे चव तर बिघडणार आहेच.
लोकसभेत कोणाची किती ताकद आहे हे विधानसभानिहाय मिळणाऱ्या मतांवर ठरत असते. तद्वत महापालिकेतील प्रभागनिहाय पक्षीय बलाबल त्या-त्या पक्षांचे प्राबल्य स्पष्ट करीत असते. या फूटपट्टीवर सेनेची सत्ता ठाणे महापालिकेत असल्यामुळे त्यांचे पारडे जड होते. अर्थात नौपाड्यासारख्या विभागात भाजपाने महापालिकेत मुसंडी मारल्यामुळे विधानसभेच्या जागेवर त्यांना दावा करण्यासाठी नैतिक अधिकार प्राप्त होता.
ठाणे विधानसभेत राजन विचारे 2500 मतांनी पूर्वी निवडून आले होते. संजय केळकर यांनाही लक्षणीय मताधिक्य मिळाले होते. मनसेच्या राजन राजे आणि अविनाश जाधव यांनीही चमकदार कामगिरी बजावली होती. त्यामुळे ठाणे मतदारसंघात अटीतटीची लढत होऊ शकते. अर्थात संशयाचे वातावरण दूर झाले नाही तर घात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.