प्राचिन काळापासून आपल्या देशात व्यक्तीपूजा होत आली आहे. तो जणू आपल्या जनुकीय साखळी (डीएनए) अविभाज्य भाग बनला आहे. अर्थात अशी व्यक्ती पूजनीय असेल तर या अंगभूत सवयीकडे आपण अनुकरणाच्या पातळीवर पहात असतो. परंतु तीच जर नैतिकदृष्टया अनुकरणीय नसेल तर व्यक्तीपूजेचे वर्णन स्तोम असे केले जाते. अलिकडे जागोजागी व्यक्तीगत स्तोम माजल्याचे आपण पहात (डोळ्यासमोर आणा जागेजागी लागलेले फ्लेक्स) असताना अचानक संपूर्ण देशात अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने समस्त भारतीयांचे आदर्श असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना सार्वजनिक जीवनात (पब्लिक डिस्कोर्स) अग्रगण्य स्थान मिळाले आहे. धर्मनिरपेक्ष मंडळी त्यास ‘स्तोम’ मानत असले तरी बहुसंख्यांसाठी तो श्रद्धेचा आणि अस्मितेचा मुदा बनला असून त्याचे राजकीय पडसाद उमटवणार हे अपरिहार्य आहे.
प्रभू रामचंद्राच्या नावाचा उपयोग करुन त्यांचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. भाजपाने आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी त्या आक्षेपांकडे फारसे लक्ष दिलेले नाही. आगामी निवडणुकीत चारशे जागांचे किमान लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपाने राममंदीराबाबत दिलेले आश्वासन पाळल्याचे दाखवून मतदारांच्या व्यापक पाठिंब्याची तजविज केली आहे, हे कसे नाकारता येईल?
राम, हा विषय धर्म, राजकारण आणि इतिहासातील प्रवादांपासून दूर ठेवला तर रूढ अर्थाने समाजाने स्वीकारलेले व्यक्तीपुजेचे संदर्भ गळून पडतील. राम-भक्ती आणि रामाबद्दल जनमानसात असणारी आस्था याचा विचार पुढे येऊ शकेल.नव्हे तेच अधिष्ठान (नॅरेटिव्ह) बनू शकते. ‘राम’ नावाचे एकमुखी सुत्र तयार करुन देशबांधवांना पुढच्या प्रवासाकरिता सज्ज करण्याचा मार्ग तर भाजपाने निवडला नसावा, अशी शंका काही जणांच्या मनात आली असेल आणि त्यामुळेच त्यावर चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न होत राहतील. विपक्षांच्या अशा प्रयत्नांना किती यश लाभेल हे सांगता येणार नाही. राम म्हणजे हिंदुत्व यापेक्षा रामाची सांगड नैतिकता, सुशासन, जनहित आणि निर्विवाद नेतृत्व यांच्याबरोबर घालून विपक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. रामाने घालून दिलेला आदर्श एक सर्वमान्य व्यवस्था (रामराज्य) निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरत असेल तर देशाच्या व्यापक दृष्टीने तसा घडवण्याची व्युहरचना . नैतिक मूल्यांना आणि सदाचाराला समर्थन रामाच्या प्रतिमेतून करण्याचा डाव असेल तर त्यास राजकीय चाणाक्षपणाच म्हणावा लागेल.रामाचे अनुकरण करा असे सुचित करताना अन्य धर्मांची हेटाळणी करा, असे ना बोलले जात आहे की तसा प्रचार कोणी करु पहात आहे. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग रामायण असेल तर ते ज्या व्यक्तीभोवती केंद्रीत आहे, तिचे महात्म्य कमी कसे कोणाला करता येईल. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बहुसंख्य समाजाच्या श्रद्धास्थानांना सार्वजनिक परीक्षेत्रात आणले जात असते. याचा अर्थ अल्पसंख्यांना कमी लेखणे, दुजाभाव करणे हा सोयीस्कर अर्थ काढणे चुकीचे ठरेल.
सार्वजनिक जीवनात प्रभू रामचंद्रांनी आखून दिलेला त्याग, पावित्र्य, मंगलमय भक्ती, प्रेम, साहस, आदी सद्गुणांचा प्रसार व्हावा यासाठी व्यक्तीपूजा होत असेल तर त्यात वावगे काही नाही. आजच्या (कलियुगात) रामाची शिकवण व्यवहार्य ठरेल काय, असा प्रवाद काही मंडळी करतील. क्षणभर त्यांचा मुद्दा विचारात घेतला आणि कबूलही केला तर मग रामाला पर्याय कोण हेही सांगितले जायला हवे. आपण कोणीतरी ‘वेगळे’ आहोत हा खटाटोप करणारी काही मंडळी रामजन्मभूमी आणि त्याभोवती असलेले वाद विनाकारण उकरुन काढत असतात. त्यावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे आणि भविष्यात होत रहाणार. परंतु म्हणून रामावरील भक्ती तसुभरही कमी झालेली नाही, हे विशेष!
नव्या युगात, नव्या संदर्भात रामाच्या प्रतिमेतही बदल करुन रामराज्याची संकल्पना पुढे नेता येईल. उदाहरणार्थ वंचितांवरील अन्यायाचे निराकारण, कायद्याचे पालन, एकनिष्ठता, त्यागाची भावना, व्यापक विचार, उदात्त भाव, अशा गुणांची समाजात आज गरज आहे. रामनामाचा जप करताना त्यांच्या आदर्शातून नवीन युगात कसे अनुकरण होईल हे पहायला पाहिजे. रामाची डोळस भक्ती देश तारु शकेल. त्यासाठी राम सर्वांचा होणे गरजेचे आहे. भारतवर्षाचे राम प्रतिक होऊ शकते, अर्थात त्यासाठी शंभर टक्के अनुकरणाची गरज आहे. मनात वसलेल्या रामाला स्मरुन एका नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा ऐतिहासिक क्षण भारतीयांच्या नशिबी आला आहे. दोन-चार दिवस रामाचा जल्लोष करुन पुढे तो विस्मरणात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.आता हा सर्व खटाटोप २०२४ मध्ये रामराज्य आणण्यासाठी आहे हे सांगायला राजकीय तज्ज्ञाची गरज नाही!