झळा या लागल्या जीवा……

निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान झाले आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी टक्का 57.82 नोंदवला गेला आहे. 2019 च्या तुलनेत हा टक्का सातने कमी आहे. उष्णतेची लाट हे घटलेल्या प्रतिसादामागचे कारण सांगितले जात आहे. ते खरेही आहे. पण उन्हाच्या झळा सहन करीत आणि दूर मतदान केंद्रापर्यंत पायपीट करावी यासाठी ठोस कारण आणि योग्य उमेदवार रिंगणात होता काय हा प्रश्नही विचारावे लागेल. राजकारणाला कंटाळलेल्या अनेक नागरिकांनी मतदान करण्याची इच्छाच राहिली नसल्याचे जाहीर केले आहे, त्याचे काय?नेते या वास्तवाकडे डोळेझाक करतात कारण त्याचे उत्तर त्यांच्या जीवास कळा लावून जाईल. अधिक मतदान म्हणजे विद्यमान सरकारविरोधी कौल (अँटी इंक्यूमबेन्सी) असे गृहितक सर्वमान्य झाले आहे. तो सरसकट खरा ठरत नसल्याचा निष्कर्षही 1980 ते 2012 दरम्यान झालेल्या 128 निवडणुकांचा अभ्यास करता काढण्यात आला आहे. यापैकी सरासरी 36.6 टक्के सरकारे पुन्हा निवडून आली आहेत. 1980 च्या दशकात अधिक मतदान होऊनही 44.7 टक्के सरकारे पुन्हा निवडून आली होती. 90च्या दशकांत मात्र हा टक्का 21.1 टक्क्यांवर आला, 2000च्या दशकांत 42.6 टक्के झाला. सरकारे पराभूत होण्याची कारणे वाढलेल्या वा घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीत असली तरी मतदारांचे वर्तन हे त्या-त्या वेळच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर आणि घटनांवर अवलंबून असते. प्रमुख नेत्याचा आकस्मिक मृत्यू, एखादी जातीय दंगल, हिंसाचारव, आणीबाणीसारखी घटना, पुलवामासारखी घटना, भ्रष्टाचाराची प्रकरणे,आदींचा मतदानाची टक्केवारी आणि मतदारांची मानसिकता यावर निर्णायक प्रभाव पाडत असते.
आपण आता महाराष्ट्राचा विचार करु या. राज्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीचा मतदानावर प्रभाव रहाणार आहे. तो संमिश्र असू शकतो. उदाहरणार्थ ज्यांना दोन वर्षातील राजकीय घडामोडी नितीशून्य वाटत असतील तर ते कंटाळून पाठ फिरवतील. ज्यांना जे झाले ते चुकीचे होते असे वाटत असेल ते त्वेषाने मतदानास बाहेर पडतील. ज्यांना पक्ष फुटून झालेल्या आघाड्या आणि युत्या समर्थनीय वाटतात ते मतदानात भाग घेऊन त्यांचा पाठिंबा त्यांच्या आवडत्या नेत्याला/पक्षाला देतील. ही तिहेरी शक्यता मतदानाचा टक्का ठरवणार आहे. तो प्रस्थापित सरकारविरोधीही जाऊ शकतो किंवा बाजूने.
व्यापक राजकीय स्थितीचा व्यक्तीगत मतदाराच्या मानसिकतेवर परिणाम नेमका काय होईल याचा अंदाज बांधता येणार नाही. उदाहरणार्थ शिवसेनेने (ठाकरे) काँग्रेसबरोबर जाणे याचा पक्षातील लोक समर्थन करतील. पण मतदान करतीलच असे नाही. अर्थात पक्षाशी वर्षानुवर्षे बांधिलकी असणारे राग व्यक्त करण्याऐवजी माफ करण्याचा निर्णयही घेऊ शकतील. त्या त्या वेळच्या घटना निर्णय प्रक्रिया बदलत राहतात. त्यात प्रसंगी तर्काचा वापर होतो तर काही प्रसंगी शुद्ध भावनांचा आधार घेतला जातो.ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाणे यावर जशा दोन प्रतिक्रिया उमटतील तशा एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बाहेर पडणे आणि भाजपाशी हातमिळवणी करणे किंवा भाजपाला अजित पवारांशी सोयरीक करण्यावर परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू शकते. हा व्यक्तीगत विचार सरळधोपट सार्वजनिक कौल-दर्शक ठरेल असे नाही. पवारांच्या किंवा ठाकऱ्यांच्या घरातील भांडणे वेगवेगळे परिणाम साधणार आहेत.ज्या गतीने राजकारण महाराष्ट्रात घडले त्याची सवय मतदारांना नव्हती. नीतीमत्ता आणि नेत्यांच्या भाषेचा घसरलेला स्तर यांचाही मतदानावर परिणाम होणार आहे. त्याचा वाढत्या तापमानाशी कदाचित संबंधही नसेल.
कर्तव्यभावनेने मतदान करण्याची उर्मी अनेक मतदारांत असते परंतु ते चिडले आहेत की माफ करण्याच्या मन:स्थितीत हे मात्र सांगता येणार नाही. अशा स्थितीत जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याकडे पक्षांचा कल असणार. ही बाब जो उमेदवार साध्य करील त्याला स्पर्धेत टिकून रहाणे शक्य होईल. यासाठी काही नेते प्रयत्नशील आहेत. कार्यकर्त्यांना तशी ‘टार्गेट’ देण्यात आली आहेत. हे मतदान पक्षनिष्ठा नेत्याबद्दल वाटणारे प्रेम यासाठी असेलही, पण ते मनापासून झाले असेल का हे सांगता येणार नाही. मतदारांना मतदान ‘करावे’ वाटणे अशी स्थिती निर्माण झाली तर लोकशाहीच्या उत्सवाला अर्थ येतो. अन्यथा त्यांचे प्रेम बेगडी ठरू शकते. लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे त्यांनी बजावलेला मतदानाचा हक्क. तो त्यांनी पार पाडावा याकरिता प्रत्येक पक्षाकडे एक तरी मुद्दा असायला हवा की त्यामुळे मतदान करण्याची अंतरिक उर्मी मतदारांमध्ये चेतवली जाईल. तुर्तास असे मुद्दे आणि तसे उमेदवारही अभावानेच दिसत आहेत. मोदींचा किंवा राहुल गांधींचा चेहरा असणे ठीक हो, पण राजकीय पक्ष मतदारांच्या चेहऱ्यात स्वत:ला कधी शोधणार हा कळीचा मुद्दा आहे!
जाता-जाता: नाक मुरडणाऱ्या एका तरुण मतदाराला मतदानाचे महत्त्व आणि पावित्र्य पोटतिडकीने समजावल्यावर त्याने असे उत्तर दिले: महत्त्वाचे सांगू नका. ते आम्ही जाणतो. तुमच्या उमेदवाराला ते सांगण्याची गरज आहे. दोन निवडणुकांदरम्यान महाशय कुठे असतात हे विचार बरे त्यांना. आम्हाला वाटतं पावित्र्य आणि राजकारण हे परस्परविरोधी शब्द आहेत. त्यावर न बोललेलेच बरे. यावरुन नेत्यांना एक बोध घ्यावा लागेल. उमेदवार चांगला असेल तरच मतदान वाढत असते. मग तो विपक्ष असो की सत्तारुढ गटाचा.