नौपाडा-पाचपाखाडीतील वीज समस्येवर दक्ष नागरिकाचा फॉर्म्युला
उप केंद्रासाठी महापालिकेकडे जागेची मागणी
ठाणे : नौपाडा-पाचपाखाडी परिसरात जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नवीन इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असली तरी त्या तुलनेत वीज पुरवठा होत नसल्याने या भागात वीजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात उपकेंद्र उभारण्यासाठी महापालिकेने ६०० चौरस मीटरची जागा महावितरणला द्यावी, अशी मागणी येथील जागरूक नागरिकाने केली आहे.
एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जुन्या ठाण्यातील नौपाडा-पाचपाखाडी भागात अशा इमारतींचा मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होत असून नवीन इमारतीही उभारल्या जात आहेत. महापालिका नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी देऊन पाण्याची सोय करून देत असली तरी या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढा वीज पुरवठा तूर्त होत नसल्याने या परिसरात वीजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने या परिसरात वीजेची मागणीही ५० टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी वीज यंत्रणेवर मोठा ताण पडून अधूनमधून वीज पुरवठा खंडित होऊ लागला आहे. याबाबत येथील जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी महापालिकेला काही सूचना केल्या आहेत. या परिसरात ट्रान्सफॉर्मर अतिभारीत झाले असून भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
या परिसराला दूरच्या उपकेंद्रांतून वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही केबलमध्ये बिघाड झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास एवढा वेळ लागतो. या भागात नवीन उपकेंद्र झाल्यास प्रत्येक फिडरवर १०० ॲम्पिअर वीजभार येऊन वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, असे मत श्री.मोने यांनी व्यक्त करत महावितरणला ६०० चौरस मीटर जागा उप केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. नवीन पुनर्विकासाचे प्रस्ताव आल्यास आधी ट्रान्सफॉर्मरसाठी जागा आरक्षित करावी, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना श्री.मोने यांनी महापालिकेला केली आहे.