कौशल्य विकासासाठी पहिले ‘कम्युनिटी सेंटर ऑफ एक्सलन्स’ भिवंडीत

ठाणे: कौशल्य विकासासाठी पहिले ‘कम्युनिटी सेंटर ऑफ एक्सलन्स’ भिवंडीत सुरू केले आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी मार्फत, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्थापन केलेल्या व ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या लॉजिस्टिक्स स्किल कौन्सिल या संस्थेसह भागिदारीत हे केंद्र सुरू केले आहे.

भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्र २२ दशलक्ष लोकांना रोजगार देणारे सर्वात मोठ्या रोजगार क्षेत्रांपैकी एक आहे. तेव्हा, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा अभाव कमी करण्यासाठी अशा प्रकारची केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राद्वारे लाभार्थीना कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच वेअर हाउसिंग, वाहतूक आणि पुरवठा साखळीच्या इतर कामाकाजाशी संबंधित प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच रोजगार निर्मितीवरही भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भिवंडी येथे पहिले केंद्र सुरू केले असून त्यानंतर आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत असे आणखी एक केंद्र गुवाहाटीमध्ये सुरू केले जाणार आहे. दोन्ही केंद्रांच्या माध्यमातून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण ५०० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये वंचित वर्गातील लाभार्थी, स्त्रिया, दिव्यांग व्यक्तीचा समावेश असणार आहे.हा उपक्रम लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासह ३० टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाजात सहभागी करून घेणार असल्याचे महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन यांनी सांगितले.