ठाण्यात तीन-तीन ‘अंडरकरंट’ ?

भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लवकरच ठाण्याचा प्रश्न निकालात काढतील, अशा वेड्या आशेवर नवीन आठवडा सुरु होत आहे. उभय पक्षांनी केलेल्या दाव्यांमुळे सर्वप्रथम जागा कोणाच्या वाट्याला जाणार आणि त्याबाबत एकमत झाल्यावर मग उमेदवार नेमका कोण असणार, यावर निर्णय होण्यात आणखी काही काळ लोटणार. हे अपरिहार्य असले तरी परवडणारे ठरेल का हा प्रश्न आहेच. अशावेळी किमानपक्षी उभय पक्षांनी त्यांचा-त्यांचा उमेदवार ठरवून ठेवायला हवा होता. तसेही न झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे प्रचारात आघाडी घेत रहातील. त्यामुळे उमेदवार तातडीने जाहीर होणे महायुतीच्या हिताचे ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुख्यमंत्र्यांचे ‘होम-पिच’ अशा अनुकूल वातावरणाचा लाभ महायुतीच्या उमेदवाराला मिळणे खरे तर जमेची बाजू होती. ‘होती’ यासाठी कारण जागेवर जो घोळ सुरु आहे तो पहाता जमेच्या बाजुला अनिश्चिततेचे ग्रहण लागले आहे. ते दूर करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न तुटपुंजे ठरण्यामागे महायुतीला त्यांच्या पाठीशी जनसमर्थन आहे, हा ठाम (गैर)समज आहे. तो खरा ठरावा असे महायुतीमधील घटक पक्षांना वाटत असेल तर त्यांच्यात एकमत होणे काळाची गरज आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचा (आता ठाकरे गट) खासदार, युतीचा होता आणि तरी दोनदा निवडून आला होता.विचारे याना त्याचे श्रेय द्यायला महायुती त्याना द्यायला तयार नाही. पहिल्या विजयास मोदी-लाट (2014) तर दुसऱ्यास पुलवामा (2019) हे कारणीभूत होते असे म्हटले जाते. अर्थात सारे श्रेय तेव्हाही शिवसेना भाजपाला कधीच देत नव्हती आणि आजही जागेसाठी आग्रह धरताना ते श्रेय द्यायला तयार नाहीत. मग शिवसेनेच्या मतांमध्ये आणखी कोणता घटक कारणीभूत होता, याचा शोध घेता तो आनंद दिघे फॅक्टरचा आहे, हे स्पष्ट होते. अर्थात हा फॅक्टर ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडे विधानसभा क्षेत्रात जितका निर्णायक होता तितका बेलापूर, ऐरोली, मीरा-भाईंदरमध्ये असेलच असे नाही. त्याची स्पष्ट विभागणी करता येणार नाही. कल्याण डोंबिवलीत जनसंघाचा, नवी मुंबईत नाईक परिवाराचा आणि ठाणे पट्ट्यांत कै दिघे यांचे प्रभाव असले तरी मतांमध्ये प्रत्येक घटकाचा वाटा कळण्यास वाव नाही . ठाण्यात तीन-तीन अंडरकरंट आहेत, हे कबूल करावे लागेल.त्यामुळे जसे उद्धव ठाकरे यांचा ‘अंडरकरंट’ असल्याचे बोलले जात आहे, तसा कै. दिघे यांचा अंडरकरंट नाकारता येणार नाही. भाजपा दोन सेनेतील दूहीचा फायदा घेऊन आक्रमक झाली आहे, असे वाटते. शिवसेना शिंदे गटाला त्याचा फायदा घेण्यासाठी किमान पक्षी त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या ‘गद्दारी’चा ठपका पुसण्याचा विचार प्रचारात करावा लागणार. निष्ठावंत शिवसैनिक आणि कै. आनंद दिघे यांचे समीकरण केवळ त्यांची छबी वापरुन सिद्ध होणार नाही. शिवसेना भावनांच्या आधारे चालणारा पक्ष आहे, श्री. शिंदे यांना प्रचारात उतरुन हा आत्मविश्वास शिवसैनिकांना आणि मतदारांना द्यावा लागणार आहे. कै. दिघे यांची एक ‘मत-पेढी’ आजही अस्तित्वात आहे, हे नाकारुन चालणार नाही.
आम्ही सुरुवातीपासून सातत्याने एका
गोष्टीवर आक्षेप घेत आलो. उमेदवार ठरवताना त्याच्या इतर गुणांपेक्षा त्याच्या सांपत्तिक स्थितीचा विचार होणे मतदारांना फार रुचणारे नाही. गुणवत्तेला पैशांसमोर कमी लेखणे या मतदार संघातील बहुसंख्य मतदारांना मान्य नाही. मोदी आणि पर्यायाने विकासाचे मुद्दे या विषयांवर मते मागितली जाणे ही मतदारांची इच्छा डावलली जाणे योग्य नाही.क”किंबहुना जो वेळ महायुतीने उमेदवार ठरवण्यासाठी घालवला आहे त्याची भरपाई चांगली प्रतिमा असेलेला उमेदवार भरुन काढू शकेल. अशा वेळी पैशांपेक्षा उमेदवाराची भूमिका, त्याची प्रतिमा, त्याचे संवाद-कौशल्य आणि चारित्र्य वगैरे महत्वाचे ठरेल. जो, विलंब झाला आहे तो एका परीने चांगला उमेदवार निश्चितच करण्यासाठी उपयोगीही ठरू शकेल. विचारे पैशांपेक्षा सहानुभूतीचे भांडवल करतील आणि त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी सहानुभूतीऐवजी संवाद, सर्वसमावेशकता आणि सक्षम गुणवत्ता असलेला उमेदवार महायुतीला द्यावा लागेल. ठाण्यापुरते बोलायचे झाले तर इथला निकाल रालोआची संख्या 401 वर नेऊ शकते किंवा 399 वर. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या शहरातील उमेदवाराकडे वेगळ्या नजरेने संपूर्ण महाराष्ट्र पहाणार आहे. त्याचा विचार महायुतीने केला आहे का? हा मतदार संघ स्पेशल आहे, त्याला सर्वसामान्य होऊ देऊ नका. तरच येथील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील. उमेदवार चुकीचा दिला तर ‘नोटा’चा वापर अधिक होईल. असे होणे ठाण्याला शोभणारे नाही. नेत्यांमधील वैचारिक गोंधळ मतदारांचा संभ्रम वाढवत आहे. हे कटू सत्य महायुतीचे नेते कधी स्वीकारणार आहेत?
जाता-जाता: ज्या कै. रामभाऊ म्हाळगी, कै. राम कापसे आणि कै. प्रकाश परांजपे यांची नावे आजही आदराने घेतली जातात. ते दिवंगत खासदार इच्छुक असते तर त्यांना उमेदवारी मिळाली असती का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर राजकरण्यांना ठाण्याचा पैस आणि मतदारांची मानसिकता कळलेली नाही असा निष्कर्ष काढावा लागेल.