आमरसावर ताव मारुन मतदार प्रचारसभा आटपून घरच्या रस्त्याला लागले. त्यांच्यात रंगलेल्या संभाषणाचा हा वृत्तांत.
पहिला – काही म्हणा, आंबा हापूस होता.
दुसरा – काहीही बोलता तुम्ही. अहो, रस पायरीच्या आंब्याचाच करतात.
तिसरा – तरी सांगत असतो. नका पाहू राजकीय चर्चासत्रे त्या वाहिन्यांवर. कशाचेही विश्लेषण करु लागलात तुम्ही. आपली ‘पायरी’ आधी ओळखा. धरता येईना हातात बॅट, राहुलला सल्ला अन् स्वतः जणु विराट!
पहिला – तुम्ही नेत्यांचे भाषण नीट ऐकलं ना?
दुसरा – खरं सांगू. जाम भूक लागली होती. त्यामुळे माझे लक्ष जेवणाच्या टेबलाकडे अधिक होते. नेत्याचे शब्द पोटात कोकळणारे कावळेच खात होते!
तिसरा – हेच, हेच. अहो, आपण काय जेवायला गेलो होतो का? नेत्यांचे चार शब्द ऐकले असते तर बिघडले असते का? दांभिक झाला असं म्हटलं तर मग रागावू नका. नेत्याच्या नावाने कशाला फोडता खडे, तेच गिरवू लागले दांभिकपणाचे तुमच्याकडून धडे!
पहिला – अहो तुम्हाला कृतघ्न म्हणायचे आहे का?
दुसरा – नाही म्हणायला भाषणातील काही शब्द माझ्या कानावर पडले. विमानतळ बांधणार आहेत म्हणे आपल्या भागात.
पहिला – त्याचा आपल्याला काय उपयोग?
तिसरा – करेक्ट बोलतात! उगाच त्या उड्डाणांमुळे आपली झोप उडणार. अलिकडे तर आभाळात पक्षांपेक्षा हेलिकॉप्टरच जास्त दिसू लागली आहेत.
दुसरा – हे बरं आहे तुम्हा टीकाकारांचे . म्हणजे एकीकडे विकास केला नाही म्हणून नेत्यांच्या नावाने ओरडायचे आणि दुसरीकडे चांगले विमानतळ बांधतात तर त्यावर टीका करायची. यालाच म्हणतात दुटप्पीपणा!
तिसरा – आपल्याला विमानांपेक्षा दर मिनिटांनी सुटणाऱ्या बसेस हव्या आहेत आणि उपनगरी रेल्वेत किमान डब्यात शिरण्याची सोय हवी आहे.
पहिला – मला की नाही ती इतिहासात शिकवलेली फ्रेंच राणी आठवली.
दुसरा – काय म्हणता? भारी लक्षात ठेवता तुम्ही? पण किस्सा काय होता ते तर सांगा?
पहिला – ती म्हणाली होती भुकेल्या प्रजेला उद्देशून की ब्रेड परवडत नसेल तर म्हणे केक खा!
तिसरा – केक नाही पण आंब्याचा रस तर मिळाला!
दुसरा – मी म्हणतो, आपल्या खासदारांना तसं काही काम नसतं. त्यामुळे त्यांची भाषणे ऐकून उपयोग तो काय?
पहिला – हे सारं चार वाट्या रस चोपल्यावर सुचतेय!
तिसरा – हो ना. लोकशाही नसती तर निवडणूक नसती, निवडणूक नसती तर उमेदवार नसता, उमेदवार नसता तर आंब्याचा रसही नसता….
दुसरा – (काही न बोलता पोटावरुन हात फिरवत ढेकर देतो.)
पहिला – अनुमोदन देण्याची काय रीत आहे.
तिसरा – अजून एक फायदा झाला. हे तुमच्या लक्षात आले का?
दुसरा – नाही बुवा? कोणता?
तिसरा – आपल्या सार्वजनिक संडासाला नवे दरवाजे बसवले आपल्या नगरसेवकाने!
पहिला – अरे खरंच की. माझे मत त्यालाच. आता निर्धास्तपणे मी….
दुसरा – काल नगरसेवकाचा माणूस आला होता. मी नळाच्या जोडणीसाठी अर्ज केला होता, दोन वर्षांपूर्वी. उद्या होणार आहे माझं काम.
तिसरा – हेही छान झालं. म्हणजे तुमचे मत उमेदवाराला नक्की झालं.
दुसरा – अगदी तसंच काही नाही. माझ्या घरावरची कौलं बदलायची आहेत. बघू या कोण करतं ते.
पहिला – हे काही चांगलं नाही. तुम्ही उमेदवाराला विनाकारण नडताय.
दुसरा – त्यात कसलं आलंय नडणं? आपल्या समोरच्या टॉवरमध्ये पेव्हर-ब्लॉक टाकणार आहे आपला नगरसेवक.
तिसरा – अशा सौदेबाजीमुळे लोकशाही बदनाम होत आहे. आपण मते विकली म्हणून बदनाम होत आहोत.
दुसरा – एक मिनिट. आपल्याला कोण ओळखतो, म्हणून बदनामीला आपण घाबरावं?
पहिला – अरे पण सर्वच शेण खाऊ लागले तर…..
दुसरा – तू नैतिकतेबद्दल बोलतोस का?
पहिला – मग मित्रा तू आंब्याचा रस होता म्हणूनच जेवायला आला होतास ना?
दुसरा – तसं नाही रे, पण…..
पहिला – माझं म्हणणं आहे, या नैतिकतेच्या, आचारसंहितेच्या, तत्वाच्या गोष्टी मी ताटात मिठा इतक्याही पडू दिल्या नाहीत. त्यामुळे खाल्लेल्या मीठाला जागण्याचा प्रश्नही येणार नाही!
तिसरा – यार मूड घालवू नका रे. स्वादिष्ट जेवणाची मजा घालवू नका.
पहिला – अरे नेते तरी कुठे शब्दाला जागतात? त्यामुळे आपल्यावरही त्यांनाच मत देण्याचे बंधन नाही. आंब्याच्या रसात मीठ नसते हे बरेच झाले. शब्दाला जागण्याचा प्रश्न येतोच कुठे?
तिसरा: यावरून छान सुचलंय- शब्दची रस आंब्याचा
शिल्लक राहे मागे कोय
नको भाव मनात अपराधी
विसरण्याची आहे सोय!!