तुम्हाला नगरसेवक व्हायचे आहे?

राजकारणातील आघाडी आणि युत्या यांची गरज, त्यांची उपयुक्तता आणि त्यांचे आयुष्य हे परिस्थितीनुरुप बदलत असते. भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्याला ’उदात्त‘पणाची झालर चढवली जात असते, परंतु जसा काळ सरकतो तशी या झालरीची लक्तरे होत असतात. ’उदात्त‘पणा गळून पडतो आणि युती-आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना ‘बोज‘ बनून जातात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची नेमकी या दिशेने वाटचाल सुरू असून लोकसभेतील यश विधानसभा निवडणुकीत जीर्ण होताच, या चादरीमुळे सत्तेची ऊब मिळणार नाही कारण प्रत्येकजण ही चादर आपल्या अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न करीत रहाणार!

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची ही ‘चादर‘ आता कामाची नाही आणि प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवणे कसे योग्य ठरेल असा दुजोरा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तसेही शिवसेना-भाजपा यांची राज्यात युती असली तरी महापालिका निवडणुक त्यांनी स्वतंत्रपणे लढवली होतीच. त्यामुळे महाविकास आघाडीची चादर भिरकावण्याचे खापर राऊत यांच्यावर फोडणे योग्य होणार नाही!

महाविकास आघाडीचा ‘गेमप्लान‘ स्पष्ट झाला असला तरी महायुतीमध्ये यापेक्षा वेगळे चित्र असण्याची शक्यता नाही. सेना-भाजपा यांना आपापल्या कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी महायुतीचा आग्रह धरणे परवडणारे नाही. स्वबळाची भाषा दबक्या आवाजात तिथेही सुरू असते आणि येत्या काही दिवसांत त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकेल. ती केली जाणे उभय पक्षांच्या हिताचे ठरेल. जर कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची इच्छा नसेल तर युती ‘लादणे‘ चुकीचे होईल. त्यामुळे एकमेकांविरुध्द काम करुन हानी पोहचू शकेल. बंडखोरी आणि पक्षांतरे यांचे पेव फुटू शकते. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे शक्ती अजमावून निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी समझोता करणे व्यावहारिक ठरु शकते.

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील या चलबिचलीचा फायदा अपक्ष उमेदवार घेऊ शकतात. तसे पाहिले गेले तर राजकारणाचे पाश निवडणुकीच्या उतरंडीवर टिकून रहाता कामा नये. विषय शहरातील पाण्याचा, रस्त्यांचा, स्वच्छतेचा, शिक्षणाचा वा आरोग्याचा हे राजकारणविरहीत असतात. सर्व पक्षांचा उद्देश लोकांच्या या प्राथमिक गरजा सोडण्याचा असतो. प्रश्न समान, उत्तर समान तर मग राजकीय विचार समानच असायला हवा, अशी राजकीय पोकळी उत्तम अपक्ष उमेदवारांना पुरक ठरु शकते. त्याचा लोकसंग्रह, त्याचा अभ्यास, त्याची जनमानसातील प्रतिमा, नेतृत्वगुण, अनुभव आणि ज्येष्ठता तसेच चारित्र्य या मुद्यांवर तो राजकीय ‘ताकद‘ असणाऱ्या उमेदवारालाही पराभूत करु शकतो. अशा इच्छुक नगरसेवकांनी राजकीय हालचालींकडे लक्ष ठेऊन स्वत:चे प्रभाव क्षेत्र वाढवत ठेवायला हवे. अशा दखल-पात्र उमेदवारांची राजकीय पक्षांनाही गरज असते. त्यांच्या ‘स्वच्छ‘ प्रतिमेचा मलिन झालेल्या राजकीय पक्षांना उपयोगच होऊ शकतो. त्यामुळे शहराचे भले करु इच्छिणाऱ्या इच्छूक नगरसेवकांनी आपली राजकीय (सुप्त) महत्वाकांक्षा अजिबात दाबून ठेवता कामा नये. मतदारांना शिंगे फुटलेले उमेदवार आवडत नसतात. त्यांना शिंगावर घेण्याची त्यांची तयारी आहे. गरज आहे ती नगरसेवक होण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांनी मुसंडी मारण्याची!