आमच्या वर्तमानपत्रांत अनेक वर्षांपासून राजकीय विश्लेषक म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरास काल तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्यात आले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार दणदणीत बहुमताने जिंकेल असे भाकित त्याने एकट्याने केले होते आणि ते खरेही ठरले होते. तरीही त्याच्या नोकरीवर संक्रांत कशी काय आली यावर कार्यालयात बरीच उलटसुलट चर्चा सुरु होती. आपल्या मालकाचे महाआघाडीच्या काही नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे ज्येष्ठ वार्ताहराने केलेले भाकित त्यांना रुचले नसावे म्हणून ही कारवाई झाली,अशी कुजबूज हळूहळू मोठ्या आवाजात सुरु झाली. काहींनी तर हा ज्येष्ठ पत्रकार महायुतीवाल्यांनी मॅनेज केला होता अशी पुडीही सोडून दिली! थोडक्यात तर्क-वितर्कांना उधाण आले होते आणि एका पत्रकाराची नोकरी मात्र नाहक गेली होती.
असे कसे झाले असावे म्हणून मी माझ्या या ज्येष्ठ सहकाऱ्याला भेटण्याचे ठरवले. त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा तो शांतपणे वृत्तवाहिनीवरील बातम्या पाहत होता. त्याच्यासमोर त्याचे आवडते ड्रिंक भरलेला प्याला होता. खायचे काही पदार्थही होते. मलाही त्याने ड्रिंक ऑफर केले. अर्थात मी सांत्वन करण्यासाठी गेलो होतो आणि त्या अजेंड्यात हा विषय कसा असू शकेल? या विचाराने मी त्याचतासमोरील सोडा तेवढा ग्लासातून ओतून घेतला.
मी – तुला असं तडकाफडकी कामाावरुन काढून टाकायला नको होते.
तो – अरे चूक माझीच होती.
मी – कशी काय? तुझे अंदाज तर बरोबर ठरले होते.
तो – ते ठीक आहे रे. पण राजकीय बातम्या म्हणजे केवळ आकडेवारी नसते. कोण काय बोलतो याचा अन्वयार्थही काढायचा असतो. बोलतानाचे हावभाव, चढ उतार, शब्दांची निवड वगैऱ्यांचा विचार करायचा असतो.
मी – त्यात तर तू तरबेज आहेस. एकनाथ शिंदे ४० जणांना घेऊन बाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूजही तूच दिली होतीस. संपादकांच्या आणि व्यवस्थापनाच्या गळ्यातला तू ताईत बनला होतास. आणि आता हे असे कसे झाले?
तो – मान्य. अगदी पहाटेचा शपथविधी होणार हेही मीच जगाला सांगितले होते.
मी – तेव्हा तुला आम्ही वेड्यात काढले होते.
तो – (हसत. पुढचा पेग भरत) पण या वेडेपणात मी शहाणपणाच्या गोष्टी शिकायला विसरलो.
मी – त्या कोणत्या?
तो – अरे नेत्यांच्या देह-बोलीचा अभ्यास. नेते काय बोलतात यापेक्षा कसे बोलतात याला महत्त्व असते. हे मी शिकायला विसरलो.
मी – मला नाही कळलं.
तो – सांगतो. प्रत्येक नेत्याची एक खास सवय असते. म्हणजे उदाहरणार्थ पक्षाशी एकनिष्ठ राहणार असे म्हणणारा नेता हे वाक्य बोलताना कपाळावरचा घाम पुसू लागला तर समजायचे की तो पक्ष हमखास सोडणार. एखादा नेता अचानक परदेशी वगैरे निघून गेला की समजायचे तो नाराज आहे. तो थंड हवेच्या ठिकाणी तेव्हाच जातो जेव्हा वातावरण त्याच्यासाठी गरम होते तेव्हा! विरोधी पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून रात्री त्याच्याबरोबर ‘ बसायचे ‘ नाही असा बाळबोध समाज करुन घेण्याची चूक मी केली. अरे, भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि प्रत्यक्षात तो करणारे सत्तेत भागीदार बनलेले मी पाहिले. या बातम्या देण्यात मी चुकलो. कारण माझा देहबोलीचा अभ्यास कमी पडला.
मी – अच्छा म्हणजे वागणे, बोलणे आणि प्रत्यक्ष कृती यांचा एकमेकांशी ताळमेळ आहे की नाही हे नेत्यांच्या देहबोलीवरून समजते तर.
तो – ऑफ कोर्स! नेता चष्मा अॅडजस्ट कसा करतो, दाढीवरून हात कसा फिरवतो, वृत्तवाहिनीवर बोलताना भुवया कशा उडवतो, आवाजाची चढ-उतार कशी करतो, अचानक
गायब कसा होतो, यावरुन त्याच्या पुढच्या राजकीय खेळीचे अंदाज बांधावे लागतात.
मी – त्यात तुला अडचण कशी येईल? या नेत्यांचे हावभाव तू वर्षानुवर्षे पाहत आला आहेसच की. त्यामुळे ते नेमके काय बोलणार, बंडखोरी करणार की बर्गेनिंग करणार,भ्रष्टाचाराचे आरोप करता-करता अचानक गप्पगार का होणार, आदींबाबतचे तुझे आकलन नेहमीच बरोबर येत आले आहे.
तो – हो ना रे. पण आम्ही जसे शिकत होतो ही देहबोलीची भाषा तेव्हा नेतेही शिकत होते आमची दिशाभूल करण्याची परीभाषा!
मी – काय म्हणतोस? म्हणजे तुमच्यावर वरचढ होण्याचाच जणु प्रकार!
तो – एक्झॅक्टली! त्यामुळेच तर मला अखेर नोकरी गमवावी लागली.
मी – नेमकं काय झालं सांगशील का?
तो – (बाटली ग्लासमध्ये रिती करता-करता) अरे शिंदे साहेबांनी दाढीवरून हात फिरवला तेव्हाच ते शपथ घेणार हे माझ्या लक्षात यायला हवे होते. पण मी त्यांचे मेडिकल रिपोर्ट वाचत बसलो. गल्लत झाली आणि त्यामुळे आपली बातमी तर हुकलीच, पण माझी नोकरीही गेली. मी उगाच तळ्यात-मळ्यात खेळत बसलो.
मी – अरे बापरे. इतकं सुक्ष्म निरीक्षण करावं लागतं नाही?
तो – अर्थात मीही आता देहबोलीची भाषा समजू लागलो आहे. काल फडणवीस यांचे कोणी कसे अभिनंदन केले आणि फडणवीस यांनी कोणाचा हात किती वेळ धरून ठेवला या सर्व बाबी मी नोंदवल्या आहेत.
मी – त्यामुळे काय होईल?
तो – मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार ही यादी मी आताच संपादकांना मेल केली आहे. ती खरी ठरली तर मला माझी गेलेली नोकरी परत मिळेल.
जाता-जाता : गुलाबी रंगास राजकारणात इतके अवाजवी महत्त्व आले आहे की थंडी गुलाबी असते, हेच सारे विसरुन गेले आहेत! मी कपाटातून माझं मोरपिशी जॅकेट काढलं आहे. नशीब आपले, तुर्तास तरी या रंगावर कोणत्याही राजकीय पक्षाने हक्क सांगितलेला नाही! त्यामुळे या स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून मी सर्वपक्षीय थंडी एन्जॉय करणार आहे!!