पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या दु:खद निधनावरुन पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्र टीकेचे लक्ष्य बनले असून खाजगी रुग्णालयांच्या कथित धंदेवाईक मानसिकतेवर समाज तुटून पडला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसुतीनंतर या रुग्णालयाने पैशांचे कारण पुढे करुन उपचार दिले नाहीत असा आरोप आहे आणि त्यावरून वातावरण ढवळून निघाले आहे. रुग्णालयांची मोडतोड आणि डॉक्टरांवरील हल्ले हे भारतात नवीन राहिलेले नाहीत. त्याबद्दल लोकसभेत चर्चा होऊन डॉक्टरांना संरक्षण देणारे विधेयकही पारीत झाले होते. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे डॉक्टर समुदायाचे म्हणणे असून अत्यंत असुरक्षित वातावरणात ते सेवा देत असतात, असे त्यांच्या संघटनांचे सातत्याने म्हणणे असते. अर्थात एखादा रुग्ण दगावला की डॉक्टरांना अपेक्षित सहानुभूती कापरासारखी उडून जाते. रुग्णाचा मृत्यू होणे कधीच समर्थनीय नाही, आणि ते थांबवण्यासाठी जी व्यवस्था (उपचाराच्या किमतीमधील तफावत, मेडीक्लेमसारख्या योजनांमधील अनियमितता वगैरे) आहे ती सुधारण्याची गरज आहे. रुग्णालयांकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा कशी मिळवता येईल त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ जशी आली आहे, तशी रुग्णांच्या नातेवाईकांनी संयम बाळगून रुग्णहिताच्या दृष्टीने पुरक वातावरण कसे तसार करावे याबद्दलही जनजागृती होण्याची गरज आहे. डॉक्टर-रुग्ण संबंध परस्पर विश्वासावर आधारलेले असतात आणि त्यात उभयपक्षी पारदर्शकता निर्माण होण्यासाठी सुसंवादाची गरज असते. हा सुसंवाद दुर्दैवी प्रसंग घडताच काचेसारखा खळ्ळकन फुटून जातो. कायद्याच्या बाबतीत जसे म्हटले जाते की शंभर अपराधी सुटले तरी बेहत्तर, परंतु एक निष्पाप फासावर लटकू नये. त्यासाठी आपण अगदी कसाबसारख्या गुन्हेगाराला फाशी देण्यापूर्वी कायद्यातील सर्व तरतुदींचा फायदा दिला. डॉक्टरांच्या बाबतीत ही सहानुभूती खचितच दाखवली जात नसते कारण या ठिकाणी केवळ जीव गेलेला नसतो, तर पारदर्शकता, मानवतावादी दृष्टीकोन आणि व्यावसायिकतेच्या निकषांमध्ये सेवाभाव यांचा अभाव दिसतो. आम्हाला रुग्ण मरावा असे वाटत नसते किंवा आम्ही सर्व प्रयत्न केले हे युक्तीवाद गदारोळ उठताच क्षीण ठरू लागतात.
खाजगी रुग्णालयांवर हल्ले होण्याचे प्रमाण निश्चितच वाढले आहे. असे दुर्दैवी प्रकार सरकारी रुग्णालयांतही होतात. सुमारे वर्षापूर्वी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात लहान बालकांचे सलग मृत्यू झाले होते. एका गरोदर महिलेचा दारातच मृत्यू झाला होता. त्यावेळी असंतोष निर्माण झाला होता. नातेवाईकांचा हा आक्रोश काही काळानंतर मिटला. परंतु असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची हमी कोणी देऊ शकेल काय? याचे उत्तर नकारात्मक आहे. कारण सरकारी रुग्णालये म्हणजे अनागोंदी, अस्वच्छता, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता तुटवडा वगैरे असे समीकरण बनून गेले आहे. सहाजिकच खाजगी रुग्णालयांकडे ओढा वाढू लागला आहे. परवडत नसताना या रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो आणि मग आधीच मनात असलेल्या रागाला रुग्णसेवेत हलगर्जीपणा झाला की भडका उडतो!
सरकारी रुग्णालयांची ही प्रतिमा सुधारण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल विश्वास वाटावा असे काम आणि वातावरण दिसायला हवे. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर खाजगी डॉक्टरांपेक्षा नेत्रदीपक कामगिरी बजावत असतात. ताजेच उदाहरण द्यायचे तर ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ज्येष्ठ नागरीकाच्या जिभेवरील अत्यंत कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली (ठाणेवैभव-4 एप्रिल). याच रुग्णालयातील आणखी एक बातमी-(ठाणेवैभव 2 एप्रिल) रक्तातील प्लास्मा, प्लेटलेट आदी घटकांचे वर्गीकरण करणारे यंत्र सेवेत असल्याची बातमी. अशा बातम्या ज्यात सरकारी डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या अत्यंत अवघड शस्त्रक्रियांचा समावेश असतो. सरकारने या डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. रुग्णालयातील सेवा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एक प्रकारे ‘ब्रॅण्डिंग‘ किंवा प्रतिमा संवर्धनाचे प्रयत्न करायला हवेत, वैद्यकीय योजनांच्या घोषणांबरोबर यशोगाथांना प्रसिद्धी द्यायला हवी. खाजगी रुग्णालयांमध्ये नाईलाजाने (अनेक विमा योजनेच्या सवलतीमुळे आणि काहीवेळा तर प्रतिष्ठा म्हणून) जाणाऱ्या नागरीकांना सक्षम पर्याय उपलब्ध होण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रतिथयश खाजगी रुग्णालयाचा एक कर्मचारी भेटला, तेव्हा त्याने त्यांचे हजार खाटांचे रुग्णालय कमी पडू लागल्याचे सांगितले! या कंपनीची गेल्या पाच वर्षात चार रुग्णालये स्थापन झाली आणि असे म्हणू नये परंतु ती ‘धो-धो‘ सुरू आहेत. सरकारी रुग्णालयांना आपल्या क्षमता वाढवण्याची किती मोठी संधी आहे, हे यावरुन दिसते.
सरकारी रुग्णालये असोत की शाळा, सरकारी सार्वजनिक वाहतूक असो की अन्य उपक्रम, यांचा कारभार सुधारला तर खाजगी क्षेत्रालाही दर्जाबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही आस्थापनेस मक्तेदारी झाल्याचे वाटू लागले की पहिला बळी जातो तो कार्यक्षमतेचा, दुसरा पारदर्शकतेचा आणि तिसरा उत्तरदायित्वाचा. यांपैकी दीनानाथमध्ये नेमके काय झाले हे शोधावे लागेल. पण असे प्रकार थांबवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने आणि या क्षेत्राकडे पहाणाऱ्या समाजाच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल होणे काळाजी गरज आहे.