’वेव्हज्’ ठीक, ‌’वेव्हलेंग्थ‌’चे काय ?

एकीकडे देशावर संभाव्य युद्धाचे ढग जमा होत असताना चर्चाविश्वाचा केंद्रबिंदू हा पाकिस्तान आणि त्यांनी पोसलेले अतिरेकी हाच असायला हवा. देशासमोर असंख्य आव्हाने आहेत, पण या क्षणी देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींचा नि:पात करण्यालाच प्राधान्य द्यायला हवे. नाही म्हणायला पडद्यामागे ज्या घडामोडी सुरु आहेत त्यापैकी अत्यंत अल्पस्वरुपात माध्यमांच्या कृपेने जनतेपर्यंत पोहोचत आहे. माध्यमांनी पाकिस्तानविरुद्धचे युद्ध हे भारत-पाक क्रिकेट सामन्याइतके रंजक करण्याचा उथळपणा सुरु ठेवला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माध्यमांनी उतावळेपणा सोडून संयम दाखवण्याची गरज आहे. भारतीय जनता अशा संवेदनशील घटनांकडे कशी पहाते, त्यांची मानसिकता नेमकी काय आहे आणि तिच्यावर कोणकोणत्या बाबी प्रभाव टाकतात याचा विचार होणे तितकेच अगत्याचे ठरेल.

भारतीयांची मानसिकता आणि जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पहात आहे याचे उत्तम प्रतिबिंब आपल्या साहित्य-कला-संस्कृतीच्या आघाडीवरील कामगिरी ठरवत असते. थेट युद्धाशी संबंध लावता येणार नाही, परंतु युद्ध पुकारले गेलेच तर नागरिक म्हणून आपण ते कसे निभावतो हेही महत्वाचे ठरते. त्यासाठी नागरीकांचे वैचारिक पालनपोषण कसे होते हे पहाणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी नागरिकांचे वैचारिक पालनपोषण कसे होते हे पहाणे महत्त्वाचे ठरते. त्यादृष्टीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावलेल्या ‌’वेव्हज्’ (वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट) या भव्य परिषदेचा विचार करावा लागेल. मनोरंजन उद्योगाचा विस्तार, त्यातून होणारी उलाढाल, रोजगारनिर्मिती वगैरे विषयांपुरते या जागतिक स्वापाच्या परिषदेकडे पहाता येणार नाही. त्यात देशाच्या संस्कृतीसमोर उभी राहिलेली आव्हाने, समाजकारणावर पडलेली राजकारणाची गडद छाया, धर्मनिरपेक्षतेला लागलेले ग्रहण, जातनिहाय संकुचितपणा, देश म्हणून उदात्त विचारसरणीला लागलेली घरघर आदी गोष्टी साहित्य आणि कला क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीमुळे होत आहे. सर्जनशीलता, देशाची प्रतिमा, ऐक्य, सामाजिक शांतता, संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार यावर या परिषदेत गंभीर चर्चा झाली, हे विशेष. करमणुकीचा स्थर हा विकृतीकडे चालला असेल तर देशाला अतिरेक्यांपेक्षा असे विषारी साहित्य आणि ‌’कंटेन्ट‌’ निर्माण करणाऱ्यांपासून धोका आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देश म्हणून उदात्त विचारास तिलांजली देणे असमर्थनीय ठरते. वेव्हज् कार्यक्रमात पंतप्रधानांपासून अन्य तज्ज्ञांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली.

डिजिटलायझेशनच्या आगमनानंतर दृकश्राव्य माध्यमांची भरभराट झाली. नाटक-चित्रपट या पारंपारिक माध्यमांबरोबर छोटा पडदा आणि त्यावरुन प्रसारित होणारे ‌’ओटीटी‌’ चॅनल्स यांनी भारतीयांचे मनोरंजन विश्व व्यापून टाकले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे परदेशातील करमणुकीचा आस्वाद आपण घरबसल्या घेत असतो. त्यामुळे एकाच वेळी भारतीय मानसिकतेवर देशी आणि परदेशी वाहिन्यांचा प्रभाव पडत असतो. ‌’वेव्हज‌’च्या विश्वव्यापी संचाराचा आणि समाजाच्या मनोव्यापाराचा थेट एकमेकांशी संबंध असतो. जगभरातील हजारो संस्कृतींची सरमिसळ करमणुकीच्या प्रांतात अहोरात्र सुरु असताना भारतासारख्या देशाने आपले सत्व कसे सांभाळायचे यावरही विचारमंथन यानिमित्ताने होत आहे. मनोरंजन उद्योग म्हणजे निव्वळ अर्थकारण नाही तर समाजकारणात होणाऱ्या सुक्ष्म आणि उघड बदलांचा धांडोळा घेणे आहे. आपण नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी कसे सक्षम होऊ, माणूस म्हणून आपली उपयुक्तता कशी सिद्ध करु आणि हिंसाचार, अनैतिकता, स्पर्धा वगैरेंना निरोगी व्यवस्थेचे कोंदण कसे प्राप्त करुन देऊ हा विचार अशा परिषदांतून पुढे जायला हवा. अर्थात त्यासाठी ‘हे विश्वची माझे घर’ ही उदात्त संकल्पना प्रत्येकाला आपल्या मनात कोरावी लागेल. जागतिकीकरणाचे फायदे सर्वदूर आणि सर्वस्पर्शी न होण्याचे कारण माणसांची ‌’वेव्हलेंग्थ जुळलेली नाही. ‌’वेव्हज‌’च्या निमित्ताने निदान भारतीय तरी एका ‌’वेव्हलेंग्थ‌’ने जोडले जावेत ही अपेक्षा आहे.