पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यापैकी जिल्ह्याच्या राजकारणात कोण वरचढ ठरणार अशी चर्चा सध्या सुरु झाली. शिवसेना आणि भाजपा यांची युती असल्यामुळे खरे तर हा वाद चार भिंतींच्या बाहेर येणे राजकीयदृष्टया योग्य नव्हते. युती धर्माला छेद देणारी होती. त्यामुळे उभय पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आणि त्याचे दूरगामी परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत दिसले तर आश्चर्य वाटू नये. प्रत्येक नेत्यास आपल्या जिल्ह्यात एकच सत्ता-केंद्र असावे असे वाटत असते आणि तेही आपल्याकडे रहावे ही त्यांची इच्छा असते. एका म्यानात दोन तलवारी रहात नसतात, तसाच काहीसा हा प्रकार. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आपल्याकडे आणि पर्यायाने आपल्याच पक्षाकडे रहावीत ही नाईक-शिंदे यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. गोची अशी आहे की ते युतीत सामील असल्यामुळे त्यांना आपापली व्यक्तीमत्वे युती धर्मामुळे स्वतंत्र दाखवण्यावर निर्बंध ठेवणे अपरिहार्य होते. हे पथ्य त्यानी झिडकारले आहे. अशावेळी भाजपा काय भूमिका घेते हे पहावे लागेल आणि शिवसेनेची भूमिका घेणारे शिंदे हेच या वादाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता असणार आहे.
मुळात हे दोन्ही नेते पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे. दोघांवर संस्कार एकच असले तरी कार्यपद्धती भिन्न. त्यांच्या महत्वाकांक्षेचा आलेखही वेगळा. म्हणजे 1990 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेले श्री. नाईक यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पुढे 2019 साली ते अखेर भाजपात डेरेदाखल झाले. एका प्रादेशिक पक्षापासून सुरु झालेला प्रवास राष्ट्रीय पक्षात व्हाया निमराष्ट्रीय पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) व्हायला तीन दशके लागली. या उलट श्री. शिंदे यांनी जून 2022 मध्ये राजकीय भूकंप घडवताना थेट भाजपाच्या छावणीत प्रवेश करण्याऐवजी स्वत:ची स्वतंत्र चूल निर्माण केली. भाजपात न जाण्याचा निर्णय त्यांच्यादृष्टीने शहणपणाचा होता. कारण त्यांचे अस्तित्वही अबाधित राहिले होते आणि बार्गेनिंग पॉवरही वाढली होती. त्यांचा हा निर्णय मान्य करण्याखेरीज भाजपाकडे पर्यायही नव्हता. पण आता संधी मिळताच त्यानी शिंदे याना बाजूला केले. श्री. शिंदे यांच्याबद्दल भाजपा नेतृत्वाच्या मनात श्री. नाईक यांच्यापोटी जितकी सहानुभूती आणि ममत्व आहे तितके श्री. शिंदे यांच्याबद्दल कसे असेल? श्री. नाईक यांना पालघरचे पालकमंत्रीपद देऊन या वादावर पडदा पाडल्याचा आभास झाला, पण तसे प्रत्यक्षात असणार नव्हते हे आता स्पष्ट झाले आहे. श्री. शिंदे यांना टक्कर देण्यासाठी श्री. नाईक यांना भाजपाकडून रसद पुरविली जात असेल तर ती युतीमध्ये होऊ घातलेली संघर्षाची नांदी म्हणावी लागेल.
श्री. नाईक यांचे वयोमान पाऊणशेच्या घरात आहे , तर श्री. शिंदे साठीच्या उंबरठ्यावर. म्हणजे वयाचा विचार केला तर नाईक ज्येष्ठ ठरतात. दुसरे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शिवसेना बांधणाऱ्यांमध्ये सतीश प्रधान आणि साबिर शेख यांच्यानंतर आनंद दिघे आणि गणेश नाईक अशी नावे घेतली जातात. या चार नेत्यांच्या कर्तृत्वाला साजेसे काम श्री.शिंदे यांनी कमी वेळात करुन दाखवले ही बाब अलाहिदा. मुख्यमंत्रीपद पटकावून तर त्यांनी नाईकांचा ज्येष्ठतेचा दावा त्यानी खालसा केला. असे असले तरी भाजपा नेतृत्व मात्र नाईकांना झुकते माप देणार असे वाटू लागले आहे. त्यामुळेच की काय पालकमंत्री पदावरुन सुरु झालेल्या वादात ते उतरलेले नाहीत! या वादापासून ते अलिप्त राहत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. श्री. शिंदे यांनी ठाणे तसेच कल्याण-डोंबिवलीत संघटनात्मक बांधणी केली तसा श्री. नाईक यांनी नवी मुंबईत निर्विवाद ठसा उमटवला. या दोन नेत्यांमध्ये आणखी एक साम्य म्हणजे राज्यातील राजकारणात सक्रीय रहाताना दोघांनी आपापल्या चिरंजीवांमार्फत दिल्लीतही स्थान निर्माण केले. लोकसभा निवडणुकीतही श्री. संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली असती तर नाईक-शिंदे यांचे पारडे समसमात झाले असते. तुर्तास खासदारकी शिवसेनेने घेतली आणि श्री. शिंदे यांना मुख्यमंत्रीपदही मिळाले. यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. अशावेळी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व निर्णायक असे वजन कोणाच्या पारड्यात टाकणार हे पहावे लागेल. एक मात्र नक्की की प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाकांक्षेची आग भडकवत ठेवण्याची नीती भाजपा करीत रहाणार. सध्या ही आग नाईकांमध्ये त्यांना ‘रेडीमेड’ मिळाली आहे. अनेक वर्षे विजनवासात राहिलेल्या नाईकांची अवस्था घायाळ झालेल्या वाघासारखी झाली आहे. त्यांच्या पदरात असलेले अन्यायाचे निखारे आता भडकले असतील तर आश्चर्य नाही. शिंदे यांनी भाजपात यावे यासाठी तर ही व्यूहरचना नसावी? अशी शंकाही येऊ लागली आहे.थोडक्यात पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. त्यामागे जिल्ह्यातील राजकारणाचा ‘रोड-मॅप’ आहे. तो आराखडा नेमका काय, हे तपासावे लागेल! आम्हाला तर पालकमंत्रीपदाच्या चर्चेत एक ‘ट्रॅप’ दिसत आहे. श्री. शिंदे यांच्या तथाकथित चाणक्यांना तो दिसला कसा नाही! अशा वेळी राजकारणाचा फ़ास्ट फॉरवर्ड चित्रपट थोडा पॉज करून पुन्हा प्ले चे बटन दाबण्यात शहाणपण आहे.