आर्यन खान प्रकरणी एकट्या शाहरुख खानचा का दोष द्या? गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्यनच्याच वयाची किंबहुना त्याहीपेक्षा लहान मुले आणि मुली आपल्या ठाणे शहरात अशोभनीय प्रेमाच्या रासलीला उघडपणे करताना दिसत आहेत. परवा तर बारा-चौदा वर्षांची मिसरूडही न फुटलेली पोट्टी धूम्रपान करताना आम्ही पाहिली तेव्हा घरोघरी शाहरुख खान असल्याचे जाणवले.शाहरुख तर बापडा रात्रीचा दिवस करून चित्रीकरणात तर जाहिरातींचे मॉडेलिंग करण्यात गर्क होता, त्यामुळे आर्यन कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, तो करतो काय, अशा फिजुल गोष्टींकडे त्याला वेळ कसा बरे मिळणार? देवाने त्याची मन्नत पूर्ण केली असली तरी त्याचे मेंटेनन्स करण्याची जबाबदारी शाहरूखच्या खांद्यावर होती ना? तो ती कठोर परिश्रम करून पूर्णही करीत होता. अशावेळी आर्यनचे प्रताप त्याला कसे कळणार? जे कोट्यवधी रुपये कमावले होते ते न्यायालयीन कामात खर्ची पडले. हिशेब मांडला तर हाती शुन्य पडले. लाखमोलाची इभ्रत गेली ती गेलीच! पण कोटींच्या व्यवहारात लाख किस झाडकी पत्री? असो. पंचवीस दिवसांनी का होईना आर्यन घरी परतला आणि शाहरुखच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावरून हे कुटुंब तुमच्या-आमच्या सारखेच किती संवेदनशील आणि भावनात्मक आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे उठसुठ त्यांच्या दोषांवर बोट ठेवणे उचित नाही. त्यामुळे असंख्य पालक आपल्या चुकांवर शिताफीने पांघरूण घालत आहेत.शाहरुखला दोष देणारा समाज दांभिक आहे,असे म्हटले तर वावगे ठरू नये.
विषय चित्रपट अभिनेत्याशी निगडीत आहे,म्हणुन फ्लॅशबॅक सारखा विचार करा. असा प्रकार वीस- पंचवीस वर्षांपूर्वी झाला असता तर त्या वेळचा बाप असा रडलाबीडला नसता त्याने मुळात आपलं कार्ट असे उपद्व्याप करणार नाही हे पाहिलं असतं आणि केलेच असते तर त्याचे कान उपटण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. पालकांचा हा दरारा आता राहिलेला नाही हे वास्तव कोपऱ्या- कोपऱ्यात शाळकरी मुलांची तसेच तरुणाईचे चाळे पाहून म्हणता येईल. माझ्यासमोर बिनदिक्कतपणे सिगरेट फुकणारा अवघ्या बारा- तेरा वर्षांचा मुलगा आणि त्याच्याच वयाची त्याची मैत्रीण हे भले मन्नतमध्ये राहत नसले तरी त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली त्या लोकप्रिय कुटुंबासारखीच झालेली दिसते. मुलींच्या पेहरावाबद्दल न बोललेलेच बरे. कारण तसा आक्षेप घेणे प्रसंगी प्रतिगामीपणाचे लक्षण मानले जाते. परंतु आपली मुलं-बाळं घरातून बाहेर पडल्यापासून घरात येईपर्यंत कुठे असतात, काय करतात वगैरे तपशील पालक का जमवत नाहीत, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. खरे म्हटले तर या प्रश्नातच आजच्या समाजाच्या -हासाचे मूळ सापडते. शाहरुख खान वर टीका करणाऱ्या सुजाण पालकांनी आपलं बाळ काय करते याची चौकशी कधी केली असेल तर शाहरुख वर विनाकारण ते शिंतोडे उडवत बसणार नाहीत. आजची तरुण पिढी बिघडत चालली असेल तर त्याला अनेक कारणे जबाबदार आहेत. समाज माध्यमांवर त्याचे खापर फोडून मोकळे होतात. जबाबदारी झटकण्याचा हा राजमार्ग खड्डयात घेऊन जाणारा आहे.
परंतु ही सर्व आधुनिक माध्यमे पालकांपेक्षा आणि कुटुंबव्यवस्थेतील संस्कारांपेक्षा कधी मोठी झाली? ती मोठे होण्यासारखी परिस्थिती कोणी निर्माण केली? परिस्थिती बिघडत असताना वेळीच हस्तक्षेप करायला पालकांचे हात कोणी बांधले होते काय? परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊन द्यायची आणि मग कधी चित्रपटांच्या तर कधी समाज माध्यमातील अनैतिकतेच्या नावाने बोटे मोडीत बसायचे. त्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. वेळीच मुलांना रोखले नाही तर फाजिल स्वातंत्र्याची सवय झालेल्या मुलांमध्ये बंडखोरी तयार होत जाईल आणि ते कुणाच्या बापाचे ऐकेनासे होतील. आर्यन खान प्रकरणानंतर समस्त पालकवर्गाला एक धडा नक्की मिळाला आहे. आपल्या मुलांवर लक्ष ठेवा कारण तुमच्याकडे ना पैसा आहे की वकिलांची फौज. तुमचे पोर तुरुंगात अनिश्चित काळापर्यंत खितपत पडू शकते. या प्रकरणाची हीच भीषणता आहे. आपली पोरं हाताबाहेर जाण्यापूर्वी वेळीच सांभाळा. कोर्टाच्या आणि तुरुंगाच्या चक्रा मारण्याऐवजी आपले कुलदीपक वा कुलदिपीका दिवसभर कुठे हुंदडत असते याकडे अजूनमधून थोडं लक्ष दिलं तरी अनर्थ टळेल.