ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र

प्रशिक्षणासाठी १५ फेब्रुवारीला निवड चाचणी

ठाणे: खेलो इंडिया योजनेतून निर्माण होणाऱ्या खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल सांळुके यांनी सांगितले. या प्रशिक्षण केंद्रासाठी १२ वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड केली जाणार असून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्याचे आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये १००० खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रासाठी १२ वर्षांच्या आतील प्रत्येकी १५ मुला-मुलींची निवड केली जाणार आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्हा सत्रात हे प्रशिक्षण देण्यात येईल.

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता दादोजी कोंडदेव स्टेडिअममधील बॅडमिंटन हॉल याठिकाणी मुला-मुलींची निवड चाचणी होईल. त्यासाठी भारतीय खेळ प्राधिकरणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवंत शोध प्रक्रिया मानांकनाचा वापर केला जाणार आहे.

या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी १२ वर्षांच्या आतील मुला-मुलींचा जन्म १ डिसेंबर २०१० रोजीचा किंवा त्यानंतरचा असावा. आधार कार्ड, जन्म दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी क्रीडा प्रशिक्षक झुबेर शेख (मो.क्र.९५११८२७२७९) व रोहन साळवी (मो.क्र. ८३६९७३१२२१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.