कुणाची वाट न बघता स्वतःपासूनच वृक्षारोपण करा-सयाजी शिंदे

नवी मुंबई: जगात पहिल्यांदा झाड आले, मग माणसे आली. माणसांनंतरही झाडेच राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडे लावावीत आणि दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःपासूनच सुरुवात करावी अशा शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते व पर्यावरण स्नेही सयाजी शिंदे यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक, ऐरोली येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या ‘जागर 2026’ या व्याख्यानमालेतील सहावे व्याख्यानपुष्प गुंफताना सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ या उपक्रमाच्या प्रवासाचा व आपल्या अभिनय कारकीर्दीचा आलेख प्रेक्षकांशी संवाद साधत मांडला.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त जाहीर केलेल्या ‘सामाजिक समता सप्ताह’ कालावधीत ही ‘जागर’ व्याख्यानमाला होत आहे. या व्याख्यानाप्रसंगी महापौर सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सयाजी शिंदे यांचे स्वागत केले.
आपल्या लहानपणी जी झाडे होती ती कुठे गेली हे मागे वळून पाहताना जाणवले, त्यामुळे निसर्गावर झालेला प्रतिकूल परिणाम अनुभवला आणि मग झाडे लावायची ठरविली असे सांगत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्याला आईने जन्म दिल्यानंतर ऑक्सिजन लागतो, तो झाड देते. झाड अन्न देते, सावली देते, खूप काही देतच राहते. त्यामुळे ‘झाडाचे गुण गाऊ – झाडाचे गुण घेऊ’ ही भूमिका जपत ‘सह्याद्री देवराई’ हा उपक्रम हाती घेतला असे ते म्हणाले.
या देवराईमध्ये सर्व प्रकारच्या वृक्ष,वेली, वनस्पतींच्या प्रजाती हव्यात. पशुपक्ष्यांना जपणारी देशी झाडे हवीत. अशा 100 देवराया उभ्या कराव्यात व त्यात एक हजार प्रजाती हव्यात हे स्वप्न असल्याचे सांगत, ते पूर्ण करण्यासाठी  सर्वांची सोबत मिळेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लहान वयापासूनच मुलांमध्ये वृक्ष प्रेम रुजवण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत ‘चला सावली पेरूया’ हा अभिनव उपक्रम त्यांनी सांगितला. यामध्ये विद्यार्थ्याने एखाद्या वृक्षाचे बी घेऊन ते पेरायचे, त्याचे रोप तयार करायचे, त्याच्या वाढीची आपल्या वहीत नोंद करायची, यामुळे आपोआपच त्या झाडाशी त्याचे नाते तयार होईल असे ते म्हणाले. याशिवाय एक झाड लावून वाढदिवस साजरा करायचा, प्रत्येक वर्षी निकाल लागल्यानंतर एक झाड लावायचे, झाडांचेही वाढदिवस साजरे करायचे असे अनेक उपक्रम त्यांनी सांगितले. शाळेबाहेर बियांचे प्रदर्शन लावण्याचेही आवाहन त्यांनी केले.
वृक्षारोपण करताना आधी पाण्याची सोय असेल. खत, संरक्षण असेल याची खात्री करा आणि मगच झाडे लावा असा संदेश त्यांनी दिला. वृक्षप्रेमातून बियांचे गाणे, नदीचं गाणे लिहिले असे सांगताना झाडापासून माणसाची प्रगती झाली, मात्र शहरांची निर्मितीच झाडे तोडून झाली आहे. आपल्याला चुलीवरचे जेवण लागते, जाळायला-पाळण्याला झाडे लागतात, पण आपण झाडे लावायला मात्र पुढे येत नाही हा विरोधाभास त्यांनी सांगितला. देवळात वृक्षप्रसाद दिला जावा, ‘सेलिब्रिटी झाडे’ जाहीर करून त्यांच्या सहली घडवून आणाव्यात, अशा अभिनव संकल्पनाही त्यांनी मांडल्या.