प्लास्टिक बंदीच्या नावाखाली खंडणीचा खेळ

दोन महिला कर्मचारी बडतर्फ
कल्याण: शहरात प्लास्टिक बंदी कारवाईच्या नावाखाली कथित खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटावर काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी कारवाईपासून वाचवण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल होताच महापालिकेने कारवाई करत दोघींनाही तत्काळ कामावरून काढून टाकण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील हनुमान नगरमध्ये असलेल्या ‘ख्रिस बार ॲण्ड रेस्टॉरंट’वर प्लास्टिक विरोधी पथकाने छापा टाकला होता. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये प्लास्टिक आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. यावर हॉटेल व्यवस्थापनाने स्वतःला ‘ग्रीन प्लॅस्टिक’ वापरणारा असल्याचे सांगून दिलासा देण्याची विनंती केली. यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना कारवाईपासून वाचवण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. मोठ्या बार्गेनिंगनंतर हॉटेल व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यामार्फत दोन हजार रुपये दिले, त्यानंतर टीम तेथून निघून गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संभाषणाचा ऑडिओही समोर आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी तातडीने कारवाई करत दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश जारी केले. तसेच संबंधित हॉटेलवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्लास्टिक बंदीच्या नावाखाली आतापर्यंत अशा प्रकारे किती व्यापाऱ्यांची उधळपट्टी झाली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे केडीएमसीच्या प्लास्टिकविरोधी मोहिमेच्या पारदर्शकतेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.