एसटी चालकांभोवती आवळला दंडाचा फास

ठाणे विभागातील चालकांवर ६१ लाखांचा दंड
ठाणे: एसटीच्या जुन्या बसचे स्पीडो मीटर बंदवस्थेत असून एसटी महामंडळ कार्यशाळेच्या चुकांमुळे बस चालकांच्या माथी आरटीओकडून लाखोंचा दंड मारण्यात येत आहे. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेल्या चालकांनी अखेर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेतली आहे.
ठाणे एसटी विभागाला सर्वात जास्त आर्थिक नफा मिळवून देणारे स्वारगेट, पुणे स्टेशन, सातारा, कोल्हापूर, सांगली, बारामती आदी ठिकाणे आहेत. येथे ये जा करण्यासाठी एसटी महाडळाच्या बसला यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गाचा (एक्सप्रेस वे) वापर करावा लागतो. मात्र या महामार्गावर आरटीओकडून स्पीड गन कॅमेऱ्यांमार्फत एसटी चालकांना लाखो रुपयांचे दंड पाठविले जात आहेत. जुन्या बसचे स्पीडो मीटर बंदवस्थेत एसटी महामंडळ कार्यशाळेच्या चुकांमुळे बसवर दंड पडत असूनही तो एसटी महामंडळाने भरण्या ऐवजी चालकाच्या पगारातून कपात केला जात आहे. बसमध्ये ८०वर स्पीड लॉक लावणे गरजेचे असतानाही त्यातील बिघाडामुळे बस ओव्हर स्पीड होत आहेत. या त्रासाबद्दल अधिकारी, परिवहन मंत्री आणि मुखमंत्र्यांकडे समस्या मांडून न्याय मिळत नाही, म्हणून आता थेट नितीन गडकरी यांच्याकडे आमच्या समस्या पाठवल्या आहेत असे चालकांनी सांगितले.
वाडा आगारातील एका चालकाने सहा लाखांचा दंड बसल्याचे सांगून माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तुटपुंज्या पगारातून घर चालवणे शक्य नसताना एसटी महामंडळ आमच्या पगारातून जबरी वसुली करत आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? असा प्रश्न खोपट आगारातील एका चालकाने उपस्थित केला आहे.
वाडा आगारा तील २१ चालकांना सुमारे २० लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. खोपट आगारातील २० चालकांना ३० लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. २०२४मध्ये ठाणे विभागातील चालकांना 60 लाख 99,765 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जुन्या गाड्यांचे सगळे स्पीड मीटर बंद आहेत. मग उतारावर बस ४० ऐवजी ४५वर गेली तर चालकाला कसे कळणार? आर.टी.ओ. नियमानुसार गाडीचा स्पीड लॉक ८०वर असतो,  मग गाडी ८०च्या पुढे कशी जाते? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.