आवक घटल्याने अननस वधारले

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी फळ बाजारात अननसाची आवक घटल्याने अननसाच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दक्षिण भारतातून बाजारात मोठ्या प्रमाणात अननसाची आवक होते. मात्र नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त कामगारांचा तुटवडा असल्याने अननसाची तोडणी पुरेशी होत नाही. त्यामुळे एपीएमसी बाजारात सरासरी येणारी आवक ३० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी आवक घातल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होत चालली आहे.

बाजारात २० ते २५ रुपये प्रतिक्रिलो मिळणारे अननस आता ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत तर पुढील आठवडाभरात आवक वाढली तरी दर चढेच राहतील, असे मत फळ व्यापारी शफिक अहमद यांनी व्यक्त केले आहे.

अननसामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते आणि सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगला राहतो. अननसमध्ये कर्करोगविरोधी घटक असतात. त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.