ठाणे : कळवा विभागात वाहतूक शाखेने बेवारस वाहनांवर जोरदार कारवाई सुरू केली असून ५५ वाहने उचलण्यात आली. दरम्यान १५ वाहन मालकांनी त्यांची वाहने स्वतःहून काढून घेतली आहेत.
कळवा वाहतुक उपविभाग हद्दीतील सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस आणि भंगार वाहनांना ४८ तासांत काढून घेण्याबाबत नोटीसा बजावण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार 23 नोव्हेंबरपासून कळवा वाहतुक उपविभाग हद्दीतील ७० बेवारस आणि भंगार वाहनांवर नोटीस लावण्यात आल्या. त्यापैकी १५ वाहने वाहनमालकांनी स्वतःहून काढून घेतली.
ठाणे महानगरपालिका आणि वाहतुक पोलीस यांच्या संयुक्तीक कारवाईत १६ डिसेंबर रोजी ३६ दुचाकी वाहने तसेच १७ डिसेंबर रोजी १० दुचाकी, चार रिक्षा आणि पाच कार अशी एकुण १९ वाहने काढून घेण्यात आली. सदरची वाहने ठाणे महानगरपालीकेच्या पारसिकनगर येथील गोडाऊनमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत.
कारवाई दरम्यान कळवा प्रभाग समिती अधिकारी सोपान भाईके, कळवा वाहतुक उपविभागचे पोलीस निरीक्षक जी. आर.पाटील आणि पथक असा बंदोबस्त नेमण्यात आला होता.