ठामपाने जाहिरातीतून दिला कारवाईचा इशारा
ठाणे: शहरातील बेकायदा बांधकामांवर थातुर-मातुर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या पालिका प्रशासनाने शहरात बेकायदा बांधकामे होत असल्याची अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये अशा बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे.
ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे इमले उभारण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारीनंतर काही बांधकामांवर कारवाई करून इतर बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतानाच, महापालिका प्रशासनाने आता शहरात बेकायदा बांधकामे सुरु असल्याची कबुली वृत्तपत्रात दिलेल्या जाहीरातीत दिली आहे. तसेच अशा बांधकामांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये काही व्यक्ती, संस्था आणि विकासक हे महापालिकेची कोणतीही रितसर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकाम करीत असल्याची बाब पालिकेच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे करणे हा गुन्हा आहे. अशा अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले असून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटीसा बजावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
दरम्यान, काही व्यक्ती, संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकामे करुन त्यातील घरांची गैरमार्गाने खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. असे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची बांधकामे करणे, अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणे, अशा अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा अनधिकृत बांधकामांसंदर्भात भविष्यात महापालिकेकडून कायदेशीर कारवाई पूर्ण करुन ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल असलेल्या याचिकेमध्ये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जाहीरातीत म्हटले आहे.